computer

पंढरपूरक्षेत्री मंत्री-राष्ट्रपतींच्या भेटी, त्यामुळं घडलेले चांगले बदल आणि त्यांचे किस्से!! हे तुम्ही नक्कीच कुठं वाचलं नसेल..

पंढरपूरचा इतिहास आम्ही काय सांगावा? महाराष्ट्राच्या इतिहासात या दैवताचे स्थान अनन्यसाधारण आहे.  छत्रपती शिवाजी महाराज पंढरीरायाच्या दर्शनाला येऊन गेल्याचे उल्लेख वाचायला ऐकायला आपल्याला मिळतात. महाराष्ट्राचे एक दैवत दुसर्‍या दैवताच्या भेटीस गेले होते असा तो प्रसंग!! पण ती भेट बघण्याचे आपल्या हातात नव्हते. आज आपण फक्त आपल्या सगळ्यांच्या पल्ल्यात असलेल्या कालखंडात पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाला आलेल्या राष्ट्रपती- पंतप्रधान- मुख्यमंत्री यांच्या भेटीबद्दल वाचूया. बोभाटासाठी हा मागोवा श्री रविप्रकाश कुळकर्णी यांनी घेतला आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत. 

आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री विठ्ठलाची महापूजा करतात. त्याला शासकीय पूजा म्हणण्याचा प्रथा आहे. पण ही प्रथा नेमकी कधी सुरु झाली? हा इतिहास रंजक आहे
१९६० नंतर संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर तेव्हाचे महसूलमंत्री राजारामबापू पाटील श्रीपूजेसाठी पंढरपुरात आले होते. देवस्थानाला वर्षानुवर्षे केवळ दोन हजार सरकारी अनुदान मिळते आहे हे कळल्यावर त्यांनी कोणत्याही विनंतीची वाट न बघता सरकारी अनुदान थेट रुपये २०,००० केले. त्यानंतर मंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्याचा प्रथा सुरु झाली.

(राजारामबापू पाटील)

पण १९७१ साली काही समाजवादी विचारांच्या लोकांनी निधर्मी राष्ट्रात सरकारी इतमामात एखाद्या धर्माची पूजा करणे गैर आहे असे म्हणत आंदोलन छेडले. परिणामी १९७१ साली शासकीय पूजा झाली नाही. लगेच नंतरच्या वर्षात म्हणजे १९७२ साली महाराष्ट्रावर भीषण दुष्काळाचे सावट पडले. सारी जनता या संकटाने हवालदिल झाली. सरकारने विठ्ठलपूजा रद्द केल्याने हे अरिष्ट कोसळले अशी वारकर्‍यांची श्रद्धा सांगू लागली. वारकरी संप्रदायाची धुरीण मंडळीनी तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे मनधरणी केली. परिणामी बंद पडलेली शासकीय पूजा १९७३ सालपासून पुन्हा सुरु झाली ती आजतगायत चालू आहे. योगायोग म्हणा किंवा काहीही म्हणा, १९७३ साली पूजा सुरु झाली आणि पाऊस पडला तेव्हा वसंतराव नाईकांनी चक्क पेढे वाटले.

(वसंतराव नाईक)

ही कथा वसंतराव नाईकांची. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा यांची पण एक कथा ऐकायला मिळते ती अशी की वसंतदादा आषाढीला पंढरपुरात आले तेव्हा वारकर्‍यांनी यात्रा कर रद्द करण्याची मागणी त्यांच्याकडे केली. वसंतदादांनी पंढरपूरचा यात्रा कर तर रद्द केलाच, पण सोबत देहू आळंदीचा यात्रा कर पण रद्द केला आणि वारकर्‍यांची मनं जिंकली!!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार यांची कथा सांगितला नाही तर हा लेख अपूराच राहील. शरदराव साखर कारखान्याच्या गळीत हंगामात पंढरपुरात येत, पण मंदिरात येत नसत. पण एकेवर्षी त्यांच्या पत्नीच्या म्हणजे प्रतिभाताईंच्या आग्रहाने ते मंदिरात आले. प्रतिभाताईंनी साग्रसंगीत मनोभावे पूजा केली. पण तोपर्यंत शरद पवार हत्ती दरवाजाच्या बाहेरच्या कट्ट्यावर कार्यकत्यांशी  गप्पा-चर्चा करत बसले. अर्थात पत्रकारांनी त्यांना विचारलेच, "तुम्ही देव मानत नाही तर आता इथे देवळात कसे?". पवार साहेब मुरब्बी राजकारणी आहेतच. त्यांनी लगेच उत्तर दिलं, "माझ्या महाराष्ट्रातील कोट्यावधी जनता पांडुरंगाला मानते. त्यांच्या धार्मिक भावनेचा आदर करण्यासाठी मी इथे आलो आहे".

(शरद पवार)

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या अशा अनेक हकिकती सांगता येतील. मनोहर जोशी यांची हकीकत तर वारकरी संप्रदायाच्या इतिहासात नमूद करण्यासारखी आहे. मनोहर जोशी आषाढीला पंढरपुरात आले. त्यावर्षी आषाढातही पाऊस आला नव्हता. त्यांनी विठ्ठलाला साकडं घातलं, "बा पांडुरंगा, भरपूर पाऊस पडू दे". सोबत देवस्थान समितीला विनंती केली की, "शासकीय महापूजेचा कालावधी कमी करावा. आटोपशीर करावा. या महापूजेच्या दरम्यान वारकर्‍यांना दोन ते अडीच बाहेर ताटकळत उभं रहावं लागतं, ते कमी करा." आता शासकीय पूजा लवकर आटोपते यामागे मनोहर जोशींचे धोरण आहे. 

(मनोहर जोशी)

हा आढावा तर फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपुरताच झाला. पण भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या भेटीचा इतिहासही  रंजक आहे.  १९५३ साली पंतप्रधान जवाहरलाल नेहरू पंढरपूर दौर्‍यावर असताना मंदिरात आले आणि गाभार्‍याच्या दगडी उंबरठ्यावर ठेचकाळले. झाल्या प्रकाराने तो दगडी उंबरठा काढून टाकला गेला आणि मागच्या बाजूस असलेल्या एका मंदिरात लावला गेला. 

(जवाहरलाल नेहरू)

पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीपण एका वारीला पंढरपूर क्षेत्री आले होते. मात्र त्यावेळी कॉलर्‍याची लस टोचल्याखेरीज पंढरपुरात प्रवेश नव्हता. लालबहादूर शास्त्री म्हणाले, "मी आजपर्यंत अंगाला सुई टोचून घेतलेली नाही आणि आताही टोचून घेणार नाही." यावर आरोग्य अधिकारी म्हणाले, "तुम्ही नेते आहात, आम्ही तुमच्यासाठी हा नियम शिथिल करू शकतो". यावर शास्त्रीजी म्हणाले, "माझ्यासाठी नियम मोडू नका, मी येथूनच पांडुरंगाला नमस्कार करतो". त्याप्रमाणे त्यांनी तेथूनच नमस्कार केला आणि माघारी वळले. जेव्हा वारकर्‍यांना देवळात पोहचता येत नाही तेव्हा ते कळसाला नमस्कार करून माघारी जातात, तसेच काही शास्त्रीजींच्या बाबतीत घडले. शास्त्रीजींना काय अनुभव आला असेल याची काही कल्पना नाही.

(लालबहादूर शास्त्री)

पंतप्रधान इंदिरा गांधी १९७९/८० पंढरपुरच्या दौर्‍यावर आल्या तेव्हा त्या सत्तेत नव्हत्या. अंबाबाई पटांगणात पहाटे चार वाजता त्यांची सभा आटपल्यावर त्यांनी स्नान करून मंदिरात विठ्ठ्लाची पूजा बांधली. ही पूजाअर्चा आटपून त्या डाकबंगल्यावर पोहचल्या. त्यांच्या न्याहारीची तयारी टेबलावर झाली होती. त्यात पाव लोणी उकडलेली अंडी असा जामानिमा होता. त्यांच्यासोबत पंढरपुरचे आमदार पांडुरंगराव  डिंगरे होते. ते इंदिराजींना म्हणाले, "मॅडम, आज एकादशी आहे, आजच्या दिवशी या क्षेत्रात उपास करतात. तुम्ही निदान अंडी तरी खाऊ नका".  इंदिराजींना पांडुरंगराव डिंगरे यांच्या भावना समजल्या. त्यांनी न्याहारी न करता फक्त दूध घेतले आणि पुढच्या दौर्‍याला रवाना झाल्या.

राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद सर्वोदय संमेलनासाठी पंढरपुरात आले तेव्हा सरकारी डाक बंगल्यावर न जाता थेट चंद्रभागेवर स्नानासाठी गेले. राष्ट्रपतींच्या प्रोटोकॉलमध्ये आणि ठरलेल्या कार्यक्रमात हे ठरलेले नसल्याने सुरक्षा रक्षकांची एकच धावपळ सुरु झाली. राष्ट्रपती उघड्यावर स्नान कसे करणार म्हणून धोतर चादरी लावून तात्पुरता आडोसा करण्यात आला. स्नान आटोपल्यावर ते अनवाणी वाळवंट पार करून महाद्वार, नामदेवाची पायरी ओलांडत मंदिराच्या मंडपात पोहचले. या प्रयासाने ते दमले आणि विश्रांतीसाठी एखाद्या सर्वसामान्य वारकर्‍यासारखे कट्ट्यावर बसले. नंतर विठ्ठलाच्या गाभार्‍यात गेले. पूजा सुरु झाली. बडवे -पंडितांच्या सोबत त्यांनीही मंत्रोच्चार सुरु केल्यावर सगळे आश्चर्यचकीतच झाले. तोपर्यंत सरकारी माणसाचा असा अनुभव कधीच आला नव्हता त्याचा तो परिणाम होता.

(राजेंद्रप्रसाद)

संत नामदेव महाराजांच्या जन्म सप्तशताब्दीनिमित्त राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग पंढरपुराला आले ते नामदेव पायरीच्या दर्शनाला. शिखांच्या पवित्र ग्रंथात नामदेवमहाराजांचे अभंग आहेत. नामदेव महाराज भारतभ्रमण कराताना काही काळ अमृतसर-घुमान इथे काही काळ वास्तव्यास होते. त्यामुळे नामदेव महाराजांना शिख संप्रदायात मानाचे स्थान आहे. आजही नांदेड-पंढरपूर करूनच घुमान यात्रा पूर्ण होते. त्यामुळे ग्यानीजी पंढपुरात आल्यावर त्यांनी नामदेवांच्या वंशजांची भेट घेतली. नामदेव पायरीवर माथा टेकला आणि महापूजा केली. अशा प्रसंगी दक्षिणा म्हणून तात्यासाहेब डिंगरे यांनी पंढरपुरास येणारी रेल्वेलाईन बार्शी लाइट ब्रॉडगेज करण्याची विनंती केली. ती इच्छा ग्यानीजींच्या नाही, पण राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या कार्यकाळात पूर्ण झाली.

(ग्यानी झैलसिंग)

पण आम्ही जर तुम्हाला आचार्य विनोबाजींच्या दर्शनाची कथा सांगितली नाही तर हा लेख अपूर्णच राहील. 

आचार्य विनोबा भावे म्हणजे गीतेत वर्णन केल्याप्रमाणे स्थितप्रज्ञ अवस्थेस पोहचलेली महान व्यक्ती. पण विठ्ठलाच्या पायावर डो़कं टेकल्यावर त्यांचे डोळे पाण्याने डबडबले. आचार्यांना ओळखणार्‍यांसाठी हे अघटितच होतं. त्यांनी तसं बोलूनही दाखवलं. त्यावर आचार्य म्हणाले, "ज्या विठ्ठलाच्या पायी ज्ञानेश्वर-तुकारामांनी डोकं टेकवलं त्याच पायी मला माझा माथा टेकवता आला हे केवढे अहोभाग्य. त्यामुळे मला भरून आलं.."

(आचार्य विनोबा भावे)

तर असे हे सगळे विठ्ठलानुभव!! 

आज भारत  देशावर आणि महाराष्ट्रावर जे संकट ओढवलं आहे ते बघता "धाव घाली विठू आता, चालू नको मंद" अशी आळवणी करणेच आपल्या हातात आहे. आज माननीय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते महापूजा आहे. त्यांनाही आणि आपल्यालाही तो कनवाळू विठ्ठल कृपादृष्टीने बघेल अशी आशा करू या!

 

लेखक : रविप्रकाश कुलकर्णी

सबस्क्राईब करा

* indicates required