computer

फक्त ३५०० रुपयांची गुंतवणूक करून व्यवसाय सुरु केलेली हि महिला आता दरमहा १.५ लाख रुपये कमावते

इच्छा तेथे मार्ग असं म्हटलं जातं, पण हा मार्ग चोखाळणं वाटतं तितकं सोपं नसतं. त्यातही नोकरी आणि स्वत:चा उद्योग अशा दोन्ही दरडीवर पाय ठेवून चालणं म्हणजे किती मोठे आव्हान! पुण्यातील एका महिलेने हे आव्हान समर्थपणे पेलून दाखवले आहे. कोशिंबीरीसारख्या छोट्याशा तोंडलावणीसाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थातून ती वर्षाला लाखो रुपये कमवते. कोशिंबीर किंवा सलाद या पौष्टिक पदार्थाची गरज अगदी मधुमेही रुग्णांपासून ते फिटनेस फ्रिक लोकापर्यंत सगळ्यांनाच असते. तशी अगदी सोपी आणि छोटी गोष्ट असली तरी ती वडापाव, मिसळ किंवा बर्गर-पिझ्झाप्रमाणे चटकन उपलब्ध होत नाही. हीच तफावत ओळखून पुण्याच्या मेघा बाफना यांनी आधी छोट्या ऑर्डरींपासून या उद्योगाला सुरुवात केली. अर्थात, गरज लक्षात आली म्हणून त्यावर काम सुरु केलं आणि यश मिळालं असं होत नाही. त्यासाठी सातत्य, कष्ट आणि महत्वाची असते ती आवड.

मेघा नववीत असतानाच त्यांना एका मोठ्या ऑपरेशनमधून जावं लागलं. १८ महिने अंथरुणावर खिळून राहिल्यानंतर त्यांना आरोग्याची खरी किंमत कळाली होती. त्यातही त्यांच्या आरोग्याबाबत पुढेही काही गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होऊ शकतात असा धोक्याचा इशारा डॉक्टरांनी आधीच देऊन ठेवल्याने त्या आपल्या आरोग्याबाबत अधिकच सजग झाल्या. काही काळाने त्यांनी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. सोबत आर्थिक स्वावलंबनासाठी म्हणून त्या नोकरी करू लागल्या. इतर सहकाऱ्यांप्रमाणे त्यांना कॅन्टीनचं खाणं झेपलं नसतं म्हणून त्या आवर्जून घरूनच डबा घेऊन जात. त्यांच्या या डब्यात दररोज न चुकता समाविष्ट असणारा पदार्थ म्हणजे सलाद! त्यांच्या डब्यातील या सलादची चव त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनाही आवडू लागली. मुळातच महत्वाकांक्षी असणार्‍या मेघा यांना यात एक नवी संधी दिसली आणि त्यांनी सलाद बनवून ते पुरवण्याचा व्यवसाय का करू नये अशा विचाराने काम सुरू केले. तिच्या सहकाऱ्यांनाही सलाद हवेच होते. फक्त सहा ऑर्डर्सपासून सुरुवात झाली. यासाठी गुंतवणूक खर्च होता फक्त ३५०० रुपये. या सहा ग्राहकांच्या माध्यमातून आणखी नवे ग्राहक जोडले गेले आणि पाहता पाहता दिवसाला ३०० ऑर्डर्सपर्यंत हा व्यवसाय वाढला. माउथ पब्लिसिटी हाच त्यांच्या व्यवसायाचा मुख्य आधार राहिला आहे. त्यांनी कधीही आपल्या व्यवसायाचे कोणत्याही माध्यमातून पेड प्रमोशन केले नाही असे त्या म्हणतात.

इतक्यात सरकारने प्लास्टिक बंदी घातली आणि मेघा यांच्यासमोर सलाद पॅकिंगचा एक मोठा प्रश्न उपस्थित झाला. प्लास्टिक बंद असल्याने त्यांनी अल्युमिनियम फाउलमधून पॅकिंग करण्यास सुरुवात केली. पण ग्राहकांना हे पॅकिंग आवडले नाही. या पॅकिंगचा ऑर्डरींवर विपरीत परिणाम झाला. नोकरी, घर, व्यवसाय सगळ्या कसरती जमवताना आधीच मेघा यांची तारांबळ उडत होती. त्यात ऑर्डरींची संख्या ३०० वरून ५० वर येऊन ठेपली. आता व्यवसायाचा या उतरलेला आलेख पुन्हा वर कसा न्यायचा या विचारात असतानाच त्यांना रीयुजेबल प्लास्टिक टिफिनचा पर्याय सुचला आणि त्यासाठी पुन्हा नवी गुंतवणूक करून त्यांनी आपला गेलेला ग्राहक वर्ग आकर्षित करण्यास प्रयत्न सुरू केले. सुरुवातीला त्यांनी सॅम्पल दिले, पुन्हा ग्राहकांचा विश्वास जिंकण्यात त्या यशस्वी झाल्या.
मेघाजी गेल्या चार-ते पाच वर्षांपासून हा व्यवसाय करत आहेत. आज त्यांच्या या व्यवसायामुळे लोकांना पौष्टिक आहार तर मिळतोच आहे, पण जवळपास ३०-४० महिलांना यामुळे रोजगारही मिळाला आहे. त्याच्याकडे सध्या २७ प्रकारचे सलाद उपलब्ध आहेत. लोकांच्या गरजेनुसार त्या या सलादमध्ये बदलही करून देतात.
आज त्यांच्या व्यवसायाचा चांगला जम बसला आहे. पण हा जम बसवताना त्यानी केलेली मेहनतही लक्षात घेतली पाहिजे. सुरुवातीला जेव्हा त्यांनी व्यवसाय सुरू केला तेव्हा त्यांचा दिवस पहाटे चार वाजता सुरू होत असे. चारपासून घरची कामे आवरत-आवरत त्या सलादची तयारी करायच्या. भाज्या आणण्यापासून त्या चिरण्यापर्यंत ते त्यांचे पॅकिंग बनवून कस्टमरपर्यंत ते सलाद पोहोच करेपर्यंत सगळी कामे त्या एकट्याच करत होत्या. आता हाताखाली इतर महिलांची मदत होते त्यामुळे त्यांचा दिवस चारऐवजी साडेसहाला सुरु होतो. इतकी तरी विश्रांती मिळाली; ‘हेही नसे थोडके,’ म्हणत त्यात त्याचाही आनंद मानतात. किमान आठवड्यातून एक दिवस घरच्यांसोबत बाहेर जाता येतं, फिरता येतं याचं तर त्यांना कोण अप्रूप!

नोकरी किंवा व्यवसाय यातील एकाची निवड करणे तसं कठीणच पण दोन्ही सांभाळणं तर महाकठीण! पण मेघा यांनी हे शिवधनुष्य पेलून दाखवलं जिद्द आणि आवड असेल तर आपणही हे शिवधनुष्य पेलू शकतो. तुम्हाला काय वाटतं?

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required