computer

अवघड वाटा दुर्गांच्या: कातळात कोरलेल्या सुंदर सर्पाकार पायऱ्यांचा आणि आगळ्यावेगळ्या पाणबुडी आकाराचा 'कोथळीगड'!!

महाराष्ट्रात उत्तरेला मध्यप्रदेशच्या सीमेपासून ते दक्षिणेला कर्नाटकाच्या सीमेपर्यंत अग्निज खडकाचा सह्याद्री पसरलेला आहे. याची लांबी अंदाजे ८५० किमी. आहे. अशा या राकट सह्याद्रीमध्ये आकाराने सर्व डोंगरांहून वेगळा असलेला असा कोथळीगड वसलेला आहे. कोथळीगडाचा आकार हा एका पाणबुडीसारखा (Submarine) आहे. अशा आकाराचा दुसरा कोणताही पर्वत सह्याद्रीमध्ये आढळत नाही. आज आपण याच आगळ्यावेगळ्या कोथळीगडाची सफर करणार आहोत.

कोथळीगड हा दुर्ग कर्जतपासून साधारण ३० किमी. अंतरावर आहे. आंबिवली हे याच्या पायथ्याचे गाव आहे. येथून पुढे कोथळीगडाचा ट्रेक सुरु होतो. हा रस्ता मातीचा आहे. तुमच्याकडे जीप किंवा तत्सम एखादी गाडी असेल तर तुम्ही कोथळीगडाच्या माचीपर्यंत म्हणजेच पेठमाची या गावापर्यंत सहज जाऊ शकता. पेठमाची गावातून कोथळीगडाकडे जाताना वाटेत एक स्तंभाच्या आकाराचा वीरगळ आपलं लक्षं वेधून घेतो. हा वीरगळ चारही बाजूंनी कोरलेला आहे, अशा वीरगळांना स्तंभाच्या आकाराचे वीरगळ असे म्हणतात. तेथून पुढे कोथळीगडाचा मुख्य उभार सुरु होतो. 

 ही वाट आपल्याला सरळ दुर्गाच्या पोटात असणाऱ्या लेण्यात घेऊन जाते. अर्ध्या वाटेत आपल्याला प्रवेशद्वाराचे अवशेष लागतात. ते पार करुन आपण दुर्गाच्या पोटात असणाऱ्या लेण्यांत येऊन पोहोचतो. याच्या बाजूलाच भैरोबाची गुहा आहे, त्यात भैरोबाची मूर्ती असून तेच इथले या दुर्गदैवत आहे. याच्या बाजूला असणाऱ्या मुख्य लेण्यांमध्ये अतिशय सुंदर व सुबक असे कोरीवकाम केलेले आहे. यामध्ये आकर्षक अशा सुरसुंदरी, कीर्तिमुख, मिथुनशिल्प, स्त्रीवादक, रत्नशाखा, मयूरशाखा, गणेश इत्यादी विविध प्रकारचे शिल्पकाम केलेले आढळते. या मुख्य लेण्याच्या आतमध्ये अजून एक खोली असून त्यातही असेच शिल्पकाम केलेले आहे. याबद्दल अधिक माहिती दुर्गवाटाच्या कोथळीगड व्हिडिओमध्ये आवर्जून पहा.

कोथळीगडाचे मुख्य आकर्षण म्हणजे त्याच्या सर्पाकार कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. कोथळीगडाच्या सुळक्याच्या पोटातील दगड फोडून तिथून हा सुंदर सर्पाकार जिना इथल्या दुर्गस्थपतींनी निर्माण केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात इतक्या सुंदर प्रकारचा जिना आपल्याला दुसरीकडे आढळत नाही. हाच मार्ग आपल्याला या दुर्गाच्या सर्वोच्च माथ्यावर घेऊन जातो. या रचनेमुळेच या दुर्गाला कोथळीगड हे नाव मिळाले आहे, कारण दुर्गस्थपतींनी खडकाचा कोथळा बाहेर काढून याचा मार्ग निर्माण केला आहे. या पायऱ्यांवरून वर आल्यावर आपल्याला कोथळीगडाचे मुख्य प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला 'हत्ती' व 'शरभ' हि दुर्गशिल्पे कोरलेली आहेत. हे पाहून आपण माथ्यावर प्रवेश करते होतो. येथे खूप कमी जागा आहे, वर फक्त एक पाण्याचे टाके आहे. येथून आपल्याला संपूर्ण परिसर उत्तमरीत्या न्याहाळता येतो. येथून आपल्याला सिद्धगड, गोरखगड, तुंगी, समोरच असणारा पदरगड इ. दुर्ग तसेच बैलदरा, वाजंत्री, फेण्यादेवी, खेतोबा, कौल्याची धार इ. महत्त्वाचे घाटमार्ग दृष्टीस पडतात. तसेच पदरगडाच्या मागच्या बाजूला भीमाशंकरचा नागफणी पॉईंट आपल्याला सतत साद घालीत असतो. या दुर्गाच्या सुळक्याच्या सर्व बाजूनी पाण्याच्या मोठ्या टाक्या खोदलेल्या आहेत. या बघताना आपली कोथळीगडाच्या सुळक्याला एक प्रदक्षिणा पूर्ण होते.

आता आपण कोथळीगडाच्या इतिहासाकडे वळूया. कोथळीगडाचा रक्तरंजित इतिहास हा शिवछत्रपतींच्या निर्वाणानंतरचा आहे. इ.स.१६८४ साली औरंगजेबाने अब्दुल कादर व अलाईबिरादारकानी या दोघांना मराठ्यांच्या ताब्यातील कोथळीगड घेण्यासाठी पाठवले. कारण कोथळीगड हा कोकणातील महत्वाचा दुर्ग होता, त्यामुळे याचे महत्त्व ओळखून औरंगजेबाने ही चाल केली. शंभूछत्रपतींच्या काळात कोथळीगडावर मराठ्यांचे शस्त्रागार होते. त्यामुळे येथून नेहेमी शस्त्रांची ने-आण सुरु असे. ही बातमी अब्दुल कादरला समजताच त्याने ३०० बंदूकधारी सैन्यासह किल्ल्यावर हल्ला चढवला. मराठ्यांनी त्यांचा नेटाने प्रतिकार केला परंतु त्यात त्यांना अपयश आले व हा महत्वाचा दुर्ग मोगलांच्या ताब्यात गेला. 

 दुसऱ्याच दिवशी मराठ्यांनी कोथळीगडाला वेढा घातला व मोगलांचे दळणवळणाचे मार्ग बंद केले. यावेळी मोगलांचा जुन्नरचा ठाणेदार अब्दुल अजिजखान याने त्याचा मुलगा अब्दुलखानाला मदतीसाठी कोथळीगडाकडे पाठवले. ही बातमी समजताच मराठ्यांचे सरदार नारोजी त्रिंबक यांनी त्याची वाट आडवली. या युद्धात नारोजी त्रिंबक व काही मराठी सरदार धारातीर्थी पडले. अशा प्रकारे मराठ्यांना दुसऱ्या वेळीदेखील अपयश आले. असाच एक अपयशी प्रयत्न मराठ्यांनी इ.स.१६८४ च्या डिसेंबर महिन्यात केला. त्यामुळे हा महत्वाचा दुर्ग कायमचा मराठ्यांच्या हातून निसटला. यानंतर इ.स.१८१७ साली दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या वतीने बापूराव नामक सरदाराने ब्रिटिशांकडून हा दुर्ग जिंकून घेतला. या दुर्गावर सुमारे इ.स.१८६२ पर्यंत माणसांचा राबता होता

तर असा हा उत्कृष्ट दुर्ग जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही तो एका दिवसात नक्की पाहू शकता. तेथपर्यंत खाली दिलेल्या व्हिडिओ मार्फत या दुर्गाबद्दल अधिक माहिती जाणून घ्या व तुमच्या मित्रपरिचितांना पण सांगा.

लेखकः अथर्व बेडेकर -पुरातत्व अभ्यासक

सबस्क्राईब करा

* indicates required