मुसलमानाने बांधलेले शिवमंदिर - श्री कुणकेश्वर !!!

देवगडपासून काही किलोमीटर अंतरावर कुणकेश्वराचे प्राचीन शिवमंदिर आहे. या मंदिराच्या बांधकामाविषयी एक अजब गजब दंतकथा सांगितली जाते.

फार फार वर्षांपूर्वी इराण आणि भारताचा व्यापार समुद्रमार्गे चालायचा. एका इराणी मुसलमानाची मालाने भरलेली गलबते कोकण किनाऱ्याला येताना रात्री वादळात सापडले. घाबरलेल्या इराणी मुसलमानाने देवाचा धावा केला आणि तत्याला समोर लांब अंतरावर किनार्यावरील दिवे दिसले. जीवाच्या आकांताने त्याने प्रार्थना केली “जो कोणी देव माझी गलबते सुरक्षित किनार्यावरती पोहोचविल त्या देवाचे याच ठिकाणी मी मंदिर बांधीन.” नशिबाने सर्व जहाजे किनाऱ्याला सुखरूप पोहोचली. किनार्यावर उतरताना त्या व्यापाऱ्याच्या नजरेस एक शिवलिंग पडले. त्याला रात्री केलेला नवस आठवला आणि याच देवाने आपले प्राण वाचवले असे समजुन त्याने श्री कुणकेश्वराचे मंदिर बांधले. प्राण वाचवणाऱ्या देवात आणि आपल्यात अंतर पडू नये म्हणून भावनेच्या भरात मंदिराच्या कळसावरून उडी मारून त्याने प्राण दिला. त्याची कबर कुणकेश्वर मंदिराच्या परिसरात उत्तरेस आहे. मुसलमानाने मंदिर बांधले असल्याने या मंदिरावर काही संस्कार हिंदू आणि मुस्लीम दोन्ही पद्धतीचे दिसतात. उदाहरणार्थ, मंदिराच्या दरवाजासमोरील पायऱ्या मशिदीच्या पायऱ्यांसारख्या अर्धचंद्र आहेत.

(ही दंतकथा आहे. सत्यासत्यतेची पडताळणी करणे आम्हाला शक्य नाही. वरील संदर्भ प्रेक्षणीय महाराष्ट्र या पुस्कातून घेतला आहे.)

परंतु http://kunkeshwar.com या संकेतस्थळाच्या माहितीनुसार :

एक मुस्लीम व्यक्तीकडुन हिंदु मंदिर कसे काय उभारण्यात आले. त्यामुळे हि दंतकथा अभ्यासकांना खटकण्यासारखीच होती. त्यामुळे कुणकेश्वरच्या इतिहासाचा अधिक चौकसपणे अभ्यास होऊ लागला. १९६० च्या सुमारास शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी कुणकेश्वर मंदिरास भेट दिली. त्यावेळी बाबासाहेबांनी मंदिर परिसराची चिकीत्सक दृष्टीने पाहणी केली. आणि थडगे म्हणून दाखवली जाणारी इमारत हि, हिंदु मंदिराची असुन आतील थडगे समजला जाणारा मातीचा ढिगारा बनावट असल्याचे साधार पुराव्यानिशी दाखवून दिले. अशाप्रकारे बाबासाहेब पुरंदरे यांनी कुणकेश्वर मंदिराच्या इतिहासातील सत्य परिस्थिती सर्वांसमोर आणली. त्यानंतर कोंकणातील गावह्राटी पुस्तकाचे लेखक श्याम धुरी तसेच साप्ताहिक अणुरेणूचे माजी संपादक रणजित हिर्लेकर या अभ्यासकांनी ही याविषयी संशोधन केले असुन, "कुणकेश्वर मंदिर हे अरबी व्यापार्‍याने बांधले नसुन हे मंदिर कदंब, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव यांसारख्या हिंदू साम्राज्य काळातील आहे. आणि थडगे समजले जाणारी वास्तू हि एक बाटवलेले शिवमंदिर आहे." असा निष्कर्श सर्वांनी मांडला आहे. अरब व्यापार्‍याची कथा हि वारंवार आक्रमण करणार्‍या मुसलमानी सरदारांच्या डोळयात धूळ फेकण्यासाठीच केलेली एक व्यूहरचना होती. मंदिराच्या रक्षणासाठीच मुस्लिम व्यापाराने हे मंदिर बांधल्याचे कथानक मुद्दामच पसरविण्यात आले. पण तीच दंतकथा होऊन आपल्या पुढे उभी आहे. पनवेलजवळच्या कणकेश्वर मंदिराच्या बांधकामाविषयी देखील कुणकेश्वर मंदिरासारखीच अरबी व्यापार्‍याची कथा सांगीतली जाते. तसेच राजापुरच्या अंजनेश्वर मंदिराच्या बांधकामाविषयी देखील हिच कथा सांगितली जाते. अनेक ठिकाणी मंदिरांच्या रक्षणासाठी अशी थडगी उभारली गेली आहेत. रामेश्वर मंदिराच्या सभामंडपालगत दिपमाळेच्या रांगेत असेच एके बनावट थडगे आहे. ही सर्व सुलतानी तडाख्यातून मंदिरे वाचविण्यासाठी केलेली एक व्यूहरचना होती.

सबस्क्राईब करा

* indicates required