computer

शेअरबाजाराचे थोरले बाजीराव राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्‍ट्फोलिओत कोणते समभाग आहेत ? जाणून घ्या बित्तंबातमी !

राकेश झुनझुनवाला यांना कोण ओळखत नाही ? शेअरबाजाराच्या 'गेम'मध्ये ज्यांच्या हातात हुकुमाची सर्व पानं आहेत असा माणूस म्हणजे राकेश झुनझुनवाला ! बाजारात राकेश झुनझुनवालांच्या अनेक कहाण्या चवीचवीने चघळल्या जातात. त्यांची हुशारी - त्यांची गुंतवणूक करण्याची व्यूहनिती हा तर काहीजणांचा पीएचडी करण्याचा विषय झाला आहे. पण या सर्व किश्शांमध्ये त्यांची आजच्या तारखेस असलेली गुंतवणूक कोणीच उलगडून सांगत नाही. आमच्या बोभाटाच्या वाचकांसमोर आज आम्ही त्यांची आजच्या तारखेस असलेली गुंतवणूक किती आहे -कोणत्या कंपनीच्या शेअरमध्ये आहे तेच नेमक्या आकडेवारीत -कंपन्यांच्या नावासकट देणार आहोत.

आधी हे लक्षात घ्या की राकेश झुनझुनवालांची गुंतवणूक म्हणजे  Rakesh Jhunjhunwala and associates या गुंतवणूक कंपनीचा पोर्टफोलिओ !आजच्या तारखेस या पोर्टफोलिओची किंमत रुपये २८२९० कोटी इतकी आहे. एकूण ३५ वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ही गुंतवणूक करण्यात आली आहे. इतकी मोठी रक्कम ऐकून जर काळजाचा एक ठोका चुकला असेल तर लक्षात घ्या की हे एका रात्रीत घडलेले नाही.

एकेकाळी झुनझुनवाला तुमच्या आमच्यासारखेच सर्वसामान्य गुंतवणूकदार होते. प्रत्येक गुंतवणूकदाराच्या आयुष्यात एकदा कधीतरी असे वळण येते की त्याचे आयुष्य बदलून जाते. हे वळण येण्याची वाट बघण्याची मनाची तयारी असणे हेच फार महत्वाचे असते. आणि ते येतेच येते ! वॉरन बफे यांना वॉल्ट डिस्ने आणि अमेरीकन एक्सप्रेस ने हात दिला -जॉर्ज सोरॉसला ब्रिटिश पाऊंडाने हात दिला तसाच झुनझुनवालांना टायटन कंपनीने बक्कळ पैसा मिळवून दिला. २००३ साली  टायटनचे समभाग त्यांनी ३०/३५ रुपयात घ्यायला सुरुवात केली. आज टायटनचा भाव  रुपये २०७९ आहे. यापैकी बरेचसे समभाग विकून झाल्यावरही आज पोर्टफोलिओत ४४८५०९७० शेअर शिल्लक आहेत ज्याची किंमत ९४४१ कोटी रुपये आहे.  

हा झाला इतिहास ,आता वर्तमान काय आहे ते बघूया !
१ गेल्या ३ महिन्यांचा आढावा घेतला तर पोर्टफोलिओचा सगळ्यात मोठा हिस्सा म्हणजे ११% गुंतवणूक रिअल इस्टेट क्षेत्रात आहे. 
२ त्या खालोखाल औषध - बांधकाम -बॅंक- फायनान्स क्षेत्रात प्रत्येकी ६% गुंतवणूक आहे.
३ संकीर्ण, मिश्र, अनेकविध, विविध प्रकारचा व्यवसाय असलेल्या कंपन्यात ९% गुंतवणूक आहे.
४ उरलेल्या २० वेगवेगळ्या क्षेत्रात प्रत्येकी ३ % गुंतवणूक आहे. 

आता ही गुंतवणूकीची टक्केवारी समजून आपल्याला फायदा नाही कारण प्रत्येक क्षेत्रात शेकडो वेगवेगळ्या कंपन्या आहेत.नेमक्या कोणत्या कंपन्या त्यांच्या पोर्टफोलिओत आहेत याची यादी पण आता बघूया !

१ स्टार इन्शुरन्स या मेडीक्लेम विकणार्‍या कंपनीत त्यांचे होल्डिंग १७%वर आहे ज्याची किंमत ६९७२ कोटी आहे
२ अ‍ॅपटेक या सॉफ्टवेअर कंपनीत २३% वर गुंतवणूक आहे ज्याची किंमत २१२ कोटी आहे.
३ मेट्रो ब्रँड कंपनीत  १४.४३% होल्डिंग आहे ज्याची किंमत २१८० कोटी रुपये आहे.
४ त्या खालोखाल NCC Ltd.(नॅशनल कंस्ट्रक्शन कंपनी) ४७६ कोटी रुपये गुंतवणूक आहे.
५ नजारा टेक्नीलॉजी या कंपनीत १०% होल्डिंग आहे ज्याची  किंमत आहे ३७० कोटी रुपये.

 ही यादी फक्त टॉप ५ कंपन्यांची आहे. उरलेल्या कंपन्यांमध्ये होल्डिंग ९% ते १% इतकी आहे.

अशा प्रकारची गुंतवणूक कधीच कायम स्वरुपी नसते. जसा बाजार बदलेल त्याप्रमाणे टक्केवारी कमीजास्त होत राहते म्हणून गेल्या ३ महिन्यात कोणत्या क्षेत्रातील कोणत्या कंपन्यांचे शेअर त्यांनी विकले आहेत ते बघणेही अत्यावश्यक आहे.
टिव्ही-१८-मिडीया
१ वोकार्ट- फार्मा
२ अ‍ॅपटेक - कंप्युटर
३ टायटन - लाइफस्टाइल
४ इंडियन हॉटेल- हॉस्पीटालिटी
५ क्रिसील- कन्सल्टींग
६ डेल्टाकॉर्प- जमीन आणि बांधकाम.या सर्व कंपन्यात विक्री केली आहे .

सोबतच काही कंपन्यांमध्ये गुंतवणूक वाढवली आहे अथवा नव्याने केली आहे.
१ ज्युबिलंट फार्माकोवा
२कॅनरा बँक
३ इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स

आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की या माहितीचा फायदा कसा करायचा ? राकेश झुनझुनवाला यांनी अमुक कंपनीचे शेअर घेतले म्हणजे आपणही तेच घ्यावे असे नाही पण गुंतवणूकीची दिशा ठरवण्यासाठी ही माहिती उपयुक्त असते असे आम्हाला वाटते.असे म्हणण्याचे कारण असे आहे की बाजार एकाच माणसावर चालतो असे नाही. एखाद्याची चलती असली म्हणजे बाकीचे लोक गप्प बसलेले असतात असे नाही.
नव्याने बाजारात गुंतवणूक करणार्‍या बोभाटाच्या वाचकांच्या विचाराला दिशा मिळावी असा या लेखातील माहितीचा उद्देश आहे. प्रत्य्क्ष गुंतवणूक करण्यासाठी सेबी अधिकृत सल्लागाराचा विचार घेणे आवश्यक आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required