केल्व्हीन क्ले, प्राडा, जिमी शू.. अशा या १३ या ब्रँडमागील खरे चेहरे कधी पाहिलेत? पाहाच इथे मग..

फॅशन दुनियेतील अनेक ब्रँडसच्या मोहात बरेचजण असतात. या ब्रँडस मागील डोक्यालीटी कुणाची असेल असा प्रश्नही आपल्याला पडतो. केल्विन क्ले, प्राडा, गुच्ची यांसारखे ब्रँड कितीही फेमस असले तरी या ब्रँडमागील चेहरा अनेकांना अनोळखी आहे. बरं, या यादीत फक्त केल्व्हीन क्ले आणि प्राडाच नाही, तर इतरही अनेक आहेत. आज आपण याच जगप्रसिद्ध ब्रँड्सला आकार देणाऱ्या डिझायनर्सची ओळख करून घेणार आहोत. सुरुवात केल्व्हीन क्लेपासूनच करूया

१) केल्व्हीन क्ले 

केल्व्हीनला तारुण्यात पदार्पण केल्यावरच फॅशन डिझायनिंग बद्दल प्रेम निर्माण झाले. सुरुवातीला त्यांनी इतर छोट्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले. पण आता स्वतःचे काहीतरी करायला हवे, या विचाराने त्यांनी आपला एक मित्र Barry Schwartz यांना सोबत घेत केल्व्हीन क्ले याच नावाने न्यूयॉर्कला स्वतःचे स्वतंत्र काम सुरु केले. सुरुवातीला पुरुषी पोशाखांसाठी ओळखला जाणारा हा ब्रँड खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला तो महिलांचा पोशाख डिझाईन करायला सुरुवात केल्यावर. आज ७९ वर्षांचे केल्व्हीन क्ले यांच्याबद्दल जरी लोकांना विशेष माहिती नसली तरी त्यांच्या ब्रँडचे अंडरगारमेंट्स्, परफ्युम, बॅग्ज आणि सगळंच काही प्रसिद्ध आहे.  

२) ख्रिस्चीयन लाक्रोईक्स

२२ वर्षांच्या वयात  ख्रिस्चीयन खरेतर पॅरिस येथे इतिहास हा विषय शिकण्यासाठी आले होते. पण त्यांना एका टप्प्यावर कळून चुकले की आपले खरे प्रेम हे फॅशन डिझायनिंग आहे. २४ व्या वर्षी त्यांनी स्वतःची फॅशन डिझायनिंग कंपनी सुरू केली. आज ख्रिस्चीयन ७० वर्षांचे आहेत आणि त्यांचा ब्रँड जगात नावाजलेला आहे. 

३) ख्रिस्चीयन लाऊबोटीन 

ख्रिस्चीयन सुरुवातीला महिलांसाठी शूज डिझाईन करण्याचे काम करत. पुढे त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. कधी काळी प्रचंड प्रसिद्ध झालेले लाल तळ असलेले उंच टाचांचे शूज जगात फॅशन ट्रेंड ठरले होते. त्यांनी अनेक हॉलीवूड स्टार्स आणि अनेक राजघराण्यातील महिलांसाठी शूज तयार केले आहेत. 

४) जिमी शू 

जिमी शू आज ७३ वर्षांचे आहेत. पण या वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी शूजचा पहिला जोड तयार केला. लंडनमध्ये शिक्षण पूर्ण करून मग त्यांनी एका डिझाईन कंपनीत काम सुरू केले होते. तिथे पुरेसा अनुभव गोळा झाल्यावर त्यांनी स्वतःचे फॅशन स्टोअर उघडले. लंडन फॅशन वीकमध्ये त्यांचे काम जगभर नावाजले गेले. पुढे त्यांची घोडदौड सुरू झाली ती आजही थांबलेली नाही.

५) ल्यूसीयानो बेनेटन 

ल्यूसीयानो यांचे वडील त्यांच्या लहानपणीच वारले. म्हणून त्यांना घर चालवण्यासाठी कपड्यांच्या दुकानात कामास सुरुवात करावी लागली. पुढे त्यांनी पुरेसे पैसे गाठीशी जमा केले आणि स्वतःचे वायब्रंट स्वेटर तयार केले. जे चांगलेच गाजले. त्यांनी मग आपल्या भावंडांना सोबत घेत बेनेटन ग्रुपची सुरुवात केली. 

६) मानोलो ब्लाहनिक 

वोग हे जगप्रसिद्ध मॅग्झिन आहे. या मॅग्झिनमध्ये फुटवेअर संबंधित लेखन करत असताना मानोलो यांना आपण स्वतःचे फॅशन स्टोअर सुरू करायला हवे असे वाटले आणि त्यांचा प्रवास सुरू झाला. ज्या वोगसाठी ते लिहित होते त्याच वोगच्या कव्हर फोटोवर झळकण्याची त्यांनी कामगिरी केली. इतिहासातील वोगच्या कव्हरवर झळकणारे दुसरे व्यक्ती म्हणून त्यांनी विक्रम केला. 

७) मार्क जॅकोब

जॅकोब यांनी अतिशय कमी वेळेत स्वतःचा फॅशन ब्रँड सुरू केला. मार्क जॅकोब वयाच्या २४ व्या वर्षी अमेरिकन फॅशन जगतातील महत्वाचा पुरस्कार जिंकणारे सर्वात तरुण फॅशन डिझायनर ठरले होते. 

८) मायकल कोर्स 

कोर्स यांचा डिझाईन जगतात प्रवेश किशोरवयातच झाला होता. फॅशन डिझाईन प्रेमामुळे त्यांनी वयाच्या १७ व्या वर्षी न्यूयॉर्क येथील फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. पण तिथे ते वर्षभर देखील थांबले नाहीत. तिथून ते एका फॅशन स्टोरमध्ये जॉबला लागले आणि पुढे जाऊन स्वतःचेच महिलांचे पोशाख डिझाईन करणारे शॉप सुरू केले. 

९) म्युचा प्राडा 

प्राडा यांचा स्वतःचा फॅशन डिझाईनींगमधील बिझनेस होता. प्राडा यांनी वयात आल्यावर या व्यवसायात रस दाखवायला सुरुवात केली. या क्षेत्रात बऱ्यापैकी जम बसवल्यावर त्यांनी मग स्वतः डिझाइन केलेले महिलांसाठीचे पोशाख बाजारात आणले. पुढे त्यात पुरुषी पोशाखाची पण भर पडली. २०१४ साली म्युचा फोअच्या सर्वात पॉवरफुल महिलांच्या यादीत झळकल्या होत्या. 

१०) पाको रॅबेन 

पाको आज ८८ वर्षांचे आहेत. पण त्यांनी स्वतःचे कलेक्शन बाजारात आणले तेव्हा ते ३२ वर्षांचे होते. तर ३४ वर्ष वयात त्यांनी स्वतःची फॅशन कंपनी सुरू केली होती. त्यांनी डिझाईनिंगसाठी पेपर, प्लॅस्टिक, धातू यांचा वापर करण्यास सुरुवात केली. यामूळे जगभर त्यांची दखल घेण्यात आली होती. 

११) रॉबर्ट कॅवॅली 

रॉबर्ट यांनी आपले शिक्षण अर्धवट सोडून कापड प्रिंटींगची कंपनी सुरू केली. यात त्यांना चांगलेच यश आले. पुढे त्यांनी मग फॅशन कलेक्शन देखील बाजारात आणले. त्यांचे नाव आणि त्यांची कंपनी पुढे जाऊन फॅशन जगतात दिग्गज झाली.  

१२) टॉमी हिलफगर 

हिलफगर यांचा प्रवास बराच रंजक राहिला आहे. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी स्वतःचे स्टोअर, तर पुढच्या ५ वर्षांत दिवाळखोरी असा त्यांचा प्रवास झाला. ही वेळ आल्यावर त्यांनी नोकरी सुरू केली आणि स्थिरस्थावर आल्यावर पुन्हा स्वतःचा ब्रँड प्रस्थापित केला. यानंतर मात्र त्यांनी आजवर मागे वळून पाहिलेले नाही. 

१३) योजी यामामोटो 

योजी सुरुवातीला वकिलीच्या व्यवसायात होते. पण हे काम सोडून त्यांनी आईकडून टेलरिंग काम शिकून घेतले. पुढे त्यांनी एका फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेत फॅशन डिझायनिंग शिकून घेतले. १९८१ साली त्यांनी स्वतःचे कलेक्शन बाजारात आणले आणि त्यांचा ब्रँड जगभर प्रसिद्ध झाला. 

सबस्क्राईब करा

* indicates required