बापरे, भारतात खरोखरीचं जंगलबुक...उत्तर प्रदेशात सापडली मोगलीची बहीण !!!
गेल्या वर्षी जंगल बुक सिनेमा येऊन गेला. त्यात मोगली नावाच्या एका लहान मुलाला जंगलात वन्यप्राण्यांबरोबर राहताना दाखवलं आहे. त्या वन्यप्राण्यांमध्ये राहून ते लहान मुलही प्राण्यांप्रमाणे वागू लागतं. अशीच काहीशी कथा टारझनची सुद्धा. आता हे झाले सिनेमे पण खऱ्या आयुष्यातही कोणी मोगली किंवा टारझन सारखं वागू लागलं तर ? आपण त्याला विचित्रच म्हणू पण अशीच एक घटना घडली खऱ्या आयष्यात आहे मंडळी.
उत्तर प्रदेशात कतर्नियाघाट अभयारण्यात मोतीपूर वनक्षेत्रात गस्तीवर असलेल्या पोलिसांना २ महिन्यांपूर्वी एक मुलगी सापडली होती.तिला पोलिसांनी पहिल्यांदा बघितलं तेव्हा ती एका माकडांच्या कळपात होती, तिच्या अंगावर कपडे नव्हते, माकडांच्या कळपात राहून ती माकडांसारखीच वागत होती. तिचा हा अवतार बघून पोलीस गोंधळात पडले. तिला धरण्यासाठी पोलीस जवळ गेले असता माकडे ओरडू लागली तशी ती मुलगीही आरडाओरडा करू लागली. शेवटी बऱ्याच प्रयत्नानंतर त्या मुलीला ताब्यात घेण्यात आलं. नंतर जिल्हा रुग्णालयात तिला दाखल केलं गेलं.
रुग्णालयात ती डॉक्टरांना बघून किंचाळायची कधी कधी तर हिंसकही व्हायची यामुळे नर्सिंग स्टाफलाही मोठ्या अडचणीला सामना करावा लागला. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता समजले कि तिला माणसांची भाषा समजत नाही.
![]()
दोन महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार केल्यानंतर तिचं वर्तन हळू हळू सुधरत आहे. ती आता माणसांसारखं दोन पायावर चालणे शिकली आहे, आता ती खाण्याच्या वस्तू फेकत नाही मात्र तिला अजूनही स्वताहून कपडे घालता येत नाहीत, जेवण ती प्राण्यांप्रमाणे थेट तोंडाने उचलून खाते, नैसर्गिक विधींचेही तिला अजून भान नाही.
तिच्या या वर्तनामुळे तिला दत्तक घ्यायला कोणीच तयार नाही एवढंच काय पण लहान मुलांसाठी काम करणाऱ्या 'चाइल्ड लाइन' या संस्थेनेही तिची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे.




