computer

आयर्लंड जन्मभूमी, मात्र भारताच्या कर्मभूमीत स्वातंत्र्यलढा ते स्त्री-शिक्षण, सामाजिक प्रश्न आणि समाजसेवेत आयुष्य वेचणाऱ्या भगिनी निवेदितांबद्दल तुम्हांला काय माहित आहे?

जीवनाचे मुख्य सार काय आणि धार्मिक वचनांचा यासाठी किती उपयोग होतो या प्रश्नांनी तिला पछाडले होते. १८९५ साली लंडन येथे स्वामी विवेकानंद यांचे भाषण ऐकल्यापासून भारतीय तत्वज्ञान आणि या तत्वज्ञानाला पोसणारी भूमी या दोन्ही बद्दल तिला खास आकर्षण होते. पुढे हे आकर्षण इतके वाढत गेले की या तरुणीने आपली नोकरी, आपले कुटुंब, इतकेच काय आपली मातृभूमी सोडून भारतात यायचा निर्णय घेतला. ब्रिटिश अंमलाखालील भारत आणि भारतीयांची दयनीय अवस्था पाहून तिने कायमचेच स्वतःला भारतीयांच्या उद्धारासाठी वाहून घेतले. या तरुणीचे नाव होते मार्गारेट एलिझाबेथ नोबेल. आज आपण त्यांना सर्वजण भगिनी निवेदिता म्हणून ओळखतो. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आणि भारतीय स्त्रियांच्या उद्धारासाठी भगिनी निवेदितांनी खूप मोठे योगदान दिले आहे. त्यांची ओळख करून देण्यासाठी आणि भगिनी निवेदितांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच हा लेखनप्रपंच!

भगिनी निवेदिताचे नाव आणि कार्य भारतीय भूमीशी इतके एकरूप झाले आहे की, भगिनी निवेदिता या मूळच्या भारतीय नाहीत या सत्याची कधी जाणीवच होत नाही. भगिनी निवेदितांचा जन्म २८ ऑक्टोबर १८६७ साली आयर्लंडमधल्या टायरोन परगण्यात झाला. त्यांचे वडील सॅम्युएल रिचमंड हे पाद्री होते. मार्गारेटला त्यांच्या वडिलांकडूनच मानवसेवेचे धडे मिळाले. फक्त दहा वर्षांचे वय असतानाच त्यांच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले आणि मार्गारेट अनाथ झाल्या. त्यांचे आजोबा हॅमिल्टन यांनी मार्गारेटच्या कुटुंबाचे पालनपोषण केले. वयाच्या १७ व्या वर्षापर्यंत मार्गारेट यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. आपली बहिण आणि आईची देखभाल करता यावी म्हणून त्यांनी शिक्षिकेची नोकरी पत्करली.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांना पुस्तकी अभ्यासाव्यतिरिक्त कला, संगीत, साहित्य, भौतिकशास्त्र, अशा अनेक विषयांबद्दल ओढ होती. आपल्या या आवडत्या विषयांचाही त्यांनी सखोल अभ्यास केला होता. शिक्षिकेची नोकरी करत असताना त्यांनी शिक्षण क्षेत्रात काही अभिनव प्रयोग केले. वयाच्या २५ व्या वर्षी त्यांनी स्वतःची स्वतंत्र शाळा स्थापन केली होती. जीवनाचा अर्थ शोधण्याची प्रचंड ऊर्मी त्यांच्यात सामावली होती म्हणूनच देशोदेशीचे दार्शनिक आणि विचारवंत यांचाही अभ्यास त्यांनी सुरु केला होता.

जीवनाचा अर्थ काय या प्रश्नाचा शोध घेत असतानाच त्यांना स्वामी विवेकानंदांचे भाषण ऐकण्याची संधी मिळाली. मार्गारेट यांचा तत्वज्ञान आणि धार्मिक क्षेत्रातील आवड पाहून त्यांच्या मित्र-मैत्रिणींनीच त्यांना या कार्यक्रमाची माहिती दिली होती. स्वामीजींचे विचार ऐकल्यावर तर मार्गारेट इतक्या प्रभावित झाल्या की त्यांनी स्वामीजींचे शिष्यत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी त्यांना भारतात येणे क्रमप्राप्त होते. धर्म आणि जीवनासंबंधी त्यांना जे प्रश्न छळत होते त्याबद्दल त्यांनी स्वामीजींना विचारले. स्वामीजींच्या उत्तराने त्यांचे थोडेफार समाधानही झाले. गरिबांची आणि गरजू लोकांची सेवा करण्याचा स्वामीजींचा संदेश त्यांच्या मनावर चांगलाच कोरला गेला.
यानंतर १८९८ मध्ये त्या कायमच्या भारतात आल्या. २५ मार्च १८९८ रोजी स्वामीजींनी त्यांना दीक्षा दिली आणि बुद्धाच्या करुणेचा मार्ग चोखाळण्याची प्रेरणा दिली. याच वेळी त्या मार्गारेटच्या “निवेदिता” झाल्या. निवेदिताचा अर्थ होतो समर्पित. स्वामीजींनी त्यांना दिलेले हे नामाभिधान निवेदिताजींनी सार्थ करून दाखवले यात शंकाच नाही. भगिनी निवेदिता भारतीय समाज समजून घेत होत्या. भारतीय समाजाची जसजशी त्यांना ओळख होत गेली तसतसे त्यांना जाणवले की भारतीय स्त्री आपल्या मुलभूत अधिकारांपासून वंचित आहे. शिक्षण, आरोग्य, अशा मुलभूत गरजा भागवण्याचा तीला अधिकारच नाही. बाल-विवाहाच्या प्रथेने तर भारतीय स्त्री उमलण्याआधीच भरडली जात होती. स्त्रियांच्या समस्यावर काम करायचे तर आधी त्यांना शिक्षित बनवले पाहिजे हे भगिनी निवेदितांनी ओळखले.

भारतीय स्त्रीचे दयनीय वास्तव त्यांना अस्वस्थ करत होते. या सगळ्या बाबत त्या अनेकांशी चर्चा करत होत्या. स्वामीजींचे गुरु रामकृष्ण परमहंस आणि त्यांची पत्नी माँ शारदा यांना निवेदितांची ही तळमळ आणि मानवसेवेबद्दलची ओढ पाहून त्यांच्याबद्दल प्रचंड प्रेम वाटत असे. निवेदितांनी खास मुलींसाठी निवेदिता स्कूल सुरु केली. या शाळेचे उद्घाटन माँ शारदा यांनीच केले होते. माँ शारदा आणि भगिनी निवेदिता दोघीही स्त्रियांच्या प्रश्नाबाबत आपसात खूप चर्चा करत असत, दरवेळी त्यांच्या चर्चेचा एकच सार निघत असे तो म्हणजे स्त्रियांमध्ये शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करणे, त्यांना शिकण्यासाठी प्रवृत्त करणे. भारतीय स्त्रीला फक्त शिक्षणच तारुन नेऊ शकत होते.

ब्रिटिशांनी भारतीयांचा जो छळ चालवला होता तोही निवेदितांना असह्य होत होता. म्हणूनच आपल्या वाणी आणि लेखणीतून त्या भारतीय नागरिकांमध्ये स्वातंत्र्याची ऊर्मी जागवण्याचे काम करत असत. रवींद्रनाथ टागोर, जगदीश चंद्र बोस, गोपालकृष्ण गोखले आणि अरबिंदो घोष यांच्यासारखे विचारवंत आणि स्वातंत्र्यसेनानीच नेहमीच निवेदितांच्या घरी चर्चा करण्यासाठी जमत असत. भगिनी निवेदितांना या बुद्धीजीवी वर्गाचीही बरीच मदत होत असे. निवेदितांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाने त्यांना भेटणारा प्रत्येकजण भारावून जात असे.

निवेदितानी समाजाला स्वदेशी अभियानाचे समर्थन करण्याची प्रेरणा दिली. ब्रिटिश सरकारने वंदे मातरम गीत गाण्यावर बंदी घातली तेव्हा त्यांनी स्वत:च्या शाळेत हे गीत गाऊन घेतले. भारतातील धार्मिक बेबनावावरही त्या असाच सल्ला देत असत. हिंदू मुस्लिम वेगवेगळे नसून एकाच आईची दोन लेकरे आहेत, त्यामुळे या दोन्ही समाजांनी आपसांत न भांडता एकमेकांशी गुण्यागोविंदाने राहिले पाहिजे असेही त्या म्हणत असत. हिंदू-मुस्लिम एकतेवर त्यांनी अनेक लेख लिहिले आणि वर्तमानपत्रातूनन यासंबंधीच्या चर्चा घडवून आणत. भारतीय इतिहास, भारतीय स्त्रिया, शिक्षण, राष्ट्रवाद, कला आणि भारतीय पुराण कथा अशा विषयांवर त्यांनी भरपूर माहिती गोळा केली. त्यांनी विपुल ग्रंथसंपदा निर्माण केली. त्यांचे अनेक लेख ब्रिटिश प्रेसमधूनही प्रकाशित झाले.

१८९९ मध्ये कलकत्त्यात प्लेगची भीषण साथ आली होती. या साथीत भगिनी निवेदिता यांनी आपल्या प्रकृतीची चिंता न करता झोकून देऊन रुग्णांची सेवा केली. त्यानंतर १९०६ साली बंगालमध्ये मोठा दुष्काळ पडला. या दुष्काळात असंख्य लोकांना अन्न न मिळाल्याने त्यांच्या मृत्यू झाला. याकाळातही भगिनी निवेदितांनी या दुष्काळग्रस्तांसाठी काम केले. याच काळात त्यांना मलेरिया सारख्या दुर्धर आजाराने गाठले. आज मलेरियावर खात्रीशीर इलाज सापडला आहे. त्याकाळी मात्र मलेरियामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडत असत. स्वतःच्या जीवावर बेतलेले असतानाही त्यांनी जनसेवेचा वसा सोडला नाही.
 

१३ ओक्टोंबर १९११ रोजी अवघ्या ४४ वर्षी त्यांचा मृत्यू झाला. निवेदिता या नावाप्रमाणेच त्यांनी संपूर्ण आयुष्य भारतीयांच्या सेवेसाठीच समर्पित केले होते. माझे जीवन मी भारतालाच अर्पण केले आहे. मी इथेच राहीन आणि इथेच मरेन,” अशी त्यांनी प्रतिज्ञाच केली होती.

भारतावरील प्रेमापोटी एका आयरिश तरुणीने आपल्या संपूर्ण तारुण्याची आहुती दिली. त्याग आणि समर्पण याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भगिनी निवेदिता!

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required