वाचा खऱ्याखुऱ्या 'पिके' ची लव्ह स्टोरी !!

मंडळी आज आपण एक लव्ह स्टोरी बघुयात !! लव्ह स्टोरीचा सिम्पल फंडा काय असतो ? एक मुलगा, एक मुलगी, दोघात प्रेम, मध्ये आलेलं संकट, मग त्यावर मात करून त्या दोघांच मिलन ! पण मंडळी ट्वीस्ट नसेल तर प्रेम कथांना मजाच नाही येत. आज आम्ही जी गोष्ट सांगणार आहोत त्यात लव्ह स्टोरीसाठी लागणारा सगळा मसाला आहे. पण विशेष म्हणजे ही लव्ह स्टोरी खरीखुरी आहे !!


स्रोत

तर आता वळूयात आपल्या लव्ह स्टोरीकडे !!

'प्रद्युम कुमार महानंदिया' उर्फ 'पिके महानंदिया' आणि 'शॅरलॉट वॉन स्केडवीन' यांची ही कहाणी (आपले हिरो हिरोईन). गोष्ट सुरु होते १९७५ साली. शॅरलॉट आपल्या मित्रांबरोबर ड्राईव्ह करून युरोप, तुर्कस्तान, इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मार्गे भारतात आली होती. ती दिल्ली च्या कॉनॉट प्लेस जवळ फिरत असताना तिची नजर एका चित्रकारावर गेली.

शॅरलॉटने नाव विचारल्यावर समजलं की हा एक स्केच आर्टिस्ट असून याचं नाव ‘पिके महानंदिया’ आहे. पिके ओडीसा वरून दिल्लीला आला होता.

शॅरलॉटने त्याला आपली पेंटिंग काढण्यास विनंती केली. त्याने त्याप्रमाणे १० मिनिटात पेंटिंग काढून देतो म्हणून सांगितलं. पण शॅरलॉटला ही पेंटिंग काही आवडले नाही.

दुसऱ्या दिवशी ती पुन्हा आली आणि या दिवशी सुद्धा तिला पेंटिंग आवडले नाही. पिके कडून अशी चूक होण्याचं कारण म्हणजे त्याला लहानपणीची एक गोष्ट आठवत होती. त्याकाळात दलित असल्याने त्याला उच्च जातीच्या मित्रांकडून वाईट वागणूक मिळत असे. अश्यावेळी तो उदास झाला की आई त्याची समजूत काढताना म्हणायची की तुझं लग्न एका दूरच्या देशातील मुलीशी होईल, तिची रास वृषभ असेल, ती म्युझिकशी निगडीत असेल आणि तिच्या मालकीचं एक जंगल सुद्धा असेल. ही एक प्रकारे भविष्यवाणीच होती.

अर्थात आपल्या हिरोने तिला ही गोष्ट सांगितली नाही पण रिस्क घेऊन एक गोष्ट मात्र तिला विचारली. ‘तुमच्या मालकीचं जंगल आहे का ओ ?’. आश्चर्य म्हणजे तिच्याकडे खरच जंगल होतं. शिवाय तिला म्युझिक आवडत होतं. ती स्वतः पियानो वाजवायची. पुढील चमत्कार म्हणजे तिची रास वृषभ होती.

आता तुम्हाला वाटेल, ‘काय यश चोप्रा टाईप लव्ह स्टोरी सांगताय राव !!’. पण मंडळी, काय करणार, ही गोष्ट १००% खरी आहे !!!

तर, पिके ने शॅरलॉटला चहासाठी विचारलं. तिने होकार दिला आणि दोघे भेटले. शॅरलॉटला खरं तर उत्सुकता होती की याने मला असे प्रश्न का विचारले. पुढे पिकेने तिला सगळं सांगितलं. हे काही वेगळं सांगायला नको की तो तिच्या प्रेमात पडलेला. पुढे ती देखील त्याच्या प्रेमात पडली.


स्रोत

दोघेही ओडीसा ला गेले, तिथे कोणार्क मंदिर फिरून पुन्हा दिल्ली ला परतले. जेव्हा पहिल्यांदा त्याच्या घरच्यांना भेटण्याची वेळ आली तेव्हा तिने साडी नेसली, तिने आपलं नाव चारुलता ठेवलं आणि आदिवासी परंपरेनुसार दोघांनी लग्न केलं.

आता आहे 'कहानी मी ट्वीस्ट'.....

एक दिवस असा आला जेव्हा शॅरलॉट ला पुन्हा स्वीडनला जावं लागलं. जाता जाता तिने पिके कडून वचन घेतलं की तो स्वीडनला तिला भेटण्यासाठी येईल. त्यानेही ते काबुल केलं. यानंतर एक वर्ष ते भेटले नाहीत. दोघे एकमेकांना पत्र पाठवायचे. पिके कडे त्याकाळात एवढे पैसे नव्हते की तो विमानाने स्वीडनला जाईल. मग शेवटी त्याने आपलं सार काही विकून एक सायकल विकत घेतली आणि चक्क सायकल वर स्वीडन ला जायला निघाला.

२२ जानेवारी १९७७ साली त्यांचा प्रवास सुरु झाला. तो रोज ७० किलोमीटर सायकल चालवायचा. पैसे नसल्याने त्याने लोकांचे पेंटिंग काढून पोट भरलं. त्याकाळात ‘विझा’ ची फारशी भानगड नसल्याने त्याचा सायकल प्रवास सुखकर झाला. त्याकाळात त्याने भेट दिलेल्या अफगाणिस्तान बद्दल तो म्हणतो की ‘हा एक कमी लोकसंख्या असलेला, शांत आणि सुंदर देश आहे. इथल्या लोकांना कलेत रस आहे.” (आजची अफगाणिस्तानची परिस्थिती याच्या अगदी उलट आहे.)

पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, असा प्रवास करत तो स्वीडन ला पोहोचण्यात यशस्वी झाला. त्यांच्या लग्नानंतर १६ महिन्यांनी दोघे पुन्हा भेटले.

आज पिके महानंदिया ६४ वर्षांचे आहेत. त्यांना २ मुले असून स्वीडन मध्ये शॅरलॉट बरोबर ते एकत्र राहत आहेत. दोघांमधील प्रेम थोडंही कमी झालेलं नाही.


स्रोत

स्वतःच्या सायकल प्रवासाबद्दल त्यांना तेवढं आश्चर्य वाटत नाही. ते म्हणतात की ‘माझ्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे मी तेच केलं जे मला शक्य होतं.’

शेवटी काय तर ‘अंत भला, तो सब भला !!”

 

 

(सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.) 
©बोभाटा

सबस्क्राईब करा

* indicates required