computer

त्याने तब्बल ८५ लाख रुपयांचं केळं फुकटात खाल्लंय !!

मंडळी, आज जी बातमी आम्ही घेऊन आलो आहोत ती तुम्हाला आचरट आणि येडचाप वाटू शकते, हे आधीच सांगतो. नंतर तुम्ही कमेंटमध्ये आम्हालाच येऊन नाही नाही ते बोलाल.

तर, मौरिझिओ कॅटलेन या कलाकाराने मायामी येथील प्रतिष्ठित अशा ‘आर्ट बासेल’ कला प्रदर्शनात ‘कॉमेडीयन’ नावाची एक कलाकृती ठेवली होती. ठेवली होती म्हणण्यापेक्षा भिंतीवर चिकटवली होती. ही काही मोठी कलाकृती नव्हती. मौरिझिओने एक केळं भिंतीवर सेलोटेपने चिकटवलं होतं.

आता बातमी अशी आहे की हे केळं डेव्हिड दातुना नावाच्या माणसाने खाऊन टाकलं आहे. यात बातमी काय? तर, या केळ्याची किंमत १,२०,००० डॉलर्स होती. म्हणजे जवळजवळ ८५ लाख रुपये. मौरिझिओने ते अवघ्या ०.३० डॉलर्सला (२१ रुपये) विकत घेतलं होतं. आता तो मोठा कलाकार असल्याने तो जे काही करेल त्याला मोठीच किंमत येणार. त्यामुळे या आचरट ‘कलाकृती’ला ८५ लाखांची बोली लागली.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by David Datuna (@david_datuna) on

डेव्हिड दातुनाचा ८५ लाखाचं केळं खातानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. त्याने केलेल्या कृत्याबद्दल तो म्हणाला की ‘मला भूक लागली होती म्हणून मी ते खाऊन टाकलं.’. ‘ही कलाकृती फारच लज्जतदार होती’ असंही तो म्हणाला. त्यानंतर त्याला तिथल्या अधिकाऱ्यांनी चांगलंच फैलावर घेतलं. एका अधिकारी महिलेने या कृत्याला ‘निर्बुद्ध’ म्हटलं आहे.

त्याला काय शिक्षा झाली?

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by David Datuna (@david_datuna) on

त्याला एकच शिक्षा मिळाली. त्याला केळ्यासोबत ओरडा खावा लागला. त्यानंतर रिकाम्या भिंतीवर नवीन केळं चिकटवण्यात आलं. या ‘कलाकृती’सोबत असलेल्या सर्टिफिकेटवर लिहिलंय, की मालकाकडून केळं बदललं जाऊ शकतं.

आम्ही सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे हे फारच आचरट आणि येडचाप आहे. पहिला आचरटपणा म्हणजे हे केळं इतक्या किंमतीला विकलं गेलं आणि दुसरं म्हणजे ते खाल्लं गेलं. यावरून प्रेरणा घेऊन भारतीयांनी भिंतीवर रताळं चिकटवू नये म्हणजे झालं.

सबस्क्राईब करा

* indicates required