computer

साठेबाजी करणाऱ्याचा डाव त्याच्यावरच उलटला! वाचा कोरोना भीतीचा गैरफायदा घेणाऱ्याची गोष्ट!!

लोक मंदीत संधी कशी साधतात याचं हे एक उदाहरण. आता याला काही लोकांनी "टाळूवरचं लोणी खाणं"  म्हटलं तरी तितकंच खरं ठरेल यात काही वाद नाही.

हा जो फोटोत दिसतोय तो पठ्ठ्या आहे अमेरिकेचा मॅट कॉव्हीन (Matt Colvin). हा कार्यकर्ता ऍमेझॉन या ऑनलाइन शॉपिंग पोर्टल वर विक्रेता आहे. कधी खेळणी विक, कधी घरगुती वस्तू विक असले धंदे करतो.  म्हणजे पूर्वी करायचा. मग आली कोरोना नावाची महामारी. कोरोनाची भीती इतकी आहे की लोक त्या भीतीचा गैरफायदा घेऊन अक्षरशः लुबाडत आहेत. कोरोना कुणासाठी आपत्ती ठरलाय, तर कुणासाठी इष्टापत्ती! या मॅटने आणि त्याचा भाऊ नोहाने कोरोनाच्या संधीचा फायदा घेण्याचे ठरवले.  

चीनमधून कोरोना व्हायरसच्या बातम्या येण्यास सुरूवात झाली आणि या भावाच्या डोक्यात ट्यूब पेटली. त्याने प्रत्येकी पाच डॉलर किंमत असणारे मास्कचे खोके बार्गेनिंग करून साडेतीन डॉलरला विकत घेतले. अशी तब्बल २००० खोकी त्याने जमा करून ठेवली. नंतर जेव्हा मार्केटमध्ये मास्कचा तुटवडा जाणवू लागला, तेव्हा याने याचा स्टॉक बाहेर काढला. एक एक खोका त्याने दहापट भावाने म्हणजे पन्नास डॉलरला ऑनलाईन विकला! आता बसल्या बसल्या काळाबाजार करून प्रचंड पैसा कमावण्याची आयडिया त्याला सापडली होती. 

दिनांक २८ फेब्रुवारी रोजी अमेरिकेत कोरोनाचा पहिला रुग्ण दगावला. तोपर्यंत निवांत असणाऱ्या अमेरिकेचे आता मात्र धाबे दणाणले. आपला मॅट भाऊ या भीतीचा फायदा न घेईल तरच नवल! त्याने आणि त्याच्या भावाने काय करावं? त्यांनी आपला ट्रक बाहेर काढला आणि तीन दिवसात १३०० मैलांचा प्रवास करून सगळ्या शॉपिंग मॉल्समधले सॅनिटायझरचे शेल्फ रिकामे केले आणि ते सॅनिटायझर व अँटीबॅक्टरीअल वाईप्स आपल्या ट्रकमध्ये भरले. आता दुकानातले सॅनिटायझर संपल्यानंतर लोक ऑनलाईन साईट्सवरच शोधणार! मग या मॅट भाऊने फक्त दोन-तीन डॉलर किंमत असणाऱ्या सॅनिटायझरची शंभर-दीडशे डॉलरला विक्री सुरू केली. 

कसं असतं बघा, संकटकाळात लोक घाबरलेले असतात. त्यांना स्वतःची आणि कुटुंबाची काळजी असते. अशावेळी ते पैशांचा विचार करत नाहीत, कारण जिवंत राहणे ही त्यावेळी जास्त महत्त्वाचं असतं. लोकांनी वाट्टेल त्या किमतीत सॅनिटायझर खरेदी करण्याचा सपाटा लावला.  मॅट भाऊ आता अमेरिकेतली सर्वात श्रीमंत व्यक्ती बनायचे स्वप्न बघू लागले होते. पण… 

पण हा काळाबाजार ऍमेझॉनच्या लक्षात आला. ऍमेझॉनने मॅटचे अकाउंट तपासले असता बऱ्याच संशयास्पद गोष्टी त्यांना आढळून आल्या. मग हे गैरप्रकार रोखण्यासाठी ऍमेझॉनने मॅट आणि इतर अशा विक्रेत्यांचे अकाउंट ताबडतोब सस्पेंड करून टाकले! बरं, एवढ्यावर ते थांबले नाहीत. तर इतर ऑनलाइन शॉपिंग साईट्सनासुद्धा त्यांनी याची कल्पना देऊन ठेवली. 

आता?? आता अशी परिस्थिती आहे की एकीकडे लोकांना सॅनिटायझर मिळत नाहीयेत आणि दुसरीकडे मॅट भाऊ तब्बल १७,७०० सॅनिटायझरच्या बाटल्या बुडाखाली घेऊन 'याचं पुढे काय करावं?' असा विचार करत बसले आहेत. 

तर काळाबाजार करणाऱ्या विक्रेत्यांनो, तुमचा 'मॅट कॉव्हीन' व्हायला वेळ लागणार नाही. वेळीच सुधारा.  सोन्याची अंडी देणारी कोंबडी अतिहव्यासाच्या नादात कापून खायला बघाल तर हातात तंबोरा येईल. मॅटचे उदाहरण समोर आहेच! 

लेखक : अनुप कुलकर्णी

बातमी सौजन्य : न्यूयॉर्क टाइम्स

सबस्क्राईब करा

* indicates required