computer

पाकिस्तान, आंबा, हिलरी क्लिंटन आणि मँगो डिप्लोमसी.. आंब्याबद्दल या गोष्टी तुम्हाला नक्कीच माहित नसतील !!

गझल, क्रिकेट हे आयटम भारत असो वा पाकिस्तान एक सारखेच लोकप्रिय आहेत.  एकच वस्तू अशी आहे जी दोन्ही देशात कायम लोकप्रियतेच्या शिखरावरती असते. ती गोष्ट म्हणजे “आंबा” !

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात आंब्याला राष्ट्रीय फळाचं आढळस्थान मिळालेलं आहे. अर्थात काही फरक नक्की आहेत. ते असे की हापूस त्यांच्याकडे नाही आणि भारतात एकूण १२०० आंब्याच्या जाती मिळतात. तर, पाकिस्तानची दौड फक्त ४०० जातींपर्यंत आहे. पण जाऊ द्या, आपण कशाला जातीपातीत पडायचं. 

आज आम्ही अशा आंतरराष्ट्रीय फळाबद्दल अशी काही माहिती सांगणार आहोत जी बऱ्याच जणांना माहिती नसेल. थोडक्यात आम्ही सांगणार आहोत मँगो डिप्लोमसी बद्दल. मराठीत सांगायचं झालं तर त्याला आंब्याचा राजशिष्टाचार किंवा राजशिष्टाचार (मार्गे) आंबा असं म्हणता येईल. 

(अन्वर रातोल)

तर मंडळी, पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झिया-उल-हक यांनी या मँगो डिप्लोमसीची सुरुवात केली. सीमेवर गोळीबार चालू असताना देखील हे गृहस्थ इमानदारीत भारतीय पंतप्रधानांना आंब्याच्या पेट्या पाठवायचे. आता यांच्याकडे हापूस नव्हता म्हणून ते रातोल अन्वर जातीचे आंबे इंदिरा गांधींना पाठवायचे. अन्वर रातोल हा आंबा जगभर रसाळ आणि गोड म्हणून प्रसिद्ध आहे. पण हा आंबा पाठवण्यात एक मेख होती. ती अशी की आंब्याच्या पेटी आडून त्यांना हे सुचवायचे होते की “पाकिस्तानी आंबा भारतीय आंब्यापेक्षा सरस आहे.” बिचाऱ्या झिया-उल-हक यांचा अंत सुद्धा आंब्याच्या पेटीमुळे झाला.

(झिया-उल-हक)

असं म्हटलं जातं की ज्या विमान अपघातात झिया-उल-हक हे मरण पावले त्या विमानात बहावालपूर मधून आंब्याच्या पेट्या ठेवलेल्या होत्या. काहीजणांचे म्हणणे असे आहे की या पेट्यांमध्येच बॉम्ब ठेवले गेले होते. दुसरी एक शंका अशी पण आहे की त्या आंब्याच्या पेटीत असलेल्या केमिकलमुळे वैमानिकाचे भान हरपले आणि अपघात झाला. 

आता अन्वर रातोल या आंब्याच्या गोडीबद्दल काही वादच नाही, पण झिया-उल-हक यांना हे माहिती नव्हते की अन्वर रातोल हा पाकिस्तानी आंबा नाहीच. हा आंबा मूळचा रातोल नावाच्या गावचा आहे जे गाव दिल्लीपासून तासाभराच्या अंतरावर आहे. तिथल्या एका अन्वर नावाच्या शेतकऱ्याने ही आंब्याची जात फाळणीपूर्वी काही वर्षांपूर्वी विकसित केली होती. हे कुटुंब नंतर पाकिस्तानात स्थाईक झालं आणि सोबत अन्वर रातोलची काही रोपं पण तिकडे घेऊन गेलं. 

ही माहिती माध्यमातून जगभर पसरली त्यानंतर आजही आंब्याच्या पेट्या भारतीय पंतप्रधानांना भेट म्हणून येतात पण आता अन्वर रातोल ऐवजी चौसा पाठवला जातो. 

हीच परंपरा नवाज शरीफ यांनी पुढे काही वर्ष चालवली. २०१५ साली ईदच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना आंब्याच्या पेट्या पाठवल्या होत्या. (त्याचवेळी भारतीय जवानांनी पाठवलेली मिठाई पाकिस्तानी सैनिकांनी नाकारली होती.)

आता पुढचा किस्सा ऐका.

या आंबा प्रकरणाला मँगो डिप्लोमसी म्हणण्याची सुरुवात मात्र या भेट पेटी मधून झाली नाही. युपीएच्या काळात कमलनाथ वाणिज्य मंत्री असताना काही वाटाघाटीदरम्यान त्यांची भेट ‘हिलरी क्लिंटन’ यांच्या सोबत झाली. त्याकाळात हार्ले-डेव्हिडसन मोटारसायकली भारतात आणण्यास परवानगी नव्हती. ‘हिलरी क्लिंटन’ म्हणाल्या की तुम्ही हार्ले-डेव्हिडसनला भारतीय बाजारपेठ उपलब्ध करून देणार असाल तर हापूस आंबा अमेरिकन बाजारपेठेत विकण्याची परवानगी मिळेल. या प्रसंगाच्या एका साक्षीदाराने या प्रसंगाचं वर्णन करताना मँगो डिप्लोमसी असं नाव दिलं. तेव्हापासून मँगो डिप्लोमसी हा शब्द प्रचलित झाला. 

आता तुम्हाला या मँगो डिप्लोमसीची आणखी एक तुम्ही न ऐकलेली कथा सांगतो. 

ब्रिटीशांकडे मुंबई आल्यानंतर त्यांनी विक्रोळी, कांजुरमार्ग, पवई, गोरेगाव, या भागातल्या जमिनी श्रीमंत पारशी जमीनदारांना कसायला दिल्या होत्या. या पारश्यांनी पवई, भांडूप परिसरात आंब्याची लागवड सुरु केली. १८३८ साली फ्रामजी कावसजी या पारशी व्यापाऱ्याने व्हिक्टोरिया राणीला खास बॉम्बे मँगोजच्या चार करंड्या भेट म्हणून पाठवल्या. त्यांनतर राणीला आंबे खूप आवडले असे पत्रही थेट राणीच्या दरबारातून पारशाला आले होते. 

मंडळी, मँगो डिप्लोमसी हे नाव २१व्या शतकात आलं असेल, पण आपली मँगो डिप्लोमसी १८३८ सालापासून चालत आलेली आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required