computer

नव्या पालकांसमोरचे या शतकातले मोठे आव्हान - येणार्‍या नव्या पिढीला तुम्ही समजू शकाल का ?

आता पहिल्यासारखं काही उरलं नाही -आमच्यावेळी असं नव्हतं-तुमची पिढी नशिबवानच ! अशी वेगवेगळी 
वाक्यं ऐकून कंटाळलेल्या आमच्या बोभाटाच्या वाचकांसाठी म्हणजे 'मिलिएनल आणि जेन झी' च्या सभासदांसाठी हा आजचा लेख आहे. 
पिढ्या बदलत असतातच तरी मागून येणाऱ्या पिढीला अशी वाक्यं नेहमीच ऐकावी लागतात.

आज जे तिशी किंवा चाळीशीत आहेत,म्हणजेच ज्यांचा जन्म १९८१-१९९०च्या दरम्यान झाला आहे, त्यांंच्यासाठी एक खास बातमी अशी की जनरेशन अल्फा या नव्या पिढीदर्शक नावाचा जन्म झाला आहे. मार्क मॅकक्रिंडल नावाच्या एका संशोधकाने हे नवे नाव पुढे आणाले आहे तर जनरेशन अल्फा म्हणजे कोणती पिढी? तर २०१० नंतर म्हणजे आयफोनच्या जमान्यात जन्मलेल्या मुलांना या पिढीत गणले जाईल. प्रत्येक पिढीला १९८० नंतर आणि नव्या सहस्रकानंतरची पिढी यांच्यापुढील आव्हाने आणि जनरेशन अल्फा पुढील आव्हाने ही वेगळी असणार आहेत. आज आपण या नव्या पिढीबद्दल थोडंस जाणून घेणार आहोत.आजची पिढी म्हणजे जनरेशन अल्फा आणि ही पिढी यांची जर तुलना केली तर बराच फरक जाणवेल. 

२०१० च्या दशकातच आयफोनचा जन्म झाला आणि या पिढीला चोखणीच्या जागी हातात आली ती थेट स्क्रीनच ! मोबाइल किंवा स्मार्ट फोन नाही तर थेट आयफोनच्या सानिध्यात वाढणारी ही पिढी किती स्मार्ट असेल याचा अंदाज बांधलेला बरा. असे म्हटले जाते की, मागच्या कोणत्याही पिढीपेक्षा जास्त हुशार असेल कारण यांना मिळणारे शिक्षण खूप उच्च दर्जाचे असणार आहे.हा अर्थातच पुढे जाऊन वादाचा विषय होणार आहे.

या पिढीला काही वरदान लाभले असले तरी तिच्या समोरील आव्हानेही तेवढीच तगडी असणार आहेत. या मुलांनी अजून शाळेची पायरीही चढली नाही तोवर तिच्या समोर कोरोना सारख्या जागतिक महामारीचे संकट उभे राहिले आहे.काही मुलं नुकतीच शाळेत जाऊ लागली असतील तोपर्यंत त्यांची शाळा बंद पडली आहे. म्हणूनच 'व्हर्चुअल शाळा' अटेंड करणारी ही पहिली पिढी आहे.यांच्या ज्ञानसाधनेत खंड पडणार नसला तरी सोशल डिस्टन्सिंगमुळे याचं समाजीकरण काहीसं कच्चं राहील का? अशीही शंकेची पाल चुकचुकल्या शिवाय राहत नाही. 

या पिढीच्या पालकांना घरात थांबण्यास उसंतच नाही. कोरोनाने 'वर्क फ्रॉम होम'ची संस्कृती आणली असली तरी घरात राहूनही पालक आणि मुलं यांच्यातील संवाद तसा कमीच राहीला. पूर्वीच्या काळी या वयातील मुलांचे बोबडे बोल ऐकण्यास सगळं घर आतुरलेलं आणि आसुसलेलं असायचं.आता मात्र फक्त आई-बाबा मुलं आणि मोबाइल किंवा लॅपटॉप. आजी-आजोबा सुद्धा व्हर्चुअल माध्यमातूनच गोष्टी ऐकवू शकतात. अशाने आपल्या माणसांच्या स्पर्शाची भूक भागवली जाईल का? 

म्हणूनच बुद्धीने स्मार्ट असणारी ही पिढी भावनेने कोरडी तर राहणार नाही ना,स्मार्ट डिव्हाईसमुळे अति उतावीळपणाला ही पिढी बळी तर जाणार नाही ना, अशी भीती वाटते. कोरोना, सोशल डिस्टन्सिंग, व्हर्चुअल जग, या सगळ्याचा या पिढीवर नेमका काय परिणाम होणार आहे हे अजूनही पुरेसं स्पष्ट झालेलं नाही. ते तर येणारा काळच सांगू शकेल. कदाचित या शंका काही दिवसातच दूर होतीलही पण आज मात्र या शंकेचं सावट त्यांच्या पालकांवर आहेच.

अर्थात मागच्या पिढी काढून ‘आमच्या वेळी असं नव्हतं’ आणि ‘आताच्या मुलाचं काही खरं नाही,’ अशी वाक्यं याही पिढीला ऐकण्याशिवाय पर्याय नाही हे तर नक्कीच आहे.
 

आपल्या देशात एकेका पिढीला अशी स्वतंत्र नावं देण्याची पध्दत नाही. पण पुढारलेल्या देशात एकेका पिढीला वेगळं नाव देण्याची प्रथा फार जुनी आहे. बदलणार्‍या गरजा- विचार- वागणूक दर्शवून देण्यासाठी अशी नावं देण्यात आली. अशा नामावल्या तयार करण्यामागे सामाजिक विचारांसोबत आर्थिक विचार पण असतात. 'मार्केट ओरिएंटेड' म्हणजे बाजारीकरणासाठी सोपं जावं म्हणूनही नावं प्रचारात आली असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. 

बोभाटाचे जे वाचक या नव्या अल्फा जनरेशचे पालक आहेत किंवा होण्याच्या बेतात आहेत त्यांनी मार्क मॅकक्रिंडलचे Generation Alpha: Understanding our children and helping them to thrive हे पुस्तक वाचायलाच हवे. 

किंवा नाही वाचलं तरी हरकत नाही कारण त्या पुस्तकाचा मराठी सारांश आम्ही लवकरच बोभाटावर वाचायला मिळेल !

मेघश्री श्रेष्ठी

 

सबस्क्राईब करा

* indicates required