भारतीयांच्या 'गुड मॉर्निंग'ने गुदमरले गुगल...गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवण्याआधी हे एकदा वाचाच !!

सकाळी उठल्या उठल्या व्हॉट्सअपवरून आपल्या मित्रमंडळींना ‘गुड मॉर्निंग’ चा मेसेज पाठवणे म्हणजे आता एका धार्मिक विधीच झालाय राव. हा विधी केल्याशिवाय दिवस सुरू करताच येत नाही. गुड मॉर्निंग किंवा गुड नाईट हे दोन विधी पार पाडताना प्रत्येकजण ते एक तर लिहून पाठवतो किंवा फॉरवर्ड केलेला फोटो पुढे ढकलतो. त्या फोटोमध्ये छानपैकी फुलं, सूर्य आणि मोठ्या अक्षरात गुड मॉर्निंग लिहिलेलं असतं. काही वेळा तर प्रेरणादायी संदेशही असतो.

आज आम्ही अचानक गुड मॉर्निंगसाठी एवढे ‘सिरीयस’ का झालोय? यापाठी कारण पण मोठं आहे भाऊ!!

स्रोत

भारतीय नागरिकांच्या ‘शुभ प्रभात’ वगैरे म्हणण्याच्या सवयीमुळे ‘सिलिकॉन व्हॅली’ मध्ये बसलेल्या गुगलच्या संशोधकांना चिंतेत पाडलंय राव. भारतात दर दिवशी अनेकांचा मोबाईल फोन ‘आउट ऑफ स्टोरेज’ होतो किंवा ‘हँग’ होतो. स्टोरेज मेमरी भरल्याने मोबाईलवर ताणही पडतो. एवढ्या जलद गतीने मेमरी भरण्यामागची कारणं शोधून काढताना संशोधकांना असं आढळून आलंय की भारतीय लोकांना दर दिवशी ‘गुड मॉर्निंग’ टेक्स्ट आणि इमेजेस पाठवण्याची सवय लागलेली आहे. रोज हजारो फोटो सकाळसकाळी डाऊनलोड केले जातात किंवा फॉरवर्ड केले जातात. यामुळे सगळा भार मेमरीवर येतो.

गुगलच्या रिपोर्ट प्रमाणे भारतीय लोकांकडून गुगलवर जे सर्वात जास्त सर्च केलं जातं त्यात ‘Good Morning images’ हा सर्च टॉपला आहे. हे मागील ५ वर्षांमध्ये वाढल्याचं म्हटलं जातंय. भारतात दर महिन्याला २० कोटी माणसं व्हॉट्सअपचा वापर करतात. एकच मेसेज अनेकांना पोहोचावा म्हणून व्हॉट्सअपने काही महिन्यांपूर्वी स्टेटसमध्ये इमेजेस अपलोड करण्याचा फिचर लाँच केला होता. जेणेकरून इमेजेस डाऊनलोड न करता प्रत्येकालाच ती पाहता येतील.

स्रोत

तर मंडळी आपली ही सवय तर जाणार नाही.  मग यावर गुगलनेच एक तोडगा काढलाय. ‘Files Go’ हे अॅप गुगलने लाँच केलंय जे तुमच्या फोनमधील गुड मॉर्निंगचे मेसेजेस निवडून कायमचं डिलीट करणार आहे. फक्त गुड मॉर्निंग किंवा गुड नाईटचे मेसेजेस आणि फोटो साफ करण्यासाठी हा खास फिचर तयार करण्यात आलेला आहे. शिवाय हा अॅप मोबाईल मधली मेमरी रिकामी करण्याचंही काम करेल. म्हणजे एका बरोबर एक फ्री.

जर तुम्हीही रोज ‘गुड मॉर्निंग’ म्हणण्याचा विधी करत असाल तर हे अॅप डाऊनलोड कराच.

सबस्क्राईब करा

* indicates required