ठाण्यातले कौस्तुभ ताम्हनकर आपल्या घरात कशी राबवतात शून्य कचरा मोहीम !!

आज जागतिक पर्यावरण दिन आहे. साधारण पंधरा वीस वर्षांपासून हा शब्द आपल्या कानावर सतत पडतो आहे. सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये पर्यावरणाचा विचार करणे आणि पर्यावरणाचे संवर्धन -जतन करणे  हे एक "फ्याड" समजले जायचे. बर्‍याच पर्यावरणवादी सामाजिक संस्थांनी -गैरसरकारी संस्थांनी या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. सरकारी पातळीवर पर्यावरणाच्या प्रश्नाची दखलही घेतली गेली.

त्तरीच्या दशकात भारतीय घटनेत एक दुरुस्ती करून  कलम ४८अ जोडण्यात आले आणि पर्यावरणाच्या प्रश्नाची योग्य दखल घेण्याची सुरुवात झाली . यातूनच पुढे  १९८५ साली पर्यावरण मंत्रालयाची स्थापना झाली. आजही ’पर्यावरण हा माझा वैयक्तिक प्रश्न नाही’ असे मानणार्‍यांची  संख्या अधिक आहे. अवर्षण, अवेळी वर्षण, अतिवर्षण, गारपीट, हवामानातील अचानक होणारे बदल, सतत वाढत जाणारे तापमान हे धोक्याचे इशारे आपल्यापर्यंत पोहचल्यावर जनजागृतीची सुरुवात झाली आहे. या जागृतीच्या पहिल्या टप्प्यावर   " मी एक व्यक्ती म्हणून काय करणार ?"  हा प्रश्न सामान्य नागरिकाला पडणं साहजिक आहे. उत्तर सोपं आहे. "पर्यावरण संवर्धनाच्या ज्या पायरीवर मी माझे  योगदान देऊ शकतो तेथे मी माझे  पहिले पाऊल टाकेन." , ही धारणा ठेवली तर काहीच अशक्य नाही.  उदाहरणार्थ , शहरीकरणाच्या रेट्यात कचरा व्यवस्थापन हा मोठा अडथळा निर्माण झाला आहे. कचरा मूलतः  व्यक्तिगत पातळीवर  तयार होतो. म्हणूनच कचरा व्यवस्थापनात व्यक्तिशः सहभागाची आवश्यकता आहे.  एक एकटी व्यक्ती कचरा  व्यवस्थापनाचा व्याप कसा सांभाळू शकेल  हा प्रश्न पडलाय? उत्तर मिळवण्यासाठी  चला आज आपण जाऊ या ठाण्यात राहणार्‍या कौस्तुभ ताम्हनकरांच्या घरी !!!

त्यांच्या  दारावर एक वेगळीच पाटी लावली आहे. "येथे कचरा तयार होत नाही".  "शून्य कचरा"  या संकल्पनेचा गेली बारा वर्षे पाठपुरावा करणार्‍या ताम्हनकरांच्या घरावरची ही पाटी म्हणजे त्यांचे मिशन स्टेटमेंट आहे. शून्य कचरा या संकल्पनेच्या त्रिसूत्री अशी आहे : "कमी वापरा -पुन्हा वापरा - वापरून वापरा".

"वाव" म्हणजे वापरलेल्या वस्तूंचे व्यवस्थापन असे थोडक्यात सांगताना ताम्हणकर म्हणतात, "कचरा म्हणजे कचरा नव्हे तर कचरा म्हणजे नकोशा झालेल्या वापरलेल्या वस्तू. ज्या वस्तू पुन्हा वापरता येतील त्या वेगळ्या करणे (रीसायकलींग ) आणि जैविक टाकाऊ पदार्थांचे खतात रुपांतर करणे. हे सर्वकरणे म्हणजे "शून्य कचरा " मोहीम राबवणे".  झी २४ तासने कौस्तुभ ताम्हनकरांची मुलाखत बघितल्यावर आणखी खुलासा होईलच .

सबस्क्राईब करा

* indicates required