नागपूरच्या महिलांची गरुडझेप....अशी ही क्रांतीज्योती महिला बचत गटाची यशोगाथा !!

मंडळी ८ मार्च हा महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हीता रीख यायला अजून बरेच दिवस आहेत. पण राव, महिला दिन साजरा करण्यासाठी एक ठराविक दिवस का असावा ?महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक दिन हा महिला दिन असला पाहिजे. याच कारणासाठी आज आम्ही एक यशोगाथा घेऊन आलो आहोत. आज आम्ही सांगणार आहोत एका महिला बचत गटाच्या यशाची कहाणी...

महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या हेतूने नागपूर जिल्ह्यातल्या बुटीबोरी भागात अवघ्या १० महिलांनी मिळून ‘क्रांतीज्योती स्वयंसहायता महिला बचतगटा’ची स्थापना केली. दरमहा १०० रुपये प्रती सदस्य अश्या बचती मधून सुरु झालेल्या या गटाचं रुपांतर आज एका चळवळीत झालेलं आहे.

चला क्रांतीज्योती स्वयंसहायता महिला बचतगटाबद्दल आणखी जाणून घेऊया.

सुरुवात कशी झाली ?

‘दीपा चौरे’ या बुटीबोरी भागात ब्युटी पार्लरचा व्यवसाय करायच्या. सर्व सामान्य घरातल्या स्त्रियांच्या साहाय्याने त्यांनी व्यवसाय उभारायचं ठरवलं. यातूनच ‘अरुणा खडसे’ यांच्या समवेत त्यांनी बुटीबोरी भागातील महिलांना संघटीत करण्यास सुरुवात केली. या संघटीत महिलांना घेऊनच मार्च २०१५ रोजी ‘क्रांतीज्योती स्वयंसहायता महिला बचतगट’तयार झाला. सुरुवातील १०० रुपये प्रती महिना प्रती सभासद अशाप्रकारे बचत करण्याची सुरुवात झाली. हा बचतीचा पैसा साठवणे, त्यांचे हिशोब ठेवणे आणि नियम व अटींनुसार सभासदांना कर्ज वाटप करणे या कामांमधून अल्पावधीतच महिला व्यवहारात कुशल झाल्या.

बचत गट स्थापन झाल्यानंतर एका वर्षाच्या आत नोव्हेंबर २०१५ रोजी त्यांना नाबार्ड पुरस्कृत नेब्फिंस  (NABFFNS)या वित्तीय संस्थेतर्फे ३ लाख रुपयांचं कर्ज मिळालं. हा पैसा सर्व महिलांनी मिळून लहानसहान उद्योगात गुंतवण्यास सुरुवात केली.

शेतकऱ्यांकडून आलेला भाजीपाला या महिला आठवडी बाजारात जाऊन विक्री करू लागल्या. यातून त्यांना महिन्याला २००० ते ४००० पर्यंत उत्पन्न मिळू लागले. यासोबत त्यांनी लहान बाळासाठी झबले, लांगोट, दुलई इत्यादी कपडे तयार करण्याचा व्यवसाय देखील सुरु केला. हाच व्यवसाय आजच्या घडीला गटाच्या उत्पन्नाचं मुख्य साधनांपैकी एक बनला आहे. विविध ठिकाणच्या प्रदर्शनात हे कपडे विकले जात असून खुद्द नितीन गडकरींनी महिलांच्या कामाचं कौतुक केलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या कामासाठी लागणारा कच्चा माल खरेदी करण्यापासून, कपडे तयार करणे आणि त्यांच्या विक्रीपर्यंतची सर्व कामे या महिला स्वतः करतात.

१०० रुपयांपासून सुरु झालेला हा गट आता एवढा स्वावलंबी झाला आहे की जून २०१६ रोजी गटाने स्वतःच्या मालकीची जागा देखील विकत घेतली आहे. या जागी रोपवाटिका उद्योग सुरु करणार असल्याचं क्रांतीज्योती महिला गटाने सांगितलं. आर्थिक नियोजन, एकत्रितपणे केलेला व्यवसाय आणि बचत या तीन गोष्टींच्या आधारे उभारलेला क्रांतोज्योती महिला बचत गट अल्पावधीतच एक आदर्श ठरला.

सामाजिक कार्य

क्रांतीज्योती बचत गटाने महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याबरोबरच सामाजिक कार्यालाही सुरुवात केली आहे. एप्रिल २०१७ रोजी ‘बेटी बचाओ’ आंदोलनाला दिलेला पाठींबा आणि महाराष्ट्र शासनाच्या एक कोटी वृक्षलागवड योजनेसाठी गटाने मिळून लावलेली ५० आवळ्याची झाडे अशी काही महत्वाची उदाहरणे देता येतील. या उपक्रमांमधून सामाजिक भान जपण्याचं कामही बचत गटाने करून दाखवलं आहे.

इतरांना प्रेरणा

क्रांतीज्योतीची सुरुवात झाल्यापासून त्यांच्या कार्याने इतर अनेक महिलांना आणि महिला बचत गटांना प्रेरणा मिळाली. नवीन गट स्थापन करण्यास इच्छुक असलेल्या महिलांना गट स्थापन करण्यासाठी मदत करणे,  प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणे तसेच प्रत्यक्ष उद्योग सुरु करून देण्यापर्यंत क्रांतीज्योती महिला बचत गट स्वतः मदतीचा दुसऱ्यांना हात देत आहेत. यातून बुटीबोरी भागात परिवर्तन महिला बचत गट, जिजाऊ महिला बचत गट, माउली महिला बचत गट या सारख्या आणखी बचत गटांची स्थापना झाली. अश्या प्रकारे याला एक चळवळीचं रूप आलेलं आहे असं आपण म्हणू शकतो.

महिलांनी महिलांसाठी उभारलेला असा हा क्रांतीज्योती महिला गट खऱ्या अर्थाने इतरांना प्रेरणादाई आणि क्रांतिकारी ठरला आहे. त्यांच्या पासून आणखी महिलांना प्रेरणा मिळेल यात शंका नाही. त्यांच्या या कार्याला बघून मनापासून वाटतं की याच आहेत खऱ्या सावित्रीच्या लेकी....

सबस्क्राईब करा

* indicates required