computer

कपड्यांची वाट लावून घ्यायची नसेल तर या चिन्हांचा अर्थ समजून घ्यायलाच हवा !!

मंडळी, परवा आमच्या एका मित्राने मजाच केली. त्याने बाजारातून एक झक्कास शर्ट विकत घेतला आणि घरी आल्यावर गरम पाण्याने छानपैकी धुतला. आणि नंतर बघतो तर काय राव, सगळ्या शर्टाची वाट!!! मी म्हंटलं, अरे तू कपड्याच्या टॅगवरच्या सूचना वाचल्यास का? तर म्हणाला, “अरे, त्या सूचना कळण्यासाठी ती चिन्हं कळायला पाहिजेत ना! चिन्हं कसली, इजिप्तच्या पिरॅमीड्समधली चित्रलिपीच असते ती !!!

मंडळी, आपल्यापैकी अनेकजणांचा हाच प्रॉब्लेम असतो. कित्येकजणांना तर त्या चिन्हांचं प्रयोजनच माहीत नसतं. पण या प्रत्येक चिन्हामागे एक विशिष्ट अर्थ असतो. आज आपण त्या प्रत्येक चिन्हाचा अर्थ क्रमाक्रमाने समजून घेऊया. परंतु त्याआधी आपण काही टिप्स बघू जेणेकरून आपल्याला चिन्हं समजून घेणं सोपं जाईल....

-> चिन्हांमधे असलेला रंगीत ठिपका हा उष्णतेचं प्रतीक आहे. चिन्हांच्या खाली असलेली रेघ ‘कपडा हळुवार धुवावा’ हे सूचित करते. तसंच ज्या चिन्हांवर काट मारलेली असते ती कृती करू नये, असा त्याचा अर्थ होतो.

आता चिन्हांकडे वळू....

१) धुलाई:

धुलाईसंबंधीच्या सूचना बादलीच्या चिन्हाने दाखवलेल्या असतात. आधी सांगितल्याप्रमाणे, जेवढे ठिपके असतील, तेवढ्या गरम पाण्यात कपडे धुवावेत. उदा. एक ठिपका म्हणजे थंड पाणी, दोन ठिपके म्हणजे कोमट इ. कपडा हाताने धुवायचा असल्यास हात घातलेल्या बादलीचं चिन्ह असतं.

२) ब्लीचिंग:

ब्लीचिंगची सर्व चिन्हं त्रिकोणी आकाराची असतात. पूर्ण ब्लॅंक त्रिकोण म्हणजे ब्लीचिंग करणे शक्य आहे, जर त्रिकोणात रेघ मारली असेल तर ब्लीचिंगसाठी क्लोरिनयुक्त पदार्थ वापरू नयेत आणि त्रिकोणावर काट मारली असल्यास ब्लीचिंग करू नये (नाहीतर वाट लागलीच म्हणून समजा!!).

३) इस्त्री करणे:

इथे पण ठिपक्यांवरून आपल्याला कोणत्याही कपड्याला इस्त्रीसाठी किती तापमान लागतं हे लक्षात येईल. जर इस्त्रीच्या खाली काढलेल्या दोन समांतर रेषांवर काट मारली असल्यास ते चिन्ह ‘स्टीमर वापरू नये’ असं सूचित करतं.

४) कपडे वाळवणे:

ही चिन्हं समजायला सर्वात कठीण! ह्यातील ‘चौकोनात असलेलं वर्तुळ’ हे चिन्ह ‘ड्रायर’शी साधर्म्य दाखवणारं आहे. इथेदेखील ‘ठिपका = उष्णता किंवा तापमान’ हे समीकरण कायम आहे बरं!! फक्त आतलं वर्तुळ जर पूर्णपणे रंगवलं असेल तर कपडे साध्या पद्धतीने वाळू द्यावे आणि आतलं वर्तुळ रंगवून त्यावर काट मारली असेल तर कपडे ड्रायरमधे टाकू नयेत. चौकोनात तीन उभ्या रेघा म्हणजे कपडे टांगून वाळत घालावेत, चौकोनात एक उभी रेघ म्हणजे कपडे स्टॅंड/रॅकवर वाळत घालावेत आणि पत्रासारखं दिसणारं चिन्ह म्हणजे कपडे दोरीवर वाळत घालावेत.

५) ड्राय क्लीनिंग:

अखेरीस, ड्राय क्लीनिंग! वर्तुळ हे त्याचं चिन्ह. वर्तुळावर काट मारली असल्यास ड्राय क्लीनिंग वर्ज्य! पण जर वर्तुळात कोणतंही अक्षर असेल तर त्याचा अर्थ बदलतो हां! जर वर्तुळात ‘A’ व ‘P’ अक्षर असेल तर कोणतेही विद्रावक पदार्थ (Solvent) वापरता येतात. वर्तुळात ‘F’ अक्षर असेल तर पेट्रोलियमयुक्त विद्रावक पदार्थ (Solvent) वापरता येतात. जर वर्तुळाच्या बाहेर छोटी रेघ असल्यास स्टीमिंग न करता ड्राय क्लीनिंग करावं.

आता अनेक मंडळीना प्रश्न पडला असणार की ही सगळी चिन्हं आपल्या देशातली. बाकीच्या देशांतल्या चिन्हांचं काय? तर घाबरू नका भाऊ, सगळ्या देशांतली चिन्हं सारखीच असतात! त्यामुळे फिकर नॉट!

आमचा हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा!

 

लेखक : प्रथमेश बिवलकर

सबस्क्राईब करा

* indicates required