computer

अंतराळात 'पीवर' दारुचा ढग तरंगतो आहे...अहो चेष्टा नाही, खरोखरच आहे !

एक खूषखबर आहे. अंतराळात एका नक्षत्रपुंजात एक प्रचंड मोठ्ठा अल्कोहोलचा म्हणजे एकदम 'पीवर' दारुचा ढग तरंगतो आहे अशी खात्रीलायक बातमी हाती आली आहे. आता किती मोठ्ठा म्हणजे बीअरच्या २०० ट्रिलीयन बाटल्या बनवता येतील इतकी वाफ या ढगात भरलेली आहे. एक ट्रिलीयन म्हणजे एक लाख कोटी. या हिशोबाने हा कोटा संपवायला आपल्याला साधारण १ कोटी वर्षं लागतील!! इतकंच नाही, हा सगळा साठा अंतराळात असल्याने तो फुकटच मिळणार आहे. पण एकच समस्या आहे ती अशी की हा ढग आपल्यापासून फक्त १०,००० प्रकाशवर्षं दूर आहे. एकदा का तिथे पोहचलो की पार्टीच पार्टी!

चला हा निव्वळ मनोरंजन आणि मस्करीचा भाग आम्ही तुम्हाला सांगितला, पण असा ढग खरोखर आहे का? असेल तर कुठे आहे? का आहे? ते आता शास्त्रीय पध्दतीने समजून घेऊ या!!

आपल्याला ज्या विश्वाची व्याप्ती अजूनही पुरेशी समजून आलेली नाही अशा अवकाशात अनेक ग्रह-तार्‍यांचे जन्म होत असतात. या ग्रहांच्या जडणघणीच्या प्रवासात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वायू निर्माण होत असतात. त्यांना पुरेशी उर्जा मिळाली की त्यांचे वेगवेगळ्या रेणूत रुपांतर होते. यापैकी कार्बन -हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचे अस्तित्व तिथे असेल तिथे अल्कोहोलचे म्हणजे इथेनॉल रेणू तयार होतात. हे रेणू आसपासच्या धुळीला चिकटतात. त्यामुळे या ढगांची निर्मिती होते. विश्व-अवकाशात घडणार्या- अनेक घटनांपैकी ही एक घटना असते. आता गंमत अशी आहे की प्रत्येक वेळा इथॅनॉल तयार होते असे नाही. काही वेळा असेच मिथॅनॉलचेही ढग पण तयार होतात. Sagittarius B2 या अवकाशातील मिथॅनॉलचा ढग आतापर्यंत आढळलेल्या ढगात सर्वात मोठा आहे. मिथॅनॉल म्हणजे आपण ज्याला 'पॉलीश' म्हणतो ते अल्कोहोल. हे अल्कोहोल प्यायल्यामुळे माणसं मेल्याच्या अनेक घटना आपण पेपरात वाचतच असतो.

आता वर उल्लेख केलेला ढग हा इथेनॉलचा बनलेला आहे. इथेनॉल म्हणजे आपण अल्कोहोल पितो ते अल्कोहोल. १९९५ साली शास्त्रज्ञांना हा ढग 'अकीला' या नक्षत्रपुंजामध्ये -ज्याला 'अकीला कॉन्स्टेलेशन' म्हणतात तेथे आढळला. आपल्या भारतीय पध्दतीत २७ नक्षत्रांना वेगवेगळी नावे दिली आहेत. त्याप्रमाणे विचार करायचा झाल्यास तर हा ढग 'श्रवण' नक्षत्रात आहे.

अनंत वैश्विक चमत्कारांपैकी हा एक चमत्कार आहे. असे असंख्य ढग असतील, अनेक वायूंचे ढग असतील तर या इथॅनॉल ढगाचा बोभाटा का करायचा? एथेनॉलचा ढग हा जीवनिर्मितीचा पहिला टप्पा समजला जातो. यातूनच पुढे सजीवांची निर्मिती होणार असते. याचाच अर्थ असा की इतक्या मोठ्या विश्वात फक्त आपण सजीव नाही. आणखी कुठेतरी सजीव सृष्टी असेल. काही ठिकाणी ती जन्माला येत असेल तर काही ठिकाणी ती पूर्णत्वाला पोहचली असेल. आज आपल्याला त्याचा पत्ता नाही, पण काय सांगावं एखाद्या दिवशी ' कोई मिल गया' टाईप एखादा मित्र आपल्याला भेटेलही!

सबस्क्राईब करा

* indicates required