computer

काय असते हे लॅंड आर्ट- अर्थ आर्ट?

यांत्रिकीकरणाचे जसे फायदे तसे तोटेही आहेत. अघळपघळ गावांच्या ठिकाणी आखीव-रेखीव सिमेंटची जंगलं आली. भारतातल्या हवामानासाठी काचेची तावदानं असलेल्या इमारती अनुकूल नसल्यातरी आजकाल मोठ्या शहरांत त्यांचा सुळसुळाट झालेला दिसतो. थोडक्यात, यांत्रिकीकरणामुळे आणि आधुनिकतेच्या काहीशा अट्टहासामुळे निसर्गापासून माणसाचं दुरावलेपण वाढू लागलं. ही बाब बर्‍याच लोकांना खटकली तरी मोठं पाऊल उचललं ते रॉबर्ट स्मिथसन या अमेरिकन कलाकाराने. त्यांनी निसर्गातल्याच वस्तू म्हणजे दगड, माती, ओंडके, झाडे, वेली, बांबू तर कधी कापड  वापरून कलाकृती निर्माण करण्याची चळवळ चालू केली.  या चळवळीला लॅंड आर्ट किंवा अर्थ आर्ट  असं म्हटलं जातं.  लॅंड आर्ट  निसर्गात तशीच ठेवली जाते आणि कालांतराने ती कलाकृती ज्या साहित्यापासून बनवलेली असते, त्यानुसार तिचं विघटन होतं किंवा ती मोडून पडते. 

साधारण कोणतीही कलाकृती त्या-त्या  कलाकाराच्या नावाने ओळखली जाते आणि जतनही केली जाते. इथं ते होत नाही.  इथं ती आर्ट मूर्तस्वरूपात जर राहात असेल, तर ती राहाते फक्त फोटोजच्या स्वरूपात. कलाकाराने निर्माण केलेल्या कलेपासून स्वत:ला इतकं अलिप्त करून घेणं हे ही या कलेचं वेगळेपण. या कलेच्या बाबतीत नेहमीच्या केलेतले  ठोकताळे गैरलागू ठरतात.

स्पायरल जेट्टी- रॉबर्ट स्मिथसन

स्पायरल जेट्टी हे रॉबर्ट स्मिथसन यांचे प्रसिद्ध लॅंडआर्ट.  अमेरिकेतल्या ’उटा’ राज्यातल्या ग्रेट सॉल्ट लेकच्या किनार्‍यावर ही कलाकृती १९७०मध्ये बनवण्यात आली होती.  चिखल, मिठाचे स्फटिक आणि बेसॉल्ट दगडांपासून बनवलेली ही जेट्टी १५०० फूट लांब आणि १५फूट रूंद आहे. सुमारे ७०००टन खडक वापरून केलेली ही कलाकृती बनवायला ९ दिवस लागले. पाण्याला खूप ओहोटी आल्यानंतर हे शिल्प दिसते. या वर्षी २०१६च्या मार्च महिन्यात ते दिसून आले होते. 

 

रिचर्ड शिलिंग

रिचर्ड शिलिंग हे लॅंड आर्ट क्षेत्रातलं आणखी एक मोठं नांव. निसर्गात सापडणार्‍या दगड, लाकूड, हिम अशा वस्तू वापरून कलाकृती बनवणं ही त्यांची खासियत आहे.

देतमार वूरवोल्ड(Dietmar Voorwold)

साध्या दगडांतूनही किती सुंदर कलाकृती तयार होते.. नाही?

ब्रॉनवेन बेर्मन ( Bronwyn Berman)

या आकाराला काय म्हणावं? आपल्या आजूबाजूला दिसणार्‍या या वस्तू आपण कचरा म्हणून बाजूला सारू किंवा गावाकडे तर चक्क जाळून त्यावर पाणी तापवू.

पण कलाकाराला त्यात कलाकृती दिसते आणि आपण भारावून जातो. या आर्टचं आयुष्य किती? एक-दोन दिवस.. वारा नाही सुटला तर फारतर एक आठवडा. खरं तर आठवडा म्हणजे खूपच जास्त झालं. पण ब्रॉनवेन बेर्मन यांना तिचं आयुष्य किती यापेक्षा तिच्यातल्या सौंदर्यात अधिक रस आहे..

सॅली स्मिथ (Sally J. Smith)

ओबडधोबड आकारांतून  आणलेल्या या रेखीवतेला आपला साष्टांग नमस्कार!!

शिल्पा जोगळेकर

शिल्पा जोगळेकर या भारतातच नाही, तर परदेशांतल्याही लॅंड आर्ट उपक्रमांत भाग घेत असतात. त्यांच्या अनेक शिल्पांपैकी हे जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये तयार केलेली ही कलाकृती. कौटुंबिक हिंसाचारातून बाहेर पडणार्‍या स्त्रीला या शिल्पातून कलाकृतीमधून दाखवण्यात आलंय. लाल दोरे म्हणजे जणू तिला बांधून ठेवणारे , पण त्रासदायक हिंसात्मक बंध. त्यातल्या कोषातून निघून ती बाहेर पडू पाहतेय. 

सबस्क्राईब करा

* indicates required