computer

हा माणूस स्वतःच्याच दाढीमुळे मेला!! पण कसा? वाचा ही मजेदार गोष्ट!

ऑस्ट्रियाचं ‘ब्राउनाउ अॅम इन’ हे लहानसं गाव हिटलरचं जन्मस्थान म्हणून कुप्रसिद्ध आहे, पण एका अजब घटनेबद्दलही ते ओळखलं जातं. ब्राउनाउ अॅम इनचे मेयर हान्स स्टेनिंजर हे त्यांच्या लांबलचक दाढीसाठी प्रसिद्ध होते. इतिहासातली सर्वात लांबलचक दाढी असा त्यांचा नावलौकिक आहे. गम्मत म्हणजे त्यांच्या याच लांबलचक दाढीने त्यांचा जीव घेतला.. काय घडलं होतं तेव्हा? चला जाणून घेऊया.

ही गोष्ट १५६७ सालातली आहे. हान्स स्टेनिंजर हे एक नेता म्हणून तर प्रसिद्ध होतेच पण त्यांच्या ४.५ फुट लांब दाढीमुळे त्यांना वेगळी ओळख मिळाली होती. वर्षानुवर्ष अत्यंत काळजीपूर्वक त्यांनी आपली दाढी राखली होती. दाढी व्यवस्थित राहावी म्हणून त्यांनी खिसे तयार करून घेतले होते. या खिशांमध्ये दाढी गुंडाळून ठेवली जायची. समजा दाढी तशीच लोंबकळत ठेवली आणि कोणी त्यावर पाय दिला तर जीव जाण्याची वेळ आली असती. आणि नेमकं हेच घडलं.

२८ संप्टेंबर १५६७ साली ब्राउनाउ अॅम इन गावाला आग लागली. अशावेळी जे घडतं तेच झालं. लोकांमध्ये घबराट पसरली आणि एकच धावाधाव सुरु झाली. मेयर असल्याने लोकांना शांत करण्याची जबाबदारी हान्स स्टेनिंजर यांच्यावर होती. याच घाईगडबडीत त्यांची दाढी खिशातून बाहेर पडली, पण वेळ नसल्याने ती पुन्हा गुंडाळून ठेवण्यास ते विसरले.

हान्स स्टेनिंजर हे पायऱ्यांच्या टोकावर उभे होते आणि अचानक त्यांचा पाय स्वतःच्याच दाढीवर पडला. दुसऱ्याच क्षणाला ते पायऱ्यांवरून कोसळले. त्यांच्या दाढीच्या दोन टोकांमध्ये ते असे काही अडकले की त्यांची मान मोडली. ज्या दाढीचा हान्स स्टेनिंजर यांना अभिमान होता त्याच दाढीने त्यांचा जीव घेतला. 

हान्स स्टेनिंजर यांच्या मृत्युनंतर ब्राउनाउ अॅम इनच्या नागरिकांनी त्यांच्या आठवणी सांभाळून ठेवल्या. हान्स स्टेनिंजर यांची एक भलीमोठी मूर्ती तयार करण्यात आली. ही मूर्ती आजही गावात आहे. लोक इथेच थांबले नाहीत. त्यांनी हान्स स्टेनिंजर यांना पुरण्यापूर्वी त्यांची दाढी कापून घेतली. ही दाढी आज गावाच्या वस्तुसंग्रहालयात जपून ठेवण्यात आली आहे. पर्यटकांना या दाढीची प्रतिकृती दिली जाते. 

तर, कसा वाटला हा लेख? आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका.