रिग्रेट अय्यरांच्या नावामागची गमतीशीर गोष्ट...तुम्हांला असं कोणतं नांव घ्यावंसं वाटेल, आणि का ??

नावात काय ठेवलाय असं शेक्सपियर आजोबा म्हणून गेले असले तरी नावातच आपली ओळख असते भाऊ. नावावरून व्यक्ती ओळखली जाते. जन्म झाल्यावर आपल्याला आई वडिलांनी जे नाव दिलेलं असतं त्या व्यतिरिक्तही अनेक नावे आपल्याला मिळतात. आज अश्या एका माणसाला भेटूया ज्याला आयुष्यात मिळालेल्या ‘नकारावरून’ नवीन नाव मिळालं. हा माणूस आहे ‘रिग्रेट अय्यर’.

स्रोत

Regret म्हणजे ‘खेद असणे’ किंवा ‘दिलगीर असणे’. तर, सत्यनारायण अय्यर (वय ६७) हे बंगलोर येथे राहतात. ते स्वतःला लेखक, पत्रकार, व्यंगचित्रकार, फोटोग्राफर असं बहुआयामी समजतात. त्यांनी फार पूर्वीपासून वर्तमानपत्रासाठी लिहिण्यास सुरुवात केली. ते वृत्तपत्र संपादकांना व प्रकाशकांना पत्र पाठवून आपलं लेखन छापून यावं म्हणून विनंती करायचे. पण त्यांना होकाराच्या जागी नकारच मिळत गेला. प्रकाशकाकडून किंवा संपादकाकडून त्याला दिलगिरी व्यक्त करत साफ नकार दिला जायचा.

पहिला नकार मिळाल्यानंतर नकारांची अक्षरशः लाईनच लागली. नकार मिळालेली पत्र अय्यर महाशयांनी फेकून न ठेवता जमा करून ठेवली आहेत. आज पर्यंत त्यांना ३७५ नकार पत्र (regret letter) मिळाली आहेत. या रिग्रेटमुळेच त्यांनी आपलं नाव चक्क सत्यनारायण अय्यर वरून रिग्रेट अय्यर बदलून घेतलं.

स्रोत

एकदा नागेश हेगडे नामक एका पत्रकाराने अय्यर साहेबांची ‘रिग्रेट लेटर्स’ बघितली आणि यावर त्यांनी एक लेख लिहिला. गंमत म्हणजे हेगडेंनी स्वतः देखील अय्यर ला नकार दिला होता. त्यानंतर संपर्कात आल्यावर त्यांनी या पात्रांवर नजर टाकली आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. “दुसरा कोणी असता तर त्याने या पात्रांना लोकांपासून लपवून ठेवलं असतं पण अय्यर मात्र ते अभिमानाने सर्वांना दाखवतात.’ हेगडे यांनी आपल्या लेखात अय्यर यांना पहिल्यांदा ‘रिग्रेट अय्यर’ म्हटलं होतं.

एवढा नकार का मिळाला असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. हेगडे यांनी यावर असं म्हटलं की, “अय्यर हे सर्वच विषयांवर सखोल अभ्यास करून आणि सर्व माहिती गोळा करून लिहितात पण ते लिखाण वाचनीय नसतं.”

स्रोत

आपल्याला मिळालेला नकारच आपली ओळख असं ठरवून हेगडेंनी दिलेलं लेखातील नाव अय्यर यांनी धारण केलं. त्यांनी कोर्टात जाऊन कायदेशीररीत्या आपलं नाव बदललं. आपल्या पासपोर्ट वर आणि लग्नाच्या पत्रिकेवर सुद्धा त्यांनी रिग्रेट अय्यर हेच नाव लावलं आहे. पुढे त्यांच्या मुलांनी देखील वडिलांचं नाव म्हणून ‘रिग्रेट’ हेच नाव निवडलं.

ज्या शब्दाने त्यांचं करियर धोक्यात आणलं होतं त्याच शब्दाने ‘नाव’ होताच आपली कमाल दाखवली. नाव बदलल्या नंतर काही काळातच कन्नड वृत्तपत्र आणि प्रकाशकांनी त्यांचे लेख छापण्यास सुरुवात केली. त्यांना मिळणारा नकार आता होकारामध्ये बदलला होता. अय्यर यांनी आपल्या शर्टवर, पेनवर, कॅमेऱ्यावर, स्कूटरवर आणि हेल्मेटवर सुद्धा ‘रिग्रेट अय्यर’ नाव छापून घेतलं.

स्रोत

नाव मिळालं आहे त्यात लाजायचं काय ?

‘आम्ही दिलगीर आहोत’ किंवा आम्हाला ‘हे सांगण्यास खेद होत आहे’. अश्या नकारात्मक वाटणाऱ्या गोष्टींना अय्यर महाशय सकारात्मकरीत्या घेऊन आयुष्य जगात राहिले. त्यांची ही गोष्ट गमतीदार असली तरी अय्यर यांच्या संयमाची दाद दिली पाहिजे.

सबस्क्राईब करा

* indicates required