computer

प्रीतम आणि भगवान सिंगची कथा....भारताच्या फाळणीच्या दाहक वास्तवातील सुखद प्रेमकहाणी !!

पियुष मिश्राचं प्रसिद्ध गाणं आहे-हुस्ना!! गोष्ट आहे भारत-पाक फाळणीमुळं वेगळ्या व्हाव्या लागलेल्या दोन प्रेमिकांची. निसर्ग आणि ऋतूचक्र दोन्ही देशांत नेहमीसारखं आणि एकसारखंच चालू असताना या दोन जीवांना विरह का सहन करावा लागतो अशा अर्थाचं हे सुंदर गाणं आहे. हुस्नाची ही कथा तशी प्रातिनिधिक असावी. पण सगळ्याच प्रेमकथांचा अंत दु:खद नसतो, काहींचा शेवट सुखांतही होतो. आज आम्ही फाळणीमुळे दु:खात सापडलेल्या, काही काळासाठी वेगळ्या व्हाव्या लागलेल्या दोघांची घडलेली एक खरीखुरी आणि सुखांत प्रेमकथा तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

गोष्ट आहे १९४७ ची. लाहोरवरून अमृतसरसाठी निघालेल्या रेल्वेत प्रीतम कौर नावाची एक तरुणी दंग्यांपासून वाचण्यासाठी निघाली होती. सोबतीला एक बॅग, अंगावर फुलांचे जॅकेट आणि सोबतीला आपला दोन वर्षाचा भाऊ अशा अवस्थेत तिचा प्रवास सुरु झाला. स्वतःचा देश, कुटुंब, शेजार, आपलं घर-गल्ली-गाव सोडायला कुणाला आवडते? प्रीतमला तर हे अधिकच जड जात होतं. तिचा भगवान सिंग मैनी नावाच्या तरुणाशी साखरपुडा झाला होता. आपल्या होणाऱ्या नवऱ्याला सोडून तिला तशाच अवस्थेत निघावे लागले होते. त्या बिचाऱ्याला तर प्रीतम पाकिस्तान सोडून जात आहे या गोष्टीची कल्पना देखील नव्हती. त्या दोघांनी आपल्या वैवाहिक आयुष्याची कितीतरी स्वप्न बघितली असतील. पण ते सर्व सोडून तिला तिथून निघावे लागले होते.

(निर्वासितांची छावणी)

मात्र नियती एखाद्याची चांगलीच परीक्षा पाहत असते. प्रीतम ज्या दंग्यांपासून वाचण्यासाठी लाहोर सोडून निघाली होती, त्याच दंग्यांमुळे तिला रेफ्युजी कॅम्प म्हणजेच निर्वासितांच्या छावणीत जावे लागले. तिचा भावी पती भगवान सिंग तिथून अडीचशे किलोमीटर दूर होता. त्याला दंग्यांची परिस्थिती ठाऊक होती. त्याचे अर्ध कुटुंब दंग्यांमध्ये मारले गेले होते. भगवान स्वतः दंग्यामध्ये थोडक्यात बचावला होता. आपला जीव वाचवायचा असेल तर पाकिस्तान सोडण्याशिवाय पर्याय नाही. त्यानेही मग अमृतसरची वाट धरली. नियतीचा खेळ म्हणजे भगवान देखील त्याच रेफ्युजी कॅम्प मध्ये आला.

पण एकाच ठिकाणी येऊन देखील कित्येक दिवस ते एकमेकांना भेटले नव्हते. तत्कालीन भारताची परिस्थिती बघितली तर जिथे देशवासियांना खायला अन्न नव्हते, तिथे शरणार्थीना कितीतरी देऊ शकणार होते? निर्वासित छावणीत एक गाडी येऊन जेवणाची पाकिटे देऊन जायची. तिथे रांगेत उभे राहून ते अन्न घ्यावे लागत असे. एके दिवशी रांगेत प्रीतम जेवणाचे पाकिट घ्यायला उभी होती. मागून कुणीतरी बोलले, "तू तीच आहेस ना?" तिच्यामागे स्वतः भगवान उभा होता. ज्याच्याशी परत भेट होईल याच्या सगळ्या अपेक्षा मालवल्या होत्या. तो समोर येऊन उभा होता.

त्यानंतर दोघांनी पुढे मात्र त्या निर्वासित छावणीच्या नीरस जागेत देखील एकमेकांना प्रेम दिले. ते नियमित भेटत, एकमेकांना आपला इथवरचा प्रवास सांगत. एकाअर्थाने त्यांचे जीवन आता सुसह्य झाले होते. पुढे छावणीतून बाहेर पडल्यावर त्यांनी लग्न केले. प्रीतमने रेल्वे प्रवासात घातले होते तेच फुलकारी जाकिट लग्नात घातले. भगवान नोकरीला लागला आणि त्यांचे वैवाहिक आयुष्य एका चांगल्या टप्प्यावर येऊन पोचले. पुढे त्यांची दोन्ही मुले सरकारी सेवेत आली. परिकथेसारखा त्यांच्या प्रेमकथेचा सुंदर आणि सुखद शेवट झाला.

 

अमृतसरने ही प्रेमकथा त्यांच्या वस्तुसंग्रहालयात जिवंत ठेवली आहे. प्रीतमचे फुलकारी जाकिट आणि भगवानची बॅग आजही अमृतसरच्या म्युझियममध्ये ठेवलेले आहे. आजही कित्येक प्रेमवीरांना त्यांचा प्रवास प्रेरणा देत असतो.

सबस्क्राईब करा

* indicates required