computer

एका तेलियाने: सौदीच्या तेल मंत्रीपदावर सर्वाधिक काळ टिकलेला 'तेलिया' !!

सौदी अरेबियाला १९७३ सालच्या तेल संकटातून सुखरूप बाहेर काढणारा आणि तेल मंत्रीपदावर सर्वाधिक काळ टिकलेला 'तेलिया' २४ फेब्रुवारी २०२१ला या जगातून निघून गेला. त्याचं नाव "शेख अहमद झाकी यामानी". वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

यामानी यांच्यावर गिरीश कुबेर यांनी लिहिलेले "एका तेलियाने" हे पुस्तक मराठीतील सर्वाधिक गाजलेल्या पुस्तकांपैकी एक आहे. आजच्या दिवशी या पुस्तकाचा परिचय करून देणे अस्थानी ठरणार नाही. म्हणूनच बोभाटा आजच्या लेखातून या पुस्तकाचा संपूर्ण परिचय करून देणार आहे.

आंतरराष्ट्रीय राजकारण हे जितकं रोचक तितकंच क्लिष्ट. तिथे एकाच वेळी प्रत्येक जण आपला पट मांडतो, आपली चाल खेळतो आणि त्याच वेळी प्रत्येक जण इतरांच्या पटावरचे प्यादे असतो. अशा या बहुआयामी राजकारणात जसजसं जग जवळ येऊ लागलं तसतशी अधिक क्लिष्टता व प्रसंगी अधिक रोचकता येऊ लागली. त्याच बरोबर हा पट शांत डोक्याने मांडून व इतरांच्या पटांवरील आपली परिस्थिती लक्षात घेऊन ज्यांनी हा खेळ खेळला ते त्या त्या मार्गाने पुढे गेले व इतर अनेक जण त्या खेळात वाईट प्रकारे भरडले गेले.

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर कोणत्या एका गोष्टीभोवती आंतरराष्ट्रीय राजकारण फिरलं हा प्रश्न विचाराल, तर "तेल" हे उत्तर कोणीही देईल. पण केवळ हे उत्तर माहित असणं आणि तो खेळ समजून घेणं आणि दुसर्‍याला समजावणं हे अधिक कठीण आणि ज्यांनी हा तेलाचा खेळ खेळला त्या "तेलियां" बद्दल काय बोलावे? अश्याच एका तेलियाबद्दल "शेख अहमद झाकी यामानी" यांच्याबद्दल श्री. गिरिश कुबेर यांनी लिहिलेले दमदार व रोचक पुस्तक म्हणजे "एका तेलियाने". या पुस्तकात लेखक आपल्याला केवळ यामानी यांच्याबरोबरच इतर अनेक तेलियांची ओळख तर करून देतातच व त्याचबरोबर वाचक करतो ती आंतरराष्ट्रीय राजकारणाची एक अत्यंत रोचक, डोळे दिपवणारी आणि तरीही अस्वस्थ करणारी सफर!

यामानी हे सौदी अरेबियाचे माजी तेलमंत्री. आखातातील सौदी अरेबियासारख्या तेलावर तरंगणार्‍या देशाचे तेलमंत्री व तेही पुरी २५ वर्षे पदभार सांभाळणारा हा तेलिया वाचकाला गुंग करून ठेवतो. सौदी अरेबियाच्या जन्मापासून सुरू होणारी ही कथा अरबांच्या मागासलेपणापासूनही सुरू होते. तेलामुळे अचानक होणार्‍या मिळकतीने वाळवंटातील टोळ्यांचे दिवस बदलतात. अर्थातच पश्चिमी जग ही ताकद ओळखून तिथे आपले बस्तान बसवते व अरबांच्या तोंडाला पाने पुसून केवळ काही पैसे व सुंदर बायकांच्या बदल्यात खोर्‍याने तेल ओढत असते. अश्यावेळी यामानींच्या रूपाने सौदी अरेबियाला तेलमंत्री मिळतो व एकूणच अरबस्तानाच्या नशीबाने राजे फैजल त्यावेळी सत्तेवर असतात.

पुढे ओपेक, ओपेकचे राजकारण, गडाफी, इराणी शहा वगैरे तेलिये, ओपेकच्या एकजुटीने पाश्चिमात्यांचे घटते वर्चस्व, त्याच दरम्यान उफाळू लागलेला इस्राइल वाद, इजिप्तच्या खेळ्या, अमेरिका, ब्रिटनच्या चाली, रशियाची प्रत्युत्तरे, फ्रेंच, जर्मन, नेदरलंड, अल्जेरिया, इराक, कुवेत, इराण, इस्राइल, येमेन, जॉर्डन, जपान अश्या बहुविध खेळाडूंनी व त्याच वेळी प्याद्यांनी, रचलेले व्यूह व ते राजे फैजल यांच्या मदतीने भेदणारे यामानी वाचाकाला पुस्तक संपेपर्यंत खिळवून ठेवतात.

एकतर या पुस्तकात उल्लेख असलेले बरेच जण नेहमीचे ऐकलेले-वाचलेले आहेत. तेलसंकट, इराण-इराक युद्धे, शीतयुद्धे, इस्त्रायल प्रश्न वगैरे तर अनेकांनी अनुभवलेली आहेत. त्यामुळे त्यातील संदर्भ, प्रसंग, व्यक्ती, शहरे यांचे उल्लेख वाचकाची त्या राजकारणाची सहज नाळ बांधतात. एक उदा. देतो. अमेरिका तेलबंदी आल्यावर ओपेकप्रमाणे तेल खरेदीदारांची संघटना बांधण्यासाठी परिषद घेणार होती. तसे काही झाले असते तर तो तेल उत्पादक देशांना झटका असता. अशावेळी यामानी यांची मुत्सद्देगिरी सगळ्यांना आठवत असेलच. आता हा परिच्छेद बघा तो वाचून अनेकांनी ही बातमी वाचल्याचं आठवेल

"या सार्‍या पार्श्वभूमीवर यामानी जेव्हा पॅरीसला उतरले तेव्हा फ्रान्सचे अध्यक्ष जॉर्जेस पापेंदू यांच्या स्वागतासाठी विमानतळावर जातीने हजर होते. हा प्रकार आता वारंवार घडणार होता. ह्या दौर्‍यात एका साध्या मंत्र्याच्या स्वागताला राष्ट्रप्रमुखांनी जाणं साजेसं होणार होतं. सारी माध्यमं हे तेलमंत्री काय बोलतात त्याकडे डोळे लाऊन होती. फ्रान्सने आपली आधीचीच भूमिका मांडली. इस्त्रायलने १९६७च्या युद्धापासून व्यापलेला अरब देश व पॅलेस्टाईन भूभाग परत करावा अशी स्वच्छ भूमिका घेतली. याला प्रतिसाद म्हणून यामानींनी लगेच घोषणा केली फ्रान्सला तेलकपातीतून वगळायची. दुसर्‍या दिवशी फ्रान्सच काय, जगातील सार्‍या वृत्तपत्रांनी यामानींची बातमी छायाचित्रासकट छापली".

"पुढच मुक्काम होता लंडन. या देशाची भूमिकाही स्वछ होती. कधी नव्हे ते अमेरिकाच्या कच्छपी असलेल्या इंग्लंडनं आता महासत्तेची कास सोडली व इस्राइलचा निषेध केला. त्यामुळे इंग्लंडचं काय करायचं ते यामानींना माहित होतं. ते लंडनला उतरले तेव्हा इंग्लंड मध्ययुगीन मागास भागासारखं वाटत होतं. वीज नाही, बँका कोलमडलेल्या, कोळसा संपामुळे रेल्वे बंद आणि नाताळचा सण. यामानींनी इंग्लंडला पूर्वी होता तितका तेल पुरवठा सूरू करण्याचं घोषित केलं व पुन्हा यालाही प्रसिद्धी मिळाली"

हे सारं वाचकाला लख्ख आठवतं, पुढे बेल्जियम, जर्मनी इतकंच काय राजनैतिक संकेत झुगारून तेलमंत्र्यांच्या भेटीला आलेले जपानचे सम्राट काय सगळं वाचक आठवतो आणि पुढे झालेल्या अमेरिकेच्या पचक्याची आठवण होऊन वाचक मनात हसतो आणि उत्कंठेने पुढचे पान उलटतो.

ज्या यामानींना नुसता ताप जरी आला तरी वॉल स्ट्रीट गडगडायचा त्यांची कार्यपद्धती, व्यूहरचना आणि मुख्य म्हणजे देशाभिमान व देशप्रेम बघितलं की त्यांना सलाम ठोकावासा वाटतो. आणि ही राजकारणाची व्याप्ती व त्याचे गरीब देशांवरचे भयावह परिणाम बघितल्यावर त्याकाळी तुलनेने गरीब असलेल्या भारताने ना खेळिया होऊन ना प्यादे बनून म्हणजेच बरेचसे अलिप्त राहून किती बरं केलं असंही वाटून जातं.

थोडक्यात काय, तर आंतरराष्ट्रीय राजकारणाची रंजक शैलीत मजा घ्यायची असेल तर हे पुस्तक वाचणे मस्ट आहे. अगदी मिळवून वाचावे असे!

 

लेखक: ऋषिकेश दाभोळकर

सबस्क्राईब करा

* indicates required