computer

मुलांनी पाणी प्यावं यासाठी शाळेने भन्नाट युक्ती केली, तुम्ही घरी कोणती युक्ती कराल?

पाणी भरपूर प्यावं हे आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं, पण आपण ऐकतो का ? तर फारच  कमी लोक असतात जे हा सल्ला पाळतात.  पाणी कमी प्यायल्याने निर्जलीकरण, थकवा येणे, चिडचिड, किंवा मुत्रमार्गात संसर्ग होण्याइतपत समस्या निर्माण होऊ शकतात. भारतात कमी पाणी प्यायचं एक गंभीर कारण दिसून आलं आहे, ते म्हणजे चांगल्या शौचालयाचा अभाव. खास करून मुली कमी पाणी  पितात, जेणेकरून त्यांना शौचालयास जावं लागू नये. खरं तर लहान मुलांनी दिवसातून १.५ ते ३ लिटर पाणी प्यायला हवं.

या सगळ्या समस्या लक्षात घेता मंगळूर जवळच्या उप्पीनगडी गावातील इंद्रप्रस्थ विद्यालय या शाळेने एक अभिनव कल्पना राबवली आहे. या शाळेत दिवसातून ३ वेळा बेल वाजते. ही बेल मुलांना पाणी प्यायची आठवण करून देते.

शाळेचे मुख्याध्यापक जोस एम जे यांनी सांगितल्याप्रमाणे मुलं घरून पाणी आणायची पण ती प्यायची नाहीत. त्यामुळे पाण्याच्या कमतरतेमुळे उद्भवणारे आजार जसे की डोकेदुखी, निर्जलीकरण, मुतखडा अशा समस्या मुलांमध्ये वाढू लागल्या होत्या.

शाळेच्या बैठकीत या समस्येवर विचार करण्यात आला आणि या चर्चेतून ‘वॉटर बेल’ची कल्पना तयार झाली. सकाळी १०.३५ वाजता, दुपारी १२ वाजता आणि २ वाजता पाणी पिण्यासाठी मुलांना ५ मिनिटाचा खास वेळ दिला जाऊ लागला. मुलं पाणी पितायत की नाही यावर शिक्षक नजर ठेवून असतात. पाण्याचं प्रमाण मुलं आपल्या इच्छेप्रमाणे ठरवतात, पण पाणी पिणं हे बंधनकारक ठरवण्यात आलंय.

केरळमध्ये ही संकल्पना वेगाने पसरत आहे. या संकल्पनेतून मुलांना भरपूर पाणी प्यायची सवय लागेल आणि बेल न वाजताही ते हा नियम पळतील हा या मागचा उद्देश्य आहे.

हाच नियम मोठ्यांनाही लागू पडतो. काही लोक कामाच्या व्यापात पाणी प्यायचं लक्षात राहात नाही म्हणून पाणी पिण्याची आठवण करून देणारे अँप्स वापरतात.

तुम्ही कोणती युक्ती करता ?

सबस्क्राईब करा

* indicates required