आर्थिक दुर्बलांना लग्नासाठी छान कपडे मिळावे यासाठी केरळमध्ये सुरु झालीय ड्रेसबँक!! अशी बँक आपल्या आसपासही सुरु व्हायला हरकत नाही.

लग्न म्हटले म्हणजे तसा आनंदाचा क्षण. पण आजही देशात असे अनेक कुटुंब सापडतील ज्यांच्या घरात लग्न येत असेल तर पोटात खड्डा पडतो. कारण एकच, लग्नात होणारा खर्च!! लग्नात होणाऱ्या खर्चांमुळे अनेकांना हौसमौसेला मुरड घालावी लागते. लग्नात नवरदेव आणि नवरी यांना छान कपडे घालावेसे वाटतात आणि ते साहजिकच आहे.  पण सगळी सोंगं घेता येतात, पैशांचं मात्र सोंग काही केल्या घेता येत नाही. परिणामी काहींना अपेक्षेपेक्षा हवे तसे कपडे मिळत नाहीत. जे बजेटमध्ये असेल, ते घालून लग्न उरकावे लागते. अशा लोकांसाठी एका अवलीयाने भन्नाट आयडिया केली आहे.

केरळमध्ये एक परदेशातून परतलेले गृहस्थ आहेत. नासर तुथा असे त्यांचे नाव. मलप्पूरम पलक्कड बॉर्डरवर तुथा या गावात ते राहतात. या ठिकाणी त्यांनी नविन उपक्रम सुरू केला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे नाव आहे ड्रेस बँक.  इथे काय होते, तर ज्यांचे लग्न झाले आहे ते लोक आपले कपडे इथे देऊन जातात, तर ज्यांचे लग्न बाकी आहे आणि चांगले कपडे घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती नाही ते हे कपडे घेऊन जातात.

हा उपक्रम पूर्ण केरळ राज्यासाठी राबवला जात आहे. बाजूच्या कर्नाटकातही अनेकांना यामुळे फायदा झाला. एकदा वापरलेले अनेक महाग कपडे लोक स्वखुशीने इथे सोडून जातात. ज्यामुळे गरीब घरातल्या मुलींना यामुळे चांगले डिझायनर कपडे आपल्या लग्नात वापरता येतात. आजवर तब्बल १५५ महिलांना यामुळे लाभ झाला आहे.

दीड वर्षांपूर्वी सौदी अरेबियाहून परतल्यावर नासर यांना आपल्या भागात काहीतरी करावे असे वाटत होते. त्यातून ही आयडिया जन्माला आली. नासर सांगतात. 'सौदी अरेबियाहून परतल्यावर आपण घर नसलेल्या लोकांना छप्पर कसे मिळेल या कामात गुंतलो. या काळात आपल्याला अनेक कुटूंबाची परिस्थिती जाणून घेता आली. ज्यातून आपल्याला समजले की अनेक कुटूंबांना लग्नाचे कपडे घेणे हा मोठा प्रश्न असतो, कारण ते अतिशय महाग मिळतात.'

एप्रिल २०२० साली त्यांनी आपल्या मित्रांच्या मदतीने प्रयोग म्हणून ही ड्रेस बँक सुरू केली. त्यांनी फेसबुक आणि व्हाट्सअपवर एक पोस्टर बनवून वायरल केले. ज्यामुळे राज्यभरातून अनेकांनी आपले लग्नाचे ड्रेस त्यांच्या स्वाधीन केले. राज्यभरातील हे ड्रेस त्यांनी आपले मित्र आणि काही संस्थांच्या मदतीने गोळा केले. त्यांना ड्रायक्लीन करून त्यांनी हे कपडे गरीब कुटूंबांना वाटण्यास सुरुवात केली.

त्यांच्या या ड्रेस बँकमध्ये ३,००० ते ६०,००० रूपये किंमतीचे जवळपास ६०० ड्रेस आहेत. मुलगी किंवा तिचे नातेवाईक थेट ड्रेस बँकेत येऊन त्यांना आवडतील ते कपडे घेऊन जाऊ शकतात. तसेच घेऊन गेलेले कपडे परत करण्यासही त्यांना सांगितले जात नाही.

नासर यांच्या या उपक्रमाने अनेक गरीब कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. त्यांचे कौतुक करत असतानाच आपल्याही भागात असा उपक्रम राबवता येतो का असा प्रयत्न करायला हवा.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required