कल्याणच्या सांजलने तयार केलेल्या रॉकेट सिस्टीममधून जेफ बेझोस अवकाशात जाणार... सांजलचा संपूर्ण प्रवास जाणून घ्या!!

आजच्या घडीला असे एकही क्षेत्र असे राहिलेले नाही जिथे महिलांनी स्वतःला सिद्ध केलेले नाही. अंतरिक्ष विज्ञानातही महिलांचा ठसा दिसतो. भारतीय महिलाही तिथे मागे नाहीत. नुकत्याच झालेल्या अंतराळ मोहिमेत कल्पना चावला यांच्यानंतर सिरिशा बांदला यांचे नाव नोंदवले गेले. यात अजून एक भारतीय नावाची भर घातली जात आहे.
अमेजॉनचे मालक जेफ बेझोस अवकाशात जात आहेत. गेले अनेक दिवस त्यांच्या या मोहिमेची चर्चा आहे. या मोहिमेत आपल्या कल्याणच्या सांजल गावंडे यांचा महत्वाचा सहभाग आहे. जेफ बेझोस २० जुलैला अवकाशात प्रस्थान करणार आहेत. जेफ बेझोस ज्या रॉकेट सिस्टमच्या मदतीने आकाशात जाणार आहेत ते बनविण्यात सांजल यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
सांजल आधी मरीन आणि रेसिंग कार कंपन्यांसाठी काम करत होत्या. पण स्पेसक्राफ्ट बनविण्याचे त्यांचे स्वप्न अशा पद्धतीने पूर्ण झाले आहे. सांजल यांनी आपले इंजिनिअरिंग मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले आहे. इंजिनिअरिंगनंतर त्यांनी मास्टर्ससाठी मिशिगन विद्यापीठाचा रस्ता धरला. २०१३ साली तेथेसुद्धा फर्स्ट क्लास मिळवत त्यांनी आपली चुणूक दाखवली.
तरीही सांजलचा अमेरिकेतील प्रवास सोपा नव्हता. टोयोटा कार्समध्ये काम करताना त्यांनी सुट्यांचा उपयोग करत पायलटचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी नासासाठीसुद्धा अर्ज केला होता पण तिथे नागरिकत्वाच्या मुद्यामुळे त्यांची निवड झाली नाही. शेवटी बेझोस यांच्या कंपनीत त्यांची निवड झाली.
सांजल यांचे वडील कल्याण महापालिकेत नोकरीला आहेत तर आई एमटीएनएलमध्ये नोकरी करतात. आपल्या मुलीचे स्वप्न पूर्ण झाल्याचा मोठा आनंद सांजल यांच्या आई वडिलांना झाला आहे. तर सांजल यांचे देखील लहानपणीचे स्वप्न पूर्ण झाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.