computer

विनाडोक्याची, फक्त धड असलेली जिवंत बाई!! हिने १०० वर्षांपूर्वी कशी खळबळ उडवली होती वाचा!!

कल्पना करा, रस्त्याने जाताना तुम्हाला एखाद्या दुकानाच्या डिस्प्लेवर एका बाईचं डोकं नसलेलं धड दिसलं आणि तिथे डोक्याच्या ऐवजी तीनचार नळ्या असल्या तर... या तपशिलात माणूस निदान एकदा तरी मागे वळून त्या बाईकडे पाहील इतकं कुतूहल चाळवणारं नक्कीच काहीतरी आहे. काय आहे हे? तर हा आहे निव्वळ एक भ्रम. पण तो इतका गाजलेला आहे, की जगभरात या कलाकृतीची आजवर हजारएक वेळा नक्कल करण्यात आली आहे. 

तिचं नाव आहे ओल्गा. जगभरातल्या अनेक शोजमध्ये ती आकर्षणबिंदू ठरली आहे. या बाईची (खरंतर मुलीची) गोष्ट सांगताना असं सांगतात, की शार्कच्या हल्ल्यात किंवा कार अपघातात तिचं डोकं धडावेगळं झालं होतं. तिच्या डोक्याच्या जागी असलेल्या नळ्या तिच्यासाठी संजीवनीसमान होत्या कारण त्यांच्याद्वारे तिला जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक घटक पुरवले जात.

तिच्या आजूबाजूला अनेकदा नर्सेस आणि / किंवा डॉक्टर उपस्थित असायचे आणि ती खरोखरच जिवंत आहे हे सिद्ध करण्यासाठी ती थोडीशी हालचालही करायची. या सगळ्या गोष्टींमुळे प्रेक्षक तिच्याशी जोडले जायचे तरी त्यांच्यासाठी ही गोष्ट फारशी अतिरंजित नव्हती; कारण त्या काळात विज्ञान आणि वैद्यकशास्त्रात प्रचंड प्रगती होत होती आणि सामान्य माणसालाही अनेक गोष्टींचे वैज्ञानिक आधार समजायला लागले होते. 

या बिन डोक्याच्या स्त्रीचा निर्माता होता डॉ. एगॉन हाइनमन नावाचा हॅम्बुर्ग, जर्मनी येथील मनुष्य. १९३९ च्या न्यूयॉर्क वर्ल्ड फेअरसाठी त्याने तिचं सर्वप्रथम अमेरिकेत प्रदर्शन केलं. त्याआधी त्याने ब्लॅकपूल किंवा लंडन इथल्या दुकानांच्या दर्शनी भागात तिचं प्रदर्शन मांडायला सुरुवात केली. 

(डॉ. एगॉन हाइनमन आणि ओल्गा)

ओल्गा प्रचंड गाजली आणि प्रेक्षकांना आकर्षित करण्यात चांगलीच यशस्वी ठरली.  त्या काळात साईड शोमध्ये अशा बिनडोक्याच्या मुली (हेडलेस गर्ल्स) वापरणं ही लोकप्रिय क्लृप्ती होती. स्क्रॅन्टोनियन ट्रिब्यून नावाच्या वृत्तपत्रात १३ एप्रिल १९४१ रोजी साईड शो मॅनेजर स्लिम केली याने या अंकाचं आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे हे स्पष्ट केलं. भिंतीवरच्या एका स्ट्रीप टीझरच्या ३० फूट उंचीच्या पोस्टरकडे बोट दाखवत स्लिमने ओल्गाचा कधीही व्यापार न करण्याची जणू शपथ घेतली होती. अर्थात, त्याच्या म्हणण्याप्रमाणे ओल्गा हा एक भ्रम होता आणि तिला अमेरिकेत आणताना मूळ कलाकृतीवर त्याला १०८ डॉलर्सची कस्टम ड्युटी भरावी लागली होती. तिच्यात जे काही कमी होतं तेच लोकांसाठी आकर्षण आणि उत्सुकता यांचा विषय बनलं होतं एवढं मात्र नक्की!

पण हा भ्रम कसा निर्माण करण्यात आला होता? त्यामागे ट्रिक मिररचा हात होता. हे आरसे अशा प्रकारे बसवलेले होते ज्यामुळे तिचं डोकं लपवलं जायचं आणि त्याऐवजी तंबूच्या भिंतींचं प्रतिबिंब त्या आरशांत दिसायचं, ज्यात त्या ट्यूब्जचा पण समावेश असे. 

काय असेल ते असो, पण हा प्रयोग कमालीचा हटके होता एवढं खरं. आरशाच्या मदतीने हा दृष्टीभ्रम साकारण्याची कल्पना प्रथम मांडणाऱ्या निर्मात्याला एक सॅल्यूट तर ठोकायलाच हवा.

 

लेखिका: स्मिता जोगळेकर

 

आणखी वाचा: 

डोकं छाटलेला हा कोंबडा १८ महिने कसा जिवंत राहिला ?

सबस्क्राईब करा

* indicates required