computer

भाग - १ : इराणमध्ये क्रांती घडवणाऱ्या आणि राजाला देशाबाहेर पळवून लावणाऱ्या जगातल्या सर्वात मोठ्या पार्टीचा इतिहास!!

देशात क्रांती का होते, या प्रश्नाला अनेक उत्तरं देता येतील. त्यातलं एक उत्तर म्हणजे राज्यकर्ते आणि सामान्य जनता यांच्यात प्रचंड मोठी दरी असणे. जनतेवर राज्य करणारे राज्यकर्तेच जर जनतेच्या प्रश्नांना ऐकून घेत नसतील, जनतेवर अत्याचार करत असतील, मनमानी करत असतील तर जनतेच्या हातात उठाव करण्यावाचून दुसरा पर्याय उरत नाही. अशावेळी जर जनतेला योग्य नेतृत्व मिळालं तर क्रांती यशस्वी होण्याचे मार्ग सुलभ होतात.

इतिहासात जागोजागी अशा घटनांचे उल्लेख आढळतात. उदाहरणार्थ, फ्रेंच क्रांती, रशियन क्रांती, क्युबन क्रांती, चीनची क्रांती आणि इराणची क्रांती.

आजच्या लेखाचा विषय इराणच्या क्रांती संदर्भात आहे. आम्ही इराणच्या क्रांतीचा इतिहास सांगणार नाही आहोत, तर ही क्रांती घडण्यासाठी ज्या घटनेने हातभार लावला त्या घटनेविषयी माहिती देणार आहोत. ही घटना म्हणजे इराणचा हुकुमशहा ‘मोहम्मद रेझा शाह पेहलवी’ याने दिलेली डोळे दिपवणारी पार्टी. ही पार्टी एवढी महागडी होती की मोहम्मद रेझा शाह पेहलवीला आपलं सिंहासन गमावून किंमत चुकती करावी लागली. त्याच्या कमकुवत शासनाला शेवटचा धक्का बसला आणि इस्लामिक क्रांतीने इराणचा इतिहास बदलला.

चला तर सुरुवात करूया.

पार्श्वभूमी :

१९७१ साल. इराणमध्ये मोहम्मद रेझा शाह पेहलवी याची सत्ता होती. लेखापुरतं आपण त्याला शाह पेहलवी म्हणू. इराणच्या सत्तेवर बसलेली पेहलवी घराण्याची ही दुसरी पिढी होती. कजार राजवटीला ब्रिटीश आणि रशियन सत्तेच्या आक्रमणं आवरता आली नाहीत म्हणून शाह पेहलवीच्या वडिलांनी कजारची सत्ता उलथवून स्वतःची सत्ता स्थापन केली होती. 

शाह पेहलवीला इराणला एक महान देश बनवायचं होतं. त्याचं शिक्षण युरोपात झाल्याने त्याचा ओढा युरोपियन लाइफस्टाइलकडे जास्त होता. हीच लाइफस्टाइल इराणमध्ये यावी अशी त्याची इच्छा होती. त्याने सत्ता हातात घेतल्यानंतर यादृष्टीने अनेक बदल केले. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय सुधारणा आणल्या. लष्करात आणि उद्योगधंद्यांमध्ये आधुनिक बदल घडवून आणले. 

मेख अशी होती की तो इराणसारख्या आशियायी देशाला युरोपच्या साच्यात बसवू पाहत होता. हे सगळं वाचलं तर तुम्हाला वाटेल की हा हुकुमशहा फारच आधुनिक विचारांचा होता. तुम्ही बरोबर ओळखलंत. पण गंमत अशी की हुकुमशहा जरी आधुनिक विचारांचा असला तरी हुकुमशाही जुनीच होती. हुकुमशाही राजवटीत जनतेला ज्या प्रकारे वागवलं जातं त्याच प्रकारे इराणी जनतेला वागवलं जात होतं. आपली मतं मांडण्यास बंदी होती, आंदोलन केल्यास जीवे मारलं जायचं, जनता उपाशी असली तरी राजा गब्बर होऊन बसलेला. एवढंच नाही तर प्रशासनातील कोणत्याही व्यक्तीला शाह पेहलवी स्वतःच्या पुढे जाऊ देत नसे. मोहम्मद मोसादेग या पंतप्रधानाने घेतलेले काही निर्णय आणि त्याची लोकप्रियता बघून शाहने अमेरिका आणि इंग्लंडच्या मदतीने त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्याला तुरुंगात डांबलं. मोसादेगची शेवटची वर्षे घरातल्या कैदेत गेली. तिथेच त्याचा मृत्यू झाला.

(मोहम्मद मोसादेग)

१९७० च्या दशकात इराणियन जनता अगदी सामान्य प्रश्नांसाठी झगडत होती. चांगलं राहणीमान, नोकरी, स्वच्छ पाणी इत्यादी. या मागण्याही शाह पेहलवी पूर्ण करू शकला नव्हता. अशातच त्याला कुठून तरी कल्पना सुचली की इराणला जगात नाव मिळवून द्यायला हवं, त्याची गेलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवून द्यायला हवी. यासाठी त्याने काय केलं? तर जगातील सर्वात महागडी पार्टी दिली. जगातल्या सर्व देशातील नामवंत लोकांना या पार्टीचं आमंत्रण होतं. सुरुवातीला कोणालाच यावर विश्वास बसला नाही.० पण जे घडलं त्याला पूर्ण जग साक्षीदार होणार होतं. 

या पार्टीसाठी कारणही अव्वल दर्जाचं शोधण्यात आलं. जगातलं पहिलं पर्शियन साम्राज्य स्थापन होऊन १९७१ साली २५०० वर्षे पूर्ण होणार होती. हाच मुहूर्त साधून पार्टी देण्याचं ठरलं. 

उत्सवाची पूर्वतयारी

पार्टी केवळ ३ दिवस चालणार होती. तयारी मात्र एक वर्ष आधीच सुरु झाली होती. त्याकाळी इराणमध्ये एवढा मोठा सोहळा आयोजित करण्यासाठी साजेसं ठिकाण उपलब्ध नव्हतं. फाईव्ह स्टार हॉटेल तर सोडाच, पण धड हॉटेलही नव्हतं. मग येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार कुठे करायचा? त्यांची व्यवस्था कुठे करायची? कोणीतरी सुचवलं की पर्शियन साम्राज्याची स्थापना जिथून झाली त्याच वाळवंटात का करू नये उत्सव? म्हणून पर्शियन साम्राज्याची ओळख असलेल्या पुरातन पर्सेपोलीस शहराची निवड करण्यात आली. शहर फक्त उल्लेखासाठी. आता तिथे फक्त ढासळलेले अवशेष उरले होते.  शेजारी वाळवंटातच उत्सवाचं आयोजन करण्यात आलं. 

(पर्सेपोलीस)

या संपूर्ण घटनेलाच एक प्रकारचं बनावटी रूप होतं. याची प्रचिती तुम्हाला पुढे येईलच. सुरुवात झाली ती उत्सवासाठी निवडलेल्या जागेपासून. पर्सेपोलीसचं वाळवंट हे उजाड होतं, तिथे ना झाडं होती, ना उत्सव करण्यालायक वातावरण. साप विंचूसारखे प्राणी मात्र भरमसाठ होते. शाह पेहलवीने तिथला नूरच बदलला. पाहुण्यांच्या जीवावर उठतील असा एकही प्राणी नको म्हणून विषाची फवारणी करण्यात आली. मेलेल्या प्राण्यांना तिथून साफ करण्यात आलं. काही दुर्मिळ प्राणी परीक्षणासाठी शास्त्रज्ञांकडे पाठवण्यात आले. जमीन साफ झाल्यावर एकूण ५० तंबू उभारण्यात आले. हे काम फ्रान्सच्या मेसन आणि जेन्सन या इंटिरियर डिझायनर कंपनीला देण्यात आलं होतं. या कंपनीने १६० एकर जमिनीवर तंबू उभारले. तंबूसाठी रेशीम वापरलं. किती लांब? तर तब्बल ३७ किलोमीटर लांब. जगातल्या ५ खंडांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ५ रांगा आखण्यात आल्या. मधोमध कारंजेही होते. हा फोटो पाहा.

या तंबूंच्या आत ५ लोकांना राहता येईल याची पूर्ण व्यवस्था होती. प्रत्येक तंबूत २ बेडरूम्स, २ बाथरूम, १ किचन आणि दिमतीला नोकरांची एक फौज ठेवण्यात आली होती. येणाऱ्या पाहुण्यांना आपल्या देशात संपर्क करता यावा म्हणून प्रत्येक तंबूत टेलिफोन कनेक्शन होतं. हे सगळं उभारण्यासाठी वर्षभर अनेक कारागिरांनी कष्ट घेतले होते.

तंबू उभारले गेले, पण नगराचं रूप येण्यासाठी झाडेझुडपे हवीत. शाहने परदेशातून १५,००० झाडे मागवून घेतली. उत्सवाचं ठिकाण सुगंधित करण्यासाठी तेवढ्याच मोठ्या प्रमाणात फुलझाडे मागवण्यात आली. एक छोटं जंगलच उभारण्यात आलं. या झाडांना वाढवण्यासाठी लागेल तेवढ्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला. यावेळी इराणी जनता पाण्यासाठी तडफडत होती हा मुद्दा इथे लक्षात घेण्यासारखा आहे.

झाडेझुडपे आली. मग त्यावर बसण्यासाठी पक्षी नकोत का? शाहने त्याचीही व्यवस्था केली होती. युरोपमधून तब्बल ५०,००० गाणारे पक्षी आणण्यात आले. याखेरीज स्पेनमधून २०,००० चिमण्या आणण्यात आल्या. हे पक्षी उत्सवाच्या ठिकाणी सोडण्यात आले. पाण्याच्या कमतरतेमुळे आणि इराणच्या हवामानामुळे हे पक्षी दुसऱ्याच दिवशी मरण पावले. 

मेजवानी:

(मेन्यूकार्ड)

पर्शियन साम्राज्याला २५०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या उत्सवाची योजना आखण्यात आली होती, पण उत्सवात पर्शियन म्हणावं असं काहीही नव्हतं. झाडेझुडपे, तंबू, पक्षी, या जोडीला अन्नही युरोपातूनच मागवण्यात आलं होतं. जेवणाचं संपूर्ण काम फ्रांसच्या मॅक्सिम्स रेस्टॉरंटला देण्यात आलं होतं. इराणच्या पार्टीसाठी मॅक्सिम्सने फ्रान्समधलं रेस्टॉरंट २ आठवड्यांसाठी बंद ठेवलं. रेस्टॉरंटमधल्या कर्मचाऱ्यांपासून ते हॉटेलच्या साहित्यापर्यंत सगळं इराणला नेण्यात आलं. पार्टीचा मेन्यू अत्यंत गुप्त ठेवण्यात आला होता, पण तो लीक झालाच. मेन्यू बघून अनेकांचे डोळे पांढरे झाले होते. जास्त खोलात जाऊन माहिती नाही देत, पण एक अंदाजा यावा म्हणून त्या तीन दिवसांसाठी किती प्रमाणात अन्न मागवलेलं याचे आकडे देत आहोत.

एकूण १८ टन अन्न फ्रान्सवरून इराणला नेण्यात आलं होतं. यात लाखो अंडी होती, २७०० किलो एवढं बीफ, ३० किलो माशांची खारवलेली अंडी, १२ टन एवढी वेगवेगळी पेये होती, बर्फाची कमतरता पडू नये म्हणून चक्क विमानाने एका खोलीच्या आकाराचे बर्फाचे तुकडे पार्टीच्या ठिकाणी आणण्यात आले होते. पार्टीसाठी नोकरचाकरांना खास कपडे शिवण्यात आले. हे कामही कोणत्या ऐऱ्यागैऱ्याला देण्यात आलं नव्हतं. फ्रान्सची त्यावेळची प्रसिद्ध वेशभूषाकार लॅवीनने जातीने हे गणवेष डिझाईन केले होते. 

ही वर्णनं वाचून तुम्हाला आम्ही अतिशयोक्ती करतोय असं वाटेल, पण ही सगळी माहिती खरी आहे. 

पार्टी एवढ्यापुरतीच मर्यादित नव्हती. अजून गोष्टीत पाहुण्यांची यादी आहे, त्यांची सुरक्षा आहे, सोहळ्याच्या तीन दिवसांचा लेखाजोखा आहे आणि शेवटी क्रांती सुद्धा आहे. ही सगळी माहिती वाचूया दुसऱ्या भागात. पहिला भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा.

 

भाग - २ : इराणमध्ये क्रांती घडवणाऱ्या आणि राजाला देशाबाहेर पळवून लावणाऱ्या जगातल्या सर्वात मोठ्या पार्टीचा इतिहास!!

सबस्क्राईब करा

* indicates required