दोन वर्ष भीक मागून घेतला मुलीसाठी फ्रॉक...एका बापाची कहाणी !!!

आपल्याकडे मॉलमध्ये लावलेल्या निर्जीव पुतळ्यांना देखील भरजरी कपडे असतात.  पण काही चालत्या-बोलत्या हाडामांसाच्या लोकांकडे कपडे काय,  पण साधं दोन वेळचं अन्नही नसतं. अशी माणसं अनेकदा आपण रस्त्यावर, पुलाखाली, सिग्नलवर बघतो पण किती जणांकडे आपण लक्ष देतो ?

रस्त्यावरची ती प्रत्येक व्यक्ती जिला आपण सभ्य भाषेत भिकारी म्हणतो, तो आपल्यासोबत आपलं कुटुंब वाहत असतो. अशाच एका व्यक्तीची ही गोष्ट.

दहावर्षापूर्वी झालेल्या अपघातात ‘मोहम्मद कौसर हुसैन’चा एक हात गेला. हात नसल्याने त्याला कुठंही नोकरी मिळाली नाही. त्यामुळे त्याच्यावर भीक मागण्याची वेळ आली. या परिस्थितीत आपल्या मुलांच्या लहान-लहान गरजा पुरवण्यासाठी त्याला झगडावे लागते.  मात्र त्याच्या लहान मुलीची एक इच्छा त्याच्या मनात घर करून राहिली. त्या चिमुकलीला एक फ्रॉक हवा होता. या एका इच्छेसाठी मोहम्मदने दोन वर्ष भीक मागून जमवलेल्या पैशांनी फ्रॉक घेतला.  त्यावेळी त्याला आलेला अनुभव तो सांगतोय...

“काल पाच रुपयांच्या साठ नोटा दुकानदाराच्या हातात ठेवल्यावर तो माझ्या अंगावर खेकसला, “भिकारी आहेस का?”.  मी म्हणालो, “हो, मी भिकारी आहे. एका अपघातात माझा हात गमावल्या नंतर भीक मागणं हेच माझ्या उपजीविकेचं साधन आहे”.

दुकानदार ओरडल्यावर माझी मुलगी मला म्हणाली, “बाबा मला नको नवीन कपडे! आपण परत जाऊया.  पण गेली दोन वर्ष तिचा नवीन फ्रॉक घेण्याचा हट्ट मी पुरवू शकलो नव्हतो. तो दोन वर्षांपासून थोडे-थोडे पैसे जमा करून आज मी पूर्णं केला. आज मी माझ्या मुली सोबत थोडा वेळ घालवणार आहे. मला भीक मागायला आज  वेळ मिळणार नाही. माझ्या मुलीचा एकही फोटो माझ्याकडे नाहीये. म्हणून मी शेजाऱ्याकडून मोबाईल उसना आणलाय. आज मी तिचे खूप फोटो काढणार आहे, या दिवसाची आठवण म्हणून!. 

“गरिबीमुळं माझी मुलं धडपणे शाळेत पण जाऊ शकत नाही. काही वेळा फी पण भरता येत नाही, परीक्षेला बसता येत नाही. पण माझ्यासारख्या लोकांसाठी प्रत्येक दिवस परीक्षेचाच असतो. थोड्यावेळाने मी मुलीला सिग्नलवर उभं करून भीक मागायला सुरुवात करेन. ती मला कधीच एकटं सोडत नाही कारण माझ्या सारखा अपंग माणूस एखाद्या गाडीखाली चिरडला जाईल अशी तिला सतत भीती वाटते. रोज मी भिकारी असतो, पण आज राजा आहे आणि ती राजकन्या!”

 

फोटो आणि मोहम्मदचे मनोगत GMB Akash

सबस्क्राईब करा

* indicates required