आईने केलेली ३० मिनीटांची मालिश ठरली त्याच्या मृत्यूचं कारण...

मालिश हा तसा आपल्या परिचयाचा विषय. घरोघरी दुखर्‍या वेदनांवर रामबाण उपाय म्हणून तेल लावून मालिश केली जाते. साधारण स्नायूंच्या दुखापतीपर्यंत हे सगळं ठीक आहे राव. पण बर्‍याच वेळा हाडाच्या फ्रॅक्चरसाठीही मालिशवरच काम भागवलं जातं. पण ही चुकीची मालिशच एका तरुणाच्या जिवावर बेतलीय.

दिल्लीच्या एका २३ वर्षीय तरूणाला बॅडमिंटन खेळताना डाव्या घोट्याला दुखापत झाली. उपचारासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. अचानक त्याच्या गुडघ्यात वेदना सुरू होऊन तो बेशुद्ध झाला. आणि त्यानंतर त्याचा मृत्यूही झाला. त्याच्या मृत्युचं कारण फ्रॅक्चर नसुन त्याच्या आईने केलेली ३० मिनीटांची मालिश होती. त्याच्या पायाच्या रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी तयार झाली होती, जी मालिश केल्यामुळे फुफ्फुसांना रक्तपुरवठा करणार्‍या मार्गात अडथळा बनली.

स्त्रोत

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार फ्रॅक्चरमध्ये रक्ताची गाठ होणं ही सामान्य बाब आहे. पण दुखापतग्रस्त भागावर दाब देणं हे अशाप्रकारे जीवघेणं ठरू शकतं. गेल्या वर्षी ३१ अॉक्टोबरला ही घटना घडली होती. मेडीको-लिगल जर्नलमध्ये एम्स (AIIMS) च्या डॉक्टरांकडून हा रिपोर्ट देण्यात आलाय. 

तर मंडळी, इथून पुढे दुखापत झाली तर मालिश सोडा आणि आधी दवाखाना गाठा.

सबस्क्राईब करा

* indicates required