computer

जगातील सर्वात मोठ्या मानवनिर्मित नदीने लिबियाच्या वाळवंटाचा चेहरा कसा बदलला?

आफ्रिकेतला आकाराने चौथ्या क्रमांकाचा देश म्हणजे लिबिया. पूर्ण वाळवंटी, शुष्क प्रदेश. इतका शुष्क की इथे पावसाची सरही चार ते पाच वर्षांतून एकदा कोसळते. सभोवताली पसरलेल्या रखरखीत वाळवंटात जमिनीतील पाणी शोधण्यासाठी लोकांना खूपच वणवण करावी लागत असे. पाण्याअभावी शेती करणे म्हणजे तर स्वर्गाला शिड्या लावून चढण्याचाच प्रकार! पण ४२ वर्षे लीबियावर एकहाती सत्ता गाजवणाऱ्या मुअम्मर गड्डाफीला मात्र आपल्या अशा शुष्क, कोरड्या, वाळवंटात शेती फुलली पाहिजे असे वाटत होते. शिवाय लिबियातील प्रत्येकाला किमान पिण्याचे स्वच्छ पाणी तरी मिळालेच पाहिजे असे त्याचे स्वप्न होते आणि हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी तो धडपडत होता. हे स्वप्नच सत्यात उतरवण्यासाठी त्याने एक खूप मोठी योजना आखली. सहाराच्या भल्या मोठ्या वाळवंटात दडलेले भूमिगत पाण्याचे स्त्रोत शोधून तिथून पाईपलाईनने हे पाणी लिबियापर्यंत आणायचे अशी त्याची योजना होती.

सहाराच्या या मोठ्या वाळवंटात पाण्याचे असे मोठमोठे अवशेष आहेत. हे अवशेष प्राचीन काळापासून इथे अस्तित्वात आहेत असे मानले जाते. हा प्रकल्प म्हणजे जगातील आठवे आश्चर्य आहे असे स्वतः गड्डाफीचं म्हणणं होतं. पाश्चिमात्य माध्यमांनी मात्र याची म्हणावी तशी दखल घेतली नाही. गृहयुद्धांनी अशांत लिबिया असे चित्र रंगवण्यातच ही प्रसिद्धी माध्यमे मश्गुल होती. उलट गड्डाफीच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाला या माध्यमांनी निरर्थक प्रकल्प म्हणून हिणवण्यातच धन्यता मानली. परंतु गड्डाफीच्या या प्रकल्पाने लिबियाचा अक्षरश: कायापालट केला.

जगातील अतिशुष्क आणि अतिउष्ण देश असं लिबियाचं वर्णन केलं तर ते चुकीचं ठरणार नाही. अगदी वर्षानुवर्षे तिथे पाण्याचा एक टिपूसही पडत नाही. अगदी उंच ठिकाणांवरही तुरळक स्वरूपाचा पाउस पडतो. तो ही अगदी ५ ते १० वर्षांतून एकदा. मग इथली लोकं जिवंत कशी राहतात असा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल तर इथे पिण्यासाठी समुद्राच्या पाण्याचे शुद्धीकरण करून ते पाणी पिण्यायोग्य बनवले जाते आणि हे पाणी फक्त पिण्यासाठीच वापरले जाते. पण समुद्राचे पाणी पिण्यायोग्य बनवण्यासाठीही पाण्यासारखाच पैसा ओतावा लागतो. म्हणूनच हे पाणी अगदी काटकसरीने वापरले जाते. शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्न मात्र यातून सुटला नव्हता.

लिबियाच्या वाळवंटात १९५३ साली तेलाच्या खाणी शोधताना जमिनीखालील पाण्याचे साठे सापडले. तेलाच्या खाणी शोधणाऱ्या या पथकाला सापडलेले हे पाण्याचे साठे भरपूर मोठे होते. यातील प्रत्येक साठ्यात सुमारे ४,८०० ते २०,००० क्युबिक मीटर इतका पाण्याचा साठ होता. सुमारे १४ ते ३८ हजार वर्षापूर्वी हे पाणी जमिनीत साठवले गेले असतील. इतके हे पाणी साठे जुने आहेत. म्हणजे बर्फ युगाचा अंत होत असताना हे पाणी साठवले गेले असतील. त्याकाळी बहुदा सहाराचे वाळवंट इतके शुष्क नसावे.  

(लिबियाचा नकाशा आणि जमिनीखालून गेलेले पाण्याचे साठे)

गडाफीने १९६९ मध्ये लिबीयाची सत्ता हस्तगत केली आणि त्याने लागलीच देशातील तेल कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले. या तेल कंपन्यांच्या येणाऱ्या उत्पन्नातून त्याने या प्रोजेक्टचा खर्च भागवण्याचे ठरवले. सुरुवतील जिथे हे पाण्याचे साठे सापडले तिथेच मोठमोठे शेतीचे प्रकल्प करण्याची त्याची योजना होती. या ठिकाणी त्यांनी जवळपास १३०० विहारी खोदल्या. यातील काही विहिरी तर ५०० मीटर पर्यंत खोल होत्या. नंतर त्याला असे वाटले की या विहिरीतील पाणी ट्रिपोली, बेघांझी, सिर्ते आणि इतरत्र राहणाऱ्या लोकांपर्यंतही पोहोचवता येऊ शकेल. यासाठी त्याने पाईप्सचे जाळेच उभारावे लागणार होते. यासाठी एकूण ४००० किमी लांबीची पाईपलाईन करून सुमारे १५,५००० हेक्टर जमिनीला पाणी पुरवता येईल आणि इतक्या मोठ्या क्षेत्रफळात शेती करता येईल. म्हणूनच या प्रकल्पाला जगातील सर्वात मोठी मानवनिर्मित नदी म्हंटले जाते. 

ऑगस्ट १९८४ साली मुअम्मर गडाफीने ब्रेगा मध्ये पाईप प्रोडक्शन करण्यास सुरुवात केली. तेंव्हापासून या प्रकल्पाच्या उभारणीचे काम सुरु झाले. १९९६ मध्ये या पाईपलाईनचे काम ट्रिपोलीमध्ये पोहोचले. ट्रिपोलितील लोकांना आता स्वच्छ आणि ताजे पाणी मिळणार होते. यामुळे त्या लोकांच्या दैनंदिन जीवनात किती मोठा फरक पडला होता याची कल्पनाही तुम्हाला करता येणार नाही. या पाईपलाईन प्रोजेक्टसाठी नेमण्यात आलेल्या जीएमआरए समितीवरील एक ज्येष्ठ सदस्य अडाम कुवैरी यांनी त्यांच्या कुटुंबावर या पाण्यामुळे काय परिणाम झाले याचे सविस्तर वर्णन केले होते. 

“या पाण्याने तर अमचे जीवनच बदलून गेले. इतिहासात पहिल्यांदा आमच्या घरातील नळाला मुबलक पाणी आले आहे. हे पाणी वापरून आता आम्ही अंघोळ करू शकतो, धुणीभांडी करू शकतो, इतकेच काय दाढीही करू शकतो.” अशा शब्दात त्यांनी या आनंदाचे वर्णन केले. या शब्दावरूनच लक्षात येईल की, या प्रकल्पाने या लोकांच्या जीवनात अक्षरश: जादूची अशी काही कांडी फिरवली होती की, त्यामुळे झालेला बदल आणि त्यातून त्यांना झालेला आनंद शब्दातीत होता. 

या लोकांचे राहणीमान उंचावले होते आणि याचा परिणाम संबंध देशावर दिसून येणार  होता. १९९९ साली युनेस्कोनेही या प्रकल्पाची दखल घेतली. लिबियाच्या या जगातील सर्वात मोठ्या मानव निर्मित नदीला युनेस्कोचा आंतरराष्ट्रीय पाणी पुरस्कार मिळाला होता. पाण्याच्या क्षेत्रात अमुलाग्र संशोधन करणाऱ्या व्यक्तींनाच हा पुरस्कार दिला जातो. 

परंतु लिबियातील हे सुख ही शांतता, समृद्धी फार काळ टिकली नाही. २०११ साली तिथे गडाफी विरोधात बंडाचे वादळ उठले. नाटोच्या हल्ल्यात हा पाणी प्रकल्प उध्वस्त झाला. या पाणी प्रकल्पासाठी जे पाईप निर्मितीची फॅक्टरी उभारण्यात आली होती तीही उध्वस्त झाली. या मानव निर्मित नदीचे भविष्यच आता धोक्यात आले आहे. लिबियातील लोकांचे आयुष्यच या पाईपच्या जाळ्यावर अवलंबून होते, मात्र अनेक लोकांचे दैनंदिन जीवनच यामुळे विस्कळीत झाले. 

लिबियातील लोकांसाठी एक आशेचा किरण उगवला होता पण, कालचक्रात हा किरण ही आता अंधारात गुडूप होऊ पाहतोय. 

सबस्क्राईब करा

* indicates required