computer

कमल शेडगे गेले पण त्यांच्या चित्राक्षरांनी ते चिरंजीव आहेत!!

टायपोग्राफीसाठी कठीण अशा मराठीच्या देवनागरी लिपीतील अक्षरांना जिवंत रुप देणाऱ्या कमल शेडगे यांचे आज निधन झाले. अक्षरांना भावनेचे आणि चित्राचे रुप देणारे कमल शेडगे टायपोग्राफी या क्षेत्रातले भिष्म पितामह होते. काहीच दिवसांपूर्वी त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक टायपोग्राफर कलाकारांनी त्यांना दिलेल्या शुभेच्छांमधली अक्षरं अन अक्षरं हेच सांगत होती! 

सामान्य अक्षरांना असामान्यत्व देण्याची दैवी देणगी त्यांना मिळाली होती. ते कोणत्याही 'आर्टस्कूल' चे विद्यार्थी नव्हते. पण जाण्यापूर्वी टायपोग्राफीचे एक विद्यापीठच ते उभे करून गेले असे म्हणावे लागेल. साठीच्या दशकात महाराष्ट्र टाइम्सच्या प्रकाशनाला सुरुवात झाली. त्याकाळात टायपोग्राफी, कॅलिग्राफी हे शब्द फारसे कोणालाही माहिती नव्हते. याचदरम्यान कमल शेडगे 'चंद्रलेखा' या मराठी नाट्यसंस्थेच्या मोहन वाघांच्या संपर्कात आले. त्यानंतर चंद्रलेखाच्या प्रत्येक नाटकाच्या जाहिरातला कमल शेडगे यांच्या अक्षरांचा परिसस्पर्श लाभला होता. त्याकाळी 'बजेट' ही जाहिरातीची मोठी आडकाठी होती. तेव्हा नाटकाच्या जाहिराती वर्तमानपत्राच्या एका कॉलमच्या रुंदीत बसवणे हे फार मोठे आव्हान असायचे. पण कमल शेडग्यांच्या टायपोग्राफीने त्यावरही मात केली होती. त्यांच्या कामाचा प्रभाव वाचकाचे चित्त वेधून घ्यायचा. वर्तमानपत्रात त्याकाळी रंगीत जाहिराती नसायच्या. केवळ काळ्या पांढर्‍या रंगांचा वापर करून जाहिरातीकडे लक्ष वेधून घेणे हे त्याहूनही मोठे आव्हान होते. पण शेडग्यांच्या कलात्मक अविष्काराने या सर्व अडचणीवर मात केली होती. 

त्यांच्या कामाची पध्दत फारच साधी होती. केवळ पेन्सील आणि पट्टीच्या साह्याने ते सुलेखन करत असत. त्या काळात कॉम्पुटर नव्हताच. केवळ ग्राफ पेपरवर अक्षरांची आखणी केल्यावर त्या सुलेखनाच्या वजनाचा त्यांना अंदाज यायचा. काही वेळा अक्षराला सूचकसं वळण देऊन ते अधिक अर्थवाही करण्यातही त्यांची हातोटी होती. मराठी अक्षरे दुसर्‍या भारतीय भाषांच्या शैलीत रेखाटने ही तर केवळ त्यांचीच खासीयत म्हणावी लागेल. अनेक पुस्तकांच्या मांडणीचे आणि मुखपृष्ठांची निर्मिती पण त्यांनी केली होती. तर काही प्रकाशन संस्थांचे लोगोही त्यांनीच निर्माण केले होते.

कमल शेडगे यांना कॉम्प्युटर वापरता येत नसे. याची खंत त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीत बोलून दाखवली होती. टायपोग्राफीच्या या मास्टर आर्टीस्टने स्वतःचा असा वेगळा फाँट बनवला नाही याची खंत आपल्या पिढीला नक्कीच जाणवत राहील. 

केवळ नाटकच नव्हे, तर अनेक सिनेमाच्या पोस्टरसाठी त्यांनी टायपोग्राफी केली होती. बयो, एक फुल तीन हाफ, एक रात्र मंतरलेली, प्यारे मोहन, भूलभूलैय्या, सरकारराज, उमराव जान ही त्यातली काही नावे. 

घरोघरी पोहचलेल्या कालनिर्णयची टायपोग्राफी पण  त्यांनीच केली होती. 

'बोभाटा'तर्फे कमल शेडगे यांना श्रध्दांजली वाहताना इतकेच म्हणू या की, 

"असेन मी नसेन मी । परी अक्षर असेल हे!!"

(हे पुस्तक टायपोग्राफीचे बायबल समजले जाते)

सबस्क्राईब करा

* indicates required