भारतातल्या या राज्यात कित्येक वर्षांपासून दुकानदारांशिवाय दुकानं चालत आहेत..

Subscribe to Bobhata

शनिशिंगणापुरातल्या घरांना दारं, कड्या आणि कुलुपं नाहीत हे तुम्ही पाहिलं असेल,  कंडक्टर नसलेल्या शिवनेरीत नाहीतर गावाकडच्या सुपरफास्ट एसटीत तुम्ही बसला असाल, पण दुकानदारच नसलेली दुकानं कधी तुम्ही पाहिली आहेत? नसतील तर मग एकदा मिझोरमला भेट द्याच.

मिझोरमच्या जनतेचा  लोकांच्या प्रामाणिकपणा आणि सचोटीवर खूपच विश्वास आहे. तिथले शेतकरी हायवेच्या बाजूला आपल्या टपर्‍यांमधून दुकानं लावतात. या दुकानांत ठेवलेली असतात फुलं-फळं, ज्यूस, शेतातल्या ताज्या टवटवीत भाज्या, बांबूचे कोवळे कोंब, वाळवलेली आणि खारवलेली मासळी. काही दुकानांत तर गोगलगायीसुद्धा विकायला ठेवलेल्या असतात. तिथल्या लोकांना खायला फार आवडतात म्हणे त्या.  दुकानातच एका पाटीवर सगळ्या गोष्टींचे दर लिहिलेले असतात आणि ठेवलेला असतो एक पैशांचा डबा. लोक येतात, दुकानातला माल पाहतात, काही आवडलं तर घेतात आणि लिहिलेल्या दराप्रमाणं गल्ल्यात पैसे टाकून जातात. कधी कधी मोठ्या नोटा असतील तर त्याच गल्ल्यातली ते चिल्लर परतही घेतात. पण म्हणून कुणी तिथं दुकानदार नाही म्हणून गैरफायदा घेत नाही बरं. 

मिझोरम सेव्हन सिस्टर्स म्हणून ओळखल्या जाणार्‍या आपल्या पूर्वांचलातलं एक राज्य आहे. तिथं हिरवागार निसर्ग भरपूर असला तरी शेतकर्‍याकडे खूप पैसा नाही.  स्वत: शेतातला माल विकायला बसून शेतातल्या कामासाठी मजूर लावायला त्याला परवडत नाही. त्यामुळं  सकाळी असं दुकान लावून शेतात आपल्या कामाला जाणं त्याला मस्त परवडतं. काम पण होतं आणि माल विकून पैसेही मिळतात. त्यांच्या दुकानांच्या या पद्धतीला मिझो भाषेत म्हणतात- 'न्घा लौ दार' (nghah lou dawr ). मिझोरमच्या जनतेचं आदरातिथ्य खूप भारी असतं. त्यांच्या भाषेत ते आहेत-  'त्लामंगहना' म्हणजेच दयाळू, आतिथ्यशील, निस्वार्थी आणि सर्वांना मदत करणारे. 

स्त्रोत

आपण म्हणतो या कलीयुगात काही खर्‍याची दुनिया राहिली नाहीय. आपल्या शनिशिंगणापुरात पण आता चोर्‍यामार्‍या होऊ लागल्या आहेत आणि काही दारांना कड्या-कुलूपं पण  लागली आहेत. अशा परिस्थितीत मिझोरमचं उदाहरण आशादायक आहे. आपल्या मराठी शेतकर्‍यालाही अशा जर द्राक्षांच्या, फळांच्या, भाज्यांच्या टपर्‍या लाऊन बिन्धास्तपणे आपल्या शेतात जाऊन काम करता आलं तर?

 

सबस्क्राईब करा

* indicates required