computer

पंढरीचा विठोबा, शिवाजीराजे, इतकंच काय तुमच्या घरात असलेले देवांचे सगळे फोटो चितारले आहेत या रंगसम्राटाने...जाणून घ्या या रंगश्रीमंत अवलियाबद्दल...

या अवलियाचं नाव आहे रघुवीर मुळगावकर. हे कोण? असा प्रश्न 'बोभाटा'च्या वाचकांच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही.  पण याच आमच्या वाचकानी हा प्रश्न  घरी बाबांना -काकांना विचारला तर घरातल्या देवाच्या तसबिरीकडे बोट दाखवून 'हेच ते  मुळगावकर' असेच उत्तर मिळेल. तुमच्या-आमच्या घरात विराजमान झालेल्या जवळजवळ सर्व इष्ट देवतांची चित्रे मुळगावकरांच्या कुंचल्यातून उतरली आहेत. आपल्या सर्व देवदेवतांना चेहेरा म्हणजे दृश्य ओळख देण्याचे काम रंगसम्राट रघुवीर मुळगावकरांनी केले. आणि हो, सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की त्यांच्या नावासमोरच्या 'रंगसम्राट' या बिरुदासहच ते ओळखले जातात. रंगावर असलेली त्यांची हुकुमत आजच्या डिजीटल जमान्यात पण कोणालाही जमली नाही असे म्हटले तरी ती अतिशयोक्ति होणार नाही. पण हे सगळे संदर्भ आम्ही तुम्हाला सांगण्यापेक्षा त्यांच्या चित्रातूनच त्यांची ओळख करून घ्या!! 

महाराष्ट्राच्या कुळदैवताला म्हणजे पंढरीच्या विठोबाला विटेवर स्थापन करणार्‍या पुंडलीकाचे हे चित्र बघा !!

या चित्राची मूळ रंगीत प्रत सध्या कोणाकडे असेल किंवा नाही हे त्या विठ्ठलालाच ठाऊक पण  उपलब्ध कृष्ण्धवल चित्रात आईबापाच्या सेवेत मग्न असलेल्या पुंडलीकाचे चित्र सजीव आहे असेच वाटते.

महाराष्ट्राचे आद्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे हे चित्र तुम्ही नक्कीच बघीतले असणार, आता या चित्राच्या अनेक वेळा अनेकांनी नकला केलेल्या आहेत पण मूळ चित्र रघुवीर मुळगावकरांचेच !!

जाई काजळ, पोरवाल नेत्रांजन, डोंगरे बालामृत यासारख्या घरोघरी वापरल्या जाणार्‍या उत्पादनांच्यासाठी मुळगावकरांनी चित्रे रेखाटली. या कंपन्या नविन वर्षाच्या निमित्ताने जी कॅलेंडरं छापायच्या ती चित्रं फ्रेम करून देवघरात ठेवण्याची प्रथाच त्या काळी होती.

त्या काळी लग्न कर्तव्य असलेल्या मुलाला विचारले की बाबा रे तुला मुलगी दिसायला कशी हवी तर उत्तर एकच असायचे - 'मुळगावकरांच्या कॅलेंडरमध्ये आहे तशी '  आणि बाळ कसे असावे ? असे एखाद्या गर्भवतीला विचारावे तर उत्तर असायचे ' जाई काजळच्या बाळासारखे !!! 

 

पोरवाल साठी त्यांनी गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांचे केलेले कॅलेंडर अजरामर आहे.

राम -कृष्ण -विष्णू अशा दैवतांचे दर्शन प्रत्यक्ष कुणाला झाले असेल किंवा नाही हे कळायला मार्ग नाही. पण या दैवतांची नावं घेतल्यावर डोळ्यासमोर उभे राहते ते मुळगावकरांचे चित्रच!!


 

मनातल्या देवाला प्रत्यक्ष रुप देणारी अशी अनेक चित्रे मुळगावकरांनी काढली. युरोपच्या चर्चमध्ये असलेल्या लिओनार्दो द व्हिन्सीने रंगवलेल्या पौराणिक चित्रांना अत्युच्च दर्जाच्या कलाकृती असल्याचा मान मिळाला. पण मुळगावकरांच्या चित्रांना तो मान  कलासमिक्षकांनी दिला नाही. ही मात्र एक खंत आहे. लोकमानसात मात्र कायमचे अग्रस्थान रघुवीर मुळगावकरांनाच मिळाले.

कलाजगतात अ‍ॅब्स्ट्रॅक्ट पेंटींगचा आणि पेंटरचा फार बोलबाला असतो.  जगातल्या श्रेष्ठ अ‍ॅब्स्ट्रॅक्ट पेंटरचा मेरुमणी 'पाब्लो पिकासो' यांना प्रत्यक्ष भेटलेले एकमेव मराठी चित्रकार म्हणजे रघुवीर मुळगावकर!! 

अनेक देवांची चित्रं तुम्ही बघीतली असतील पण पाचवीला पूजल्या जाणार्‍या सटवाईचं चित्रं कधी बघीतलंय का ? हे चित्र बघीतल्यावर सटवाई म्हटल्यावर जे चित्र डोळ्यासमोर उभं राहतं ते चित्र विसरूनच जाल.

 

कलाकार म्हटला की कलेने श्रीमंत पण पैशाने खंक अशी सर्व साधारण समजूत असते. पण मुळगावकर देवांचे चित्रकार म्हणून असेल कदाचित, पण त्याकाळी मुंबईच्या मलबार हिल या अतिश्रीमंतांच्या वस्तीत फक्त दोनच मराठी माणसं रहायची एक -लेखिका चारुशिला गुप्ते आणि दुसरे रघुवीर मुळगावकर!! पण मुळगावकरांची खरी श्रीमंती दिसते त्यांच्या रंगांतून!

मुळगावकरांची प्रतिभा केवळ पौराणिक चित्रांतूनच दिसते असे नाही. सोबत जोडलेले चित्र पाहा, असे वाटते की हा कॅमेराने काढलेला फोटो आहे. पण हा प्रत्यक्षात त्यांच्या कुंचल्याचा तो अविष्कार आहे.

श्रीदीपलक्ष्मी या दिवाळी अंकाचे म्हणजेच जयहिंद प्रकाशनाचे आणि मुळगांवकरांचे नाते इतके अतूट होते की ते असेपर्यंत  श्रीदीपलक्ष्मीचे मुखपृष्ठ फक्त आणि फक्त मुळगावकरच करायचे. एकाच प्रकाशकासाठी एकाच माणसाने केलेली १०० मुखपृष्ठं हा एक विक्रमच म्हणायला हवा. 

सबस्क्राईब करा

* indicates required