निशा राव : गियरलेस स्कुटरवरून काश्मिर ते कन्याकुमारीचा प्रवास करणारी जिगरबाज मराठी तरूणी

मनसोक्त फिरायला कोणाला नाही आवडत मंडळी? त्यातल्या त्यात आपल्या लाडक्या बाईकवर स्वार होऊन स्वैर वार्‍याशी स्पर्धा करत, निसर्गाशी गप्पा मारत, उन्हापावसाशी खेळत केलेल्या प्रवासाची मजा काही औरच! बरोबर ना? प्रवासाचा हाच छंद जोपासत आपल्या एका मराठमोळ्या ताईने अभिमान वाटावी अशी कामगिरी केलीय. निशा विजय राव नावाच्या या पुणेकर तरूणीनं चक्कं गियरलेस स्कुटरवरून काश्मिर ते कन्याकुमारीचा प्रवास केलाय! आणि तेही अवघ्या ६ दिवसांत!! याआधी असा प्रवास करण्याचा प्रयत्न  कोणत्याही महिलेने केलेला नाहीये. चला आज वाचूया स्वप्नपूर्तीच्या ध्यासाने झेपावलेल्या या स्त्रीसामर्थ्याची ही प्रेरणादायी कहाणी... 

पुण्याच्याच एका खाजगी कंपनीत नोकरी करणारी निशा राव गाडी चालवण्याची शौकीन आहे. शाळकरी वयापासूनच साहसी गोष्टी करण्याची आवड असलेल्या निशानं सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात वसलेले गडकिल्ले भटकण्यापासून ते वेगवेगळ्या ट्रेकींग कॉम्पिटीशन्स, जंगल ट्रेक्स, हिमालयीन ट्रेक्स, कार ट्रिप्स यासारख्या अनेक गोष्टी केलेल्या आहेत. याआधी तिनं पुणे - लेह - लडाख - पुणे हा प्रवासही कारने पूर्ण केलाय. या कार ट्रिपला एक वर्ष पुर्ण होतंय ना होतंय तोच निशाच्या डोक्यात विचार चमकला तो काश्मिर - कन्याकुमारी बाईक ट्रिपचा. हा प्रवास तर प्रत्येक भारतीय बाईकरचं स्वप्न असतं. आणि बघता बघता आव्हानाचा पुढचा टप्पा म्हणून हा प्रवासही तिनं थोड्या हटके पध्दतीने अर्थातच स्कुटरने पार करून दाखवला!

इतक्या मोठ्या पल्ल्याच्या प्रवास आणि तोही स्कुटरने? साहजिकच यासाठी गरज होती ती मार्गदर्शन आणि पूर्वतयारीची. तयारी म्हणून निशाने पुणे-गोवा-पुणे, पुणे-सातारा-पुणे, पुणे-बेळगांव-पुणे, पुणे-कोल्हापूर-पुणे, पुणे-सोलापूर-पुणे, पुणे-धारवाड-पुणे, असे अनेक लांबचे प्रवास स्कुटरवरून केले. घाट रस्त्यांचा सराव म्हणून कोकणातही प्रवास केले. गाडीची निवड, रस्त्यांचे प्रकार, पेट्रोल पंप, गाडीचा सरासरी वेग, थांबण्याची ठिकाणं, हा सारा अभ्यासही यात आलाच. मार्गदर्शन आणि नियोजनासाठी निशाला ह्युमन GPS अशी ओळख असलेल्या एच. व्ही. कुमार सरांचं मार्गदर्शन लाभलं. या सगळ्यात जवळच्या मित्रपरिवाराने दिलेला पाठींबाही मोलाचा होता.

या सगळ्या प्रवासात निशाने तब्बल ११ राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेशातून प्रवास केला आहे. कधी चटके देणारं उन, कधी रक्त गोठवणारी थंडी, तर कधी भरपूर पाऊस. कधी खराब-खडकाळ रस्ते तर कधी मस्त मुलायम हायवेज, कधी रानावनातील हिरवाईशी झालेली मनमोकळी बातचीत तर कधी शहरातल्या ट्राफिकमधून काढावी लागणारी वाट, बदलणारं तापमान, उंचावरील अॉक्सिजनची कमतरता असे एक ना अनेक बरे-वाईट अनुभव पाठीशी घेत निशाने हा प्रवास केलाय. काश्मिर ते कन्याकुमारीचं हे ३९१२ किलोमीटर्सचं अंतर तिनं फक्त १३० तासांत कापलंय. अवघ्या ६ दिवसांच्या कालावधीत तिनं पार केलेले हे टप्पे आपण पाहून घ्या...

पहिला दिवस :

अॉगष्ट १७ | लेह ते किलॉन्ग | ३६४ कीलोमीटर्स | १४ तास ३४ मिनिटे

दुसरा दिवस :

अॉगष्ट १८ | किलॉन्ग ते चंदिगढ | ४६० किलोमीटर्स | १६ तास ३३ मिनिटे

तिसरा दिवस :

अॉगष्ट १९ | चंदिगढ ते सागर | ९२२ किलोमीटर्स | १९ तास ३७ मिनिटे

चौथा दिवस :

अॉगष्ट २० | सागर ते कामारेड्डी | ८०२ किलोमीटर्स | २० तास ४८ मिनिटे

पाचवा दिवस :

अॉगष्ट २१ | कामारेड्डी ते कमनडोड्डी | ७५० किलोमीटर्स | १८ तास ३३ मिनिटे

सहावा दिवस :

अॉगष्ट २२ | कमनडोड्डी ते कन्याकुमारी | ६१४ किलोमीटर्स | ११ तास १० मिनिटे

निशासाठी यातला लेह ते चंदिगढ हा पल्ला सर्वात खडतर होता. या प्रवासात समुद्रसपाटीपासून १३००० ते १७५०० फुट उंचावरील मार्गांचाही समावेश आहे. मार्गात भेटणारे बाईकर्स, मिलिटरी ट्रक्स, आणि विचारपूस करणारे अनेकजण निशाला आपलं लक्ष्य गाठण्यासाठी प्रोत्साहित करत होते.

अर्थातच या मेहनतीचं फळ तीला मिळालं. याला तुम्ही ध्यास, वेड, ध्यास, पॅशन, क्रेझ... काहीही नाव देऊ शकता. पण तिनं जे अनुभवलं ते तिच्यासाठी सर्वोत्तम होतं. लोकांकडून निशाचं कौतूक झालं; होत आहे. ही कामगिरी करणारी ती एकमेव आहे आणि लवकरच विक्रमांची नोंद ठेवणार्‍या संस्था तिच्या नावाची नोंद आपल्या पुस्तकात एक विक्रमवीर म्हणुन करतील.

योग्य माणसांची साथ, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर एखादी स्त्री काय साध्य करू शकते याचं हे उत्तम उदाहरण. यातून इतर स्त्रियांनी प्रेरणा घेऊन आपला छंद, आपली पॅशन जपावी असं निशा सांगते.

इतक्यावरच न थांबता सुवर्ण चतुष्कोन (दिल्ली-कोलकाता-चेन्नई-मुंबई-दिल्ली), पूर्व भारत ते पश्चिम भारत रोड ट्रिप, भारताचा कोस्टल रूट, हे प्रवास करण्याचाही निशाचा मानस आहे.

या अभिमानास्पद कामगिरीबद्दल बोभाटा परिवाराकडून निशाला मानाचा सलाम! सोबत पुढील यशासाठी खुप सार्‍या शुभेच्छा!!

सबस्क्राईब करा

* indicates required