computer

९ वर्षांची दत्तक मुलगी, निघाली खरंतर २२ वर्षांची....सिनेमाची ष्टोरी नाही, खरं असं घडलंय भाऊ!!

२००९ साली ‘ऑर्फन’ (Orphan) नावाचा सिनेमा आला होता. या सिनेमाची कथा ९ वर्षांच्या इस्थर नावाच्या मुलीची आहे. इस्थर अनाथ मुलगी असते. तिला एक कुटुंब दत्तक घेतं. नवीन घरात आल्यावर विचित्र गोष्टी घडायला लागतात. सिनेमाच्या शेवटी समजतं की इस्थर ९ वर्षांची नसून ३३ वर्षांची बाई आहे. तिला hypopituitarism हा विकार असतो.

हाइपोपिटुइटरिझम हा एक दुर्मिळ विकार आहे. या आजारात आपली पिट्यूटरी ग्रंथी एक किंवा अधिक हार्मोन्स तयार करण्यास अपयशी ठरते किंवा पुरेसे हार्मोन्स तयार करत नाही. याचाच एक परिणाम म्हणजे शरीराची वाढ खुंटते. 

२००९ सालच्या सिनेमातली ही कथा आता नुकतीच खऱ्या आयुष्यात घडली आहे.

२०१० साली क्रिस्टीन आणि मायकेल बार्नेट यांनी ९ वर्षांच्या युक्रेनियन मुलीला दत्तक घेतलं होतं. तिचं नाव नतालिया. काही वर्षांपूर्वी क्रिस्टीन आणि मायकेलवर मुलीकडे दुर्लक्ष केल्याने खटला दाखल करण्यात आला होता. पण क्रिस्टीन म्हणते की नतालिया लहान नसून ती २२ वर्षांची तरुणी आहे. एवढंच नाही तर ती मनोरुग्ण देखील आहे.

मंडळी, क्रिस्टीन म्हणते की नतालिया लहान नव्हती तिला तरुण मुलींप्रमाणे पाळी यायची. लहान मुलं करणार नाहीत अशा गोष्टी ती करायची. तिचं खरं रूप समोर आल्यावर तिने घरच्यांना मारण्याचा प्रयत्न केला. तिने एकदा क्रिस्टीनच्या कॉफीमध्ये ब्लिचिंग पावडर मिसळण्याचा प्रयत्न केला होता. अशा घटनानंतर क्रिस्टीन आणि मायकेल यांनी नतालियाची तपासणी करून घेतली. तपासणीत समजलं की ती १४ वर्षांची आहे. एका घटनेत तर नतालियाने क्रिस्टीनला विद्युत तारा असलेल्या कुंपणाकडे ओढून नेलं होतं. यानंतर २०१२ साली तिची रवानगी मनोरुग्णालयात करण्यात आली. याच काळात तिने स्वतः बद्दल खरी माहिती सांगतली.

नतालियाला बुटकेपणाचा आजार आहे. याशिवाय ती मनोरुग्ण देखील आहे. तिचा जन्म २००३ साली झाला असं नोंदवण्यात आलं होतं पण ती  प्रत्यक्षात १९८९ साली जन्मली होती.

सध्या नतालिया क्रिस्टीन आणि मिकेल यांच्या सोबत राहत नाही. ती तिच्या नव्या आईवडिलांसोबत राहते. तिच्या नव्या आईवडिलांना तिच्यात कोणतीही विचित्र गोष्ट दिसलेली नाही. कदाचित तिच्यावर जे उपचार झाले त्याचा हा परिणाम असावा.

सबस्क्राईब करा

* indicates required