computer

असंघटीत कामगारांचे सरकारी ओळखपत्र म्हणजेच 'इ श्रम'कार्ड काय आहे हे समजून घ्या !!

'इ' श्रम कार्ड काय आहे आणि  ते का महत्वाचे आहे हे समजून घेण्याआधी १९८०च्या दरम्यान घडलेला एक मनोरंजक आणि प्रेरणादायक किस्सा वाचू या..१९८२ सालची गोष्ट - जगातल्या पहिल्या आशियाई खेळाचे यजमानपद आपल्याकडे होतं.तसं आपल्याला यजमानपद देण्याचं १९७६ सालीच नक्की झालं होतं पण काही राजकीय कारणांमुळे आशियाई खेळांसाठी लागणारी तयारी   आपण करूच शकलो नव्हतो.दिल्लीत रस्ते धड नव्हते. येणार्‍या पाहुण्यांची निवासाची सोय नव्हती.पुरेशा बसगाड्या नव्हत्या.इतकंच काय खेळासाठी स्टेडीयमही नव्हतं ! असं होता होता १९७९ साल उजाडलं !आता हातात फक्त तीन वर्षं होती.त्या दरम्यान आशियाई खेळाची आंतराष्ट्रीय समिती तयारीचा अंदाज घ्यायला दिल्लीला पोहचली.एकूण चित्र त्यांना फारसं आशादायक दिसेना.६०००० माणसांची बसण्याची व्यवस्था असलेलं जवाहरलाल नेहरू स्टेडीयमचं बांधकाम अशा टप्प्यात होतं की ते वेळेत झालं नाहि तर खेळ रद्दच करावे लागले असते. हे चित्र बघून समितीच्या अध्यक्षांनी पंतप्रधान इंदिरा गांधींसमोर त्यांचा संशय स्पष्ट शब्दात व्यक्त केला

जगातील कोणतीही आश्चर्ये बघा त्यावर हक्क आहे 'असंघटीत कामगारांचाच !

'तुमच्याकडे आवश्यक अशा क्रेन्स नाहीत- बुलडोझर कमी आहेत-जेसीबी  पुरेशी नाहीत ,  हे बांधकाम होणार कसे? यावर इंदिराजींनी एकच उत्तर दिले 'या सगळ्या मशिनची ताकद आमच्या मनुष्यबळात आहे ज्याची तुम्हाला कल्पनाच येऊ शकणार नाही' आणि तसंच झालं जे दिल्लीत आजपर्यंत नव्हतं ते त्या तीन वर्षात पूर्ण तयार झालं ! आशियाई खेळ यशस्वीरित्या पार पडले.या यशाचं कागदोपत्री श्रेय अनेकांना मिळालं असेल पण त्यावर खरा अधिकार होता त्या मनुष्यबळाचा ज्याला आपण 'असंघटीत कामगार' म्हणून ओळखतो.

जगातील कोणतीही आश्चर्ये बघा त्यावर हक्क आहे 'असंघटीत कामगारांचाच !

६ कोटींहून अधिक कामगारांनी नोंद !!

याच ताकदीला एक मूर्त स्वरुप आणि मान्यता देणारे कार्ड म्हणजे नुकतेच आलेले इ श्रम कार्ड !!

देशभर विविध क्षेत्रात काम करणारे कामगार असंघटित क्षेत्रातील कामगार म्हणून ओळखले जातात. इतर क्षेत्रांप्रमाणे या लोकांचे संघटीत अशी ओळख नसते. याच लोकांना ही ओळख मिळवून द्यावी या उद्देशाने २६ ऑगस्ट २०२१ रोजी इ-श्रम पोर्टलची स्थापना करण्यात आली आहे.

असंघटित क्षेत्रातील कामगार इ-श्रम पोर्टलवर नोंदणी करून अनेक सरकारी योजना तसेच इतर सुविधांचा लाभ घेऊ शकतात. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आकड्यांवरून आतापर्यंत ६ कोटींहून अधिक कामगारांनी इथे नोंद केली आहे.

असंघटित कामगार म्हणजे कोण ?

इ-श्रम कार्ड असंघटीत कामगारांना आणि असंघटीत उद्योगात नोकरी करणार्‍यांनाच मिळते म्हणून या दोन्ही बाबी आधी समजून घेऊ या.


घरून काम करणारे उदा: घरी सैपाक करून डबे देणारे -स्वतंत्र कामगार म्हणून काम करून रोजगार मिळवणारे (उदा:प्लंबर) किंवा असंघटीत क्षेत्रात काम करणार्‍यांना असंघटीत कामगार म्हणतात. सोबतच 'असंघटीत क्षेत्र' म्हणजे काय हे पण समजून घेऊ या.

'असंघटीत क्षेत्र' म्हणजे उत्पादन-विक्री-सेवा देणारी  कोणतीही संस्था किंवा  व्यावसायिक आस्थापना ज्यामध्ये १० पेक्षा कमी नोकरदार असतील.ESIC & EPFO या दोन्हीचा लाभ ज्या क्षेत्रात नसेल अशी आस्थापना म्हणजे असंघटीत क्षेत्र.

नमुन्यादाखल काही वर्गवारी येथे दिली आहे

घरकाम करणाऱ्या महिला,ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या ब्युटीशीयन,वृत्तपत्र विक्रेते,रस्त्यावरील विक्रेते'हॉटेल चालक;बिडी कामगार,ऑटो चालक'भाजी विक्रेते,बांधकाम कामगार,दुग्ध व्यावसायिक,प्रिंटिंग काम करणारे,सेन्ट्रींग कामगार,मॅकेनिक,लोहार,पशुपालन करणारे,शिलाई मशीन करणारे,सुरक्षा कर्मी,शेतमजूर,केशकर्तन करणारे कामगार,वीटभट्टी कामगार,आशा कर्मचारी/ अंगणवाडी सेविका,मजूर,सॉ मिल कामगार,सुतारकाम करणारे,फळ विक्रेते,मीठ कामगार,पेंटर, प्लम्बर,बचत,गट महिला,विणकर,इलेक्ट्रिशियन,हातगाडी चालवणारे, लेबलिंग आणि पॅकिंग करणारे

 

इ-श्रम पोर्टलवर नोंदणी करून रीतसर कार्ड बनवून घ्या

या इ-श्रम पोर्टलवर नोंदणी करून रीतसर कार्ड बनवून घेता येते. यातून मिळणारे फायदेही मोठे आहेत.

 

१ असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल.

 

२ सरकार असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या कार्यशक्तीचा मागोवा घेऊन त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील.

 

३ सरकारला असंघटित कामगारांसाठी धोरण तयार करण्यास मदत होईल. असे धोरण तयार करून त्याचा थेट फायदा त्यांनाच होईल.

 

४ हे कार्ड तयार करणाऱ्या कामगारांना सरकारकडून वर्षभरासाठी मोफत विमा तयार करून दिला जाईल.

 

५ या पोर्टलवर नोंदणी करून कार्ड बनविणाऱ्या कामगारांचा डेटा तयार करून त्यांच्यासाठी अनेक नविन योजना सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे.

 

 

इ-श्रम कार्ड कसे मिळवायचे

आता अशा क्षेत्रात कार्यरत असणार्‍यांनी इ-श्रम कार्ड कसे मिळवायचे ते बघू या. 
नोंदणी करण्यापूर्वी अटी आणि कागदपत्रे काय लागतात याची माहिती आता वाचू या.    
१ तुमचे वय १६ ते ५९ या गटात असेल तर नोंदणी करता येते. (१६-११-१९६१ ते १५-११-२००५) 
२ आधार कार्ड आवश्यक आहे. 
३ आधार कार्डाला जोडलेला मोबाईल नंबर माहिती असणे आवश्यक आहे.
४ बँकेच्या खात्याची पूर्ण माहिती जसे की  बँकेचे नाव -खाते क्रमांक वगैरे उपलब्ध असावी.
५ तुमचे उत्पन्न आयकरास पात्र नसावे.

जर  तुम्हाला इंटरनेट वापरणे सहज शक्य नसेल तर सीएससी म्हणजे जवळच्या कॉमन सर्वीस सेंटरला भेट द्या. 
जर इंटरनेट वापरण्याचे सहज कौशल्य तुमच्याकडे असेल तर https://eshram.gov.in/home या संकेतस्थळाला भेट द्या. त्या संकेतस्थळावर पूर्ण माहिती दिलेली आहे .नोंदणी करण्यासाठी पुढे https://register.eshram.gov.in/#/user/self येथे जा.तेथे 'स्टेप बाय स्टेप' माहिती देऊन त्वरीत कार्ड तयार करता येते. 
इ श्रमचा १२ आकडी नंबर एकदाच मिळतो आणि तो जन्मभर तोच राहतो. बदलत नाही.

कमेंटमध्ये फोटो टाका

जर तुम्ही किंवा तुमच्या जवळचे या क्षेत्रातील असाल तर लवकरात लवकर या पोर्टलवर नोंदणी करून घेतलेली चांगली. ही नोंदणी तुम्ही स्वतःपण करून घेऊ शकता !

जत तुमचे इ श्रम कार्ड तयार असेल तर कमेंटमध्ये फोटो टाका ज्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल

सबस्क्राईब करा

* indicates required