computer

काय आहे हुडीनी ट्रिक ? ही ट्रिक करण्याच्या नादात जादुगार चंचल लाहिरीचा जीव कसा गेला ?

जादूचे प्रयोग पाहायला तुम्हांला आवडतं ना? लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळे जादू पाहण्यासाठी उत्सुक असतात. म्हणून तर जादूगारांचे शो हाऊसफुल होतात. त्यांचे कारनामे बघून आपलाच आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही राव!! कुणी आगीसोबत खेळतं, तर कुणी जमिनीत स्वत:ला कित्येक दिवस गाडून घेतो. पण मंडळी, ते लोक जादूगार नसतात. ते व्यवस्थित शिकून स्टंटस् करत असतात. पण अनेक जादूगारांचे असे स्टंटस् करताना मृत्यू झाला असे आपण नेहमी वाचत आणि ऐकत असतो. हे स्टंट्स करताना केलेली छोटीशी चुकही जीवावर बेतण्याची शक्यता असते.  जर चांगले केले तर मॅजिक, आणि चुकीचे केले तर ट्रॅजिक!! असेच कोलकात्यात एका जादूगारासोबत घडले आहे मंडळी!! एका छोट्याशा चुकीमुळे त्याला मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. नेमके काय घडले ते बघूया...

(चंचल लाहिरी)

कोलकात्यातल्या चंचल लाहिरी या जादूगाराला स्वप्नातसुद्धा वाटले नसेल की आपण मोठ्या आत्मविश्वासाने दाखवतोय ती जादू ही आपल्या आयुष्यातील शेवटची जादूगिरी असेल. १६ जूनला चंचल जादू दाखवणार होते. त्यासाठी त्यांनी प्रशासनाची रीतसर परवानगीसुद्धा घेतली होती. पण भावाने प्रशासनासोबत एक गेम खेळला आणि तोच त्याच्या जीवावर बेतला. काय होता तो गेम ते आम्ही पुढे सांगणारच आहोत. आधी ज्या दिवशी ते ही जगप्रसिद्ध हुडीनी ट्रिक दाखवणार होते त्या दिवशी काय काय घडले त्याबद्दल आधी पाहू...

रविवारी भाऊ आपली सर्व टीम सोबत घेऊन कोलकात्यातील हावडा ब्रिजवर पोचला. कोलकातावासीयांना दुसऱ्यांदा हुडीनी ट्रिक दाखवण्यासाठी चंचल सज्ज झाला होता. नदीकिनारी लोकांनी तुफान गर्दी केली होती. विषय पण तसाच होता मंडळी!! एकतर हा भाऊ फेसम जादूगार आणि दुसरीकडे हुडीनी ट्रिक काय सगळ्याच जादूगारांना येत नाही. म्हणून चांगलीच गर्दी गोळा झाली होती. लोक टाळ्या आणि शिट्यांनी चंचलला प्रोत्साहन देत होते. चंचलचे हातपाय बांधण्यात आले. नंतर त्याचे शरीरही साखळीने बांधण्यात आले. एवढंच नाही तर साखळी सुटायला नको म्हणून साखळीला चक्क कुलूप लावण्यात आले. नंतर क्रेनच्या मदतीने त्याला पाण्यात सोडण्यात आले. 

जादू अशी होती कि काही मिनिटांनी कुलूप आणि साखळी उघडून चंचल बाहेर येईल. पण बराच वेळ झाला तरी चंचल काय बाहेर येईना राव!! वेळ जसजसा पुढे सरकायला लागला तसतशी लोकांना शंका यायला लागली. काहींनी पोलीस बोलावून घेतले. पोलिस आपला सगळा लवाजमा घेऊन हजर झाले. सोबत चांगले पोहू शकणारे डायव्हर्स म्हणजेच पाणबुडेही होते. मग सुरू झाली शोधमोहीम. पण चंचल काय सापडेना राव!! शेवटी जिथे चंचलने उडी मारली होती त्यापासून एक किलोमीटरवर चंचल सापडला... पण दुर्दैवाने तो जिवंत नव्हता.

मंडळी, तो वाचू शकला असता. पण त्याने पोलिसांना चुकीची माहिती दिली.  त्याने पोलिसांना आपण हुडीनी ट्रिक करणार आहोत हे सांगितलेच नाही. आपण फक्त एक नाव घेऊन पाण्यात उतरणार आहोत हे सांगितले. चंचलने पोलिसांना योग्य माहिती दिली असती तर पोलिसांनी तिथे सुरक्षेची व्यवस्था केली असती आणि चंचल वाचू शकला असता. 

पण मंडळी, तिथले लोकं सांगतात की चंचल हुडीनी ट्रिकचा मास्टर होता. त्याच्यासाठी हुडीनी ट्रिक काय कठीण नव्हती. याआधी २००२ आणि २०१३ मध्येसुद्धा त्याने हुडीनी ट्रिक करून दाखवली होती. त्यावेळी मात्र सुरक्षेसाठी त्याच्यासोबत पोलीस आणि पाणबुड्यांची सोय केलेली असायची. यापूर्वी एवढी व्यवस्था करुनही तिची काही गरज लागली नव्हती, तशी यावेळी पण लागणार नाही असे समजून त्याने यावेळी पोलिसांना खरे काय ते सांगितलेच नाही. पण यावेळी त्याचे नशीब काय जोरावर नव्हते राव!! 

हो, पण ही हुडीनी ट्रिक आहे तरी काय?

मंडळी, या जादूला फेसम जादूगार हॅरी हुडीनी यांच्या नावावरून हुडीनी ट्रिक असे संबोधले जाते. हा भाऊ २०० वर्षापूर्वी ती ट्रिक करून दाखवत असे. त्याच्यासारखी हुडीनी ट्रिक आजही कुणाला जमत नाही. तो वेगवेगळ्या प्रकारे हुडीनी ट्रिक करून दाखवत असे. लोखंडाच्या बॉक्समध्ये बसून पाण्यात उडी मारणे असो की साखळी आणि कुलुपांनी गुंडाळून पाण्यात उडी मारणे असो.. एकापेक्षा एक अवघड आणि रोमांचकारी जादूचे खेळ हा गडी दाखवायचा. पण ही ट्रिक ज्याला जमते त्यालाच जमते.  आजवर कित्येक लोकांना ही ट्रिक करण्याच्या नादात आपला जीव गमवावा लागला आहे. 

हुडीनी वाटर ट्रिक

हुडीनी वाटर ट्रिकमध्ये जादूगारचे हातपाय बांधण्यात येतात. त्यानंतर त्याला साखळीने बांधून तिला कुलूप लावण्यात येते. काहीही झाले तरी जादूगार सुटायला नको हा हेतू त्यामागे असतो.  नंतर त्याला पाण्यात फेकण्यात येते. पाण्यात फेकल्याच्या काहीच सेकंदानंतर हॅरी हुडीनी पाण्याच्या बाहेर येत असे. आता याच्यासाठी हॅरी कुठली ट्रिक वापरायचा त्यालाच माहीत राव!! पण या ट्रिकच्या नादात चंचलसारख्या तरुण जादूगाराचा जीव गेला...

तुम्हांला या दुर्दैवी घटनेबद्दल काय वाटते? आम्हांला कमेंटबॉक्समध्ये नक्की कळवा..