यावर्षी हिवाळ्यातली सहल आखा आंध्र प्रदेशात. का? अहो तिथं या गावात चक्क बर्फ पडतो

बर्फ पडलेला एखादा फोटो म्हणलं तर तुमच्या समोर गुलमर्ग, मनाली, सिमला असे नाव येतात ना? पण आज आम्ही ह्यात एका अनोख्या नावाची भर घालणार आहोत.  दक्षिण भारत म्हणल्यावर आपल्या डोळ्यासमोर याविरुद्ध म्हणजेच अगदी कोरडं आणि उष्ण वातावरण येतं. पण दक्षिण भारतात म्हणजेच आंध्र प्रदेशमधल्या विशाखापट्टणम जिल्ह्यात लंबसिंगी नावाचं एक गाव आहे.  या गावाची खासियत म्हणजे या त्याला आंध्रप्रदेशचं काश्मीर म्हणून ओळखलं जातं. तुम्ही नशीबवान असाल तर तुम्हाला या गावात बर्फ पडतानासुद्धा बघता येऊ शकतो.

दक्षिण भारतात बर्फ पडणारं हे एकमेव ठिकाण आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची साधारण एक हजार मीटर आहे. वर्षभर धुक्यानं नटलेलं हे गाव आणि आजूबाजूच्या दऱ्या यांचं तापमान हिवाळ्यात खाली जायला सुरू होतं. ऑक्‍टोबर ते डिसेंबर या काळात हे तापमान शून्याच्याही खाली जातं आणि मग इथे बर्फाचा अनुभव घ्यायला मिळतो. आंध्र प्रदेश ते काश्मीर या नावाशिवाय कोरा बायलो या नावाने हे हिल स्टेशन ओळखलं जातं. स्थानिक भाषेत कोरा बायलो याचाच अर्थ कुणी जर रात्रभर बाहेर राहिले तर बर्फाची काडी तयार होईल असा अर्थ होतो. 

इथं कसं जायचं?
या गावाला जायचं तर   सर्वात जवळचं विमानतळ विशाखापट्टणमला आहे. विशाखापट्टणमपासून हे गाव १०७   किलोमीटर अंतरावर आहे. तशा लंबसिंगीला जायला  पब्लिक आणि प्रायव्हेट बसेस सुद्धा आहेत.  तसंतर तुम्ही आपली कार पण घेऊन जाऊ शकता. नोव्हेंबर ते जानेवारी हा इथे भटकायचं सर्वोत्तम काळ आहे. इथे तापमान शून्याच्या खाली जरी जात असलं तरी दर हिवाळ्यात  बर्फ पडेलच असे नाही बरं.  त्यासाठी तुमचे  नशीब असावं लागतं.  लंबसींगीला  आलात तर इथं जवळच  कोथापल्ली धबधबे आहेत.  त्याशिवाय रात्रभर कॅम्पिंग करणे हा पण एक मस्त अनुभव असतो. 
तर मंडळी, या आंध्राच्या काश्मीरला तुम्ही जाऊन भटकंती करून येणार का नाही??

सबस्क्राईब करा

* indicates required