computer

सरकार काही लोकांच्या हातावर हा शिक्का मारत आहे, या शिक्क्याचा अर्थ काय?

कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे ज्यांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे, अशा व्यक्तींच्या हातावर आता महाराष्ट्रात एक शिक्का मारला जातोय. या शिक्क्यावर लिहिलंय Home Quarantined. म्हणजे अशी व्यक्ती जिला घरात वेगळं ठेवण्यात आलं आहे. सोबतच किती दिवसांसाठी वेगळं राहावं लागेल याची तारीखही देण्यात येत आहे.

आपल्या हातावर असा भलामोठा चौकोनी शिक्का कोणाला आवडणार आहे? म्हणून कोणी शिक्का खोडण्याचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न निष्फळ ठरू शकतो, कारण शिक्का मारण्यासाठी वापरण्यात आलेली शाई ही निवडणुकीच्यावेळी बोटाला लावण्यासाठी वापरण्यात येणारी शाई आहे.

इथे एक गैरसमज होऊ शकतो. ज्या लोकांना Home Quarantined करण्यात आलं आहे ते कोरोनाग्रस्त नाहीत. त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत, पण ते एक तर परदेशी जाऊन आले आहेत किंवा परदेशी जाऊन आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेले आहेत. त्यामुळे त्यांना इतरांपासून वेगळं ठेवणं गरजेचं होतं. एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी. ज्यांना हॉस्पिटल किंवा हॉटेलमध्ये राहणं जमणार नाही अशा लोकांनाच Home Quarantined चा शिक्का मारून घरी जाण्याची परवानगी देण्यात येत आहे. साधारणपणे १४ दिवसांपर्यंत त्यांना घरातच राहण्याचा आणि खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

हातावरचा शिक्का हा दोन कारणांसाठी आहे. एकतर त्या व्यक्तीला आपल्या जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून आणि दुसरं कारण म्हणजे इतरांना त्याच्याबद्दल माहिती मिळावी म्हणून.

हा लेख लिहित असताना महाराष्ट्रात एकूण ३९ कोरोनाग्रस्त लोक आढळून आले होते, तर १०८ लोकांना हॉस्पिटलमध्ये वेगळं ठेवण्यात आलं होतं. यापेक्षा घरातच वेगळं ठेवण्यात आलेल्या (Home Quarantined) व्यक्तींची संख्या ६२१ एवढी आहे.

तर वाचकहो, काय म्हणाल याविषयी?

सबस्क्राईब करा

* indicates required