computer

कार वायपर्सचा शोध या बाईंनी शंभरहून अधिक वर्षांपूर्वी लावला.. मग त्याआधी लोक काय करायचे?

आजही बुद्धीची कामं ही बरेचदा पुरुषांची मक्तेदारी समजली जाते. पण जगातले काही महत्त्वाचे शोध हे स्त्रियांनीच लावले आहेत. त्या शोधांमुळे आपलं आजचं आयुष्य इतकं आरामाचं झालं आहे, की आपण त्या स्त्रियांचे उपकार मानायलाच हवेत. पावसाळ्यात वायपर्सशिवाय कुठलीच गाडी चालवता येत नाही. या वायपर्सचा शोधही एका बाईनंच लावला हे माहित आहे का तुम्हांला? 
वाचा तर मग या वायपर्समागची कहाणी..

 कारच्या वायपर्सचा शोध लावला मेरी अँडरसन नावाच्या अमेरिकन बाईनं.  ती रिअल इस्टेट डेव्हलपर होती, तिचं रँच म्हणजे भरपूर जनावरे असणारं शेतघर होतं, ती उत्तमोत्तम प्रतीची द्राक्षं पिकवण्यासाठी संशोधन करायची, द्राक्षं पिकवायची आणि तेव्हाच तिने या काच साफ करण्याच्या ऑटोमॅटिक यंत्राचा शोध लावला. 
 

 मेरी अँडरसनने हा वायपर्सचा शोध लावण्यापूर्वी लोक चालत्या गाडीच्या खिडक्या उघडून काचा पुसत असत. ती स्वत: तर  गाडी चलवत नसे, पण हे पाहून आपण यासाठी काहीतरी करावं असं तिला वाटलं.  तिनं हाताने लिव्हर हलवून काचा पुसण्यासाठी एक रबराच्या पात्याचं डिझाईन बनवलं. मग माणसं लावून ते बनवूनही घेतलं. तिला तिच्या कामाचं महत्त्त्व माहित होतं, त्यामुळे तिनं तेव्हा १९०३ सालीच तिच्या डिझाईनचं स्वत:च्या नावे पेटंट घेतलं. त्या डिझाईनमध्ये गाडीच्या आत लिव्हर असे आणि गाडीच्या बाहेर त्याला जोडलेलं एक रबरी पातं असे. लिव्हर म्हणजे दांडयाला पकडून ते रबरी पातं पुढेमागे करुन काच पुसता येत असे. यात तिनं वजनाचा योग्य ताळमेळ राखल्यानं रबरी पातं आणि काच यामध्ये फट राहात नसे आणि हे सफाईचं काम उत्तमरित्या होई. अशा प्रकारची काही साधनं तेव्हाही उपलब्ध होती, पण त्या प्रत्येकात काही ना काही अडचणी होत्या आणि मेरीचं डिझाईन त्यामुळं सगळ्यांहून अधिक चांगलं होतं. 

मेरीनं घेतेलेलं पेटंट १७ वर्षांचं होतं. त्या अवधीत तर ते काही विकलं गेलं नाही. आधी तर लोकांना वाटलं की त्यामुळे ड्रायव्हरचं चित्त विचलित होईल, पण हाताने लिव्हर हलवणं हे गाडीचं दार उघडून काचा पुसण्यापेक्षा सोपं होतं.  शेवटी १९२०मध्ये पेटंटची मुदतही संपली आणि तेव्हाच कार मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय एकदम तेजीत आला.  कॅडिलॅक या कंपनीनं पहिल्यांदाच तिच्या डिझायईनच्या आधारे त्यांच्या कारमध्ये विंडशिल्ड वायपर्स बनवले आणि त्यांना तिच्या डिझाईनची उपयुक्तता एकदम पटली. 

आज मेरी अँडरसन आपल्यात नाही, पण तिने लावलेला शोध आपण सगळ्या गाड्यांमध्ये वापरत आहोत.  

सबस्क्राईब करा

* indicates required