computer

आता मित्रो ॲपही वादात! ॲप चक्क पाकिस्तानी असल्याचा दावा!

कालच आपण मित्रों ॲपबद्दल बातमी वाचली होती. टिकटॉकला स्वदेशी पर्याय म्हणून भारतात हे शॉर्ट व्हिडीओ मेकिंग ॲप वेगाने लोकप्रिय होतंय. पण तेवढ्यातच या ॲपबद्दल नवीन बातमी येऊन धडकलीय. ती म्हणजे हे ॲप पाकिस्तानी असल्याची!

स्रोत

चायनीज‌ टिकटॉकला दूर लोटत भारतीयांनी या मित्रो नावाच्या ॲपला आपलं देसी ॲप म्हणून जवळ केलं. पण मुळात मित्रों हे ॲप TicTic नावाच्या एका पाकिस्तानी ॲपचं नवं रूप आहे. पाकिस्तानी सॉफ्टवेअर डेव्हलपर कंपनी Qboxus ने हे TicTic ॲप बनवलं होतं. इरफान शेख नावाचा एक माणूस या कंपनीचा संस्थापक आणि CEO आहे. या इरफानचं म्हणणं आहे की त्याने या‌ TicTic ॲपचा सोर्स कोड ‌मित्रों‌ ॲप बनवणा-या व्यक्तीला ३४ डॉलर्स, म्हणजेच २५०० रूपयांना‌ विकलाय. मित्रों ॲपच्या निर्मात्याने या कोडमध्ये कोणतेही वेगळे बदल‌ केले नाहीत. अगदी ॲपचा युझर इंटरफेस म्हणजे त्याचं बाह्यरूपही बदललं नाहीय आणि विकत घेतलेलं ॲप मित्रों या नावाने प्ले स्टोअरवर आणलं आहे. ज्यामुळे या ॲपला मेड इन‌ इंडिया म्हणणं चुकीचं ठरतं, असं या इरफान शेख बाबांचं म्हणणं आहे.

स्रोत

आता यापुढची गंमत अशी की या मित्रों ॲपचा निर्माता कोण हेच अजूनपर्यंत समोर‌‌ आलेलं नाहिये. पण IIT रूरकीच्या एका विद्यार्थ्यानं हे ॲप बनवलं असल्याचं सांगितलं ‌जातंय. प्ले स्टोअरवरती मित्रों ॲपची डेव्हलपर‌ वेबसाईट Shopkiller.com या नावाने दिली आहे. पण हे वेबपेजही पूर्णपणे रिकामं आहे. या ॲपची प्रायव्हसी पॉलिसीही दिलेली नाही. त्याचबरोबर हे ॲप अनेक प्रकारच्या फोन परमिशन्स घेतं, त्यामुळेही ॲप वापरणाऱ्यांचा डेटा किती सुरक्षित आहे हे सांगणं कठीण आहे.

मित्रों ॲप वापरणा-या अनेकांनी ॲपमध्ये अनेक दोषही असल्याचंही सांगितलंय. पण तरीही फक्त भारतीय ॲप आहे म्हणून अनेकांनी ॲपला हाय रेटिंग्ज दिल्या आहेत.

स्रोत

सोर्स‌ कोड विकत घेऊन‌ नवं‌ ॲप तर बनवलं. पण त्यात काहीही बदल न करता ते आहे तसंच आपल्यासमोर ठेवलं. त्यामुळे आता हे ॲप भारतीय की पाकिस्तानी, हे तुम्हीच ठरवा बुवा!!

सबस्क्राईब करा

* indicates required