computer

भाग - २ : इराणमध्ये क्रांती घडवणाऱ्या आणि राजाला देशाबाहेर पळवून लावणाऱ्या जगातल्या सर्वात मोठ्या पार्टीचा इतिहास!!

भाग - १ : इराणमध्ये क्रांती घडवणाऱ्या आणि राजाला देशाबाहेर पळवून लावणाऱ्या जगातल्या सर्वात मोठ्या पार्टीचा इतिहास!!

एका तंबूत अमेरिकेचे उपराष्ट्रपती निवांत बसून पाईप ओढतायत आणि पुढच्याच तंबूत जपानचे राजे बसलेत. एका तंबूत इंग्लंडचे राजकुमार आहेत तर दुसऱ्या तंबूत भारताचे राष्ट्रपती. हे सगळे लोक तीन दिवसांसाठी एका छताखाली आले आहेत. मौजमजा चालली आहे, रोज शेकडो वेगवेगळ्या पदार्थांवर ताव मारले जात आहेत. दारू पाण्यासारखी वाहात आहे. वाळवंटात हिरवंगार नगर उभं राहिलं आहे. सामान्य माणसांचे डोळे दिपवणारा हा सोहळा आहे. 

हे सगळं ज्या देशात चाललं होतं त्या देशातली जनता काय करत होती? त्यांना तर या रम्य नगरात प्रवेशच नव्हता. ते लोक आंदोलन करत होते. तरुणांना तुरुंगात डांबण्यात आलं होतं. संशय आला की राजाचे गुप्त सैनिक कोणतीही विचारपूस न करता तुरुंगात डांबायचे. असं सगळं सिनेमातल्या कथेसारखं चाललं होतं.

ही गोष्ट आहे १९७० च्या काळातल्या इराणची. इराणी जनतेत असंतोष टोकाला गेला असतानाच इराणचा हुकुमशहा शाह पेहलवीने पर्शियन साम्राज्याला २,५०० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोठी पार्टी दिली होती. पहिल्या भागात आपण पार्टीची पूर्वतयारी, टेंट सिटीची उभारणी आणि पार्टीच्या खास मेन्यूबद्दल वाचलं. या भागात आपण पार्टीची सुरक्षा व्यवस्था, पार्टीला आलेले जगभरातले पाहुणे आणि पार्टीदरम्यान काय काय घडलं याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.

संरक्षण यंत्रणा:

शाह पेहलवी पार्टीची तयारी करत होता तेव्हा इराणी जनता आंदोलनं करत होती. ही आंदोलनं अत्यंत हिंसक होती. शाहवर जगभरातूनही टिका होत होती. या कारणाने सुरक्षा हा मोठा प्रश्न होता. विशेषतः अन्नात विष कालवलं जाण्याची शक्यता होती. म्हणून मेजवानीसाठी उभारलेल्या हॉलला सर्वात जास्त संरक्षण देण्यात आलं. निवडक लोकांनाच हॉलमध्ये प्रवेश देण्यात आला होता.

शाहची गुप्त पोलीस यंत्रणा ‘SAVAK’वर मोठी जबाबदारी होती. SAVAKने संशय असेल त्याला पकडलं. घरांवर छापे मारले. विद्यार्थ्यांना अटक केली. ही संख्या हजारांच्या घरात होती. हे सगळं महिनाभर अगोदरच सुरु झालं होतं. रस्त्यावर ठिकठिकाणी नाके बसवण्यात आले होते. याही पुढे जाऊन शाहने त्या दिवसांमध्ये इराणच्या सीमाच बंद केल्या. फक्त पाहुणेच तेवढे देशाबाहेर ये-जा करू शकत होते.

पाहुणे :

एकाच छताखाली जगभरातील सर्व देशातील राजे, पंतप्रधान, राष्ट्रपती, राजपुत्र, राजपुत्री, गव्हर्नर, अशी अत्यंत महत्त्वाची मंडळी एकत्र जमल्याचं दुसरं उदाहरण इतिहासात सापडत नाही. खुद्द इंग्लंडची राणी एलिझाबेथ पार्टीला यायला तयार झाली होती, पण एका साम्राज्याच्या राणीने दुसऱ्या साम्राज्याला अभिवादन देण्याची कल्पना दरबारातील मंडळींना रुचली नाही. २००१ साली प्रसिद्ध झालेल्या कागदपत्रांत नमूद केल्याप्रमाणे इंग्लंडच्या परराष्ट्र खात्याने या सोहळ्याला अप्रशस्त आणि असुरक्षित म्हटलं होतं. त्यामुळे राणी येऊ शकली नाही, पण तिचा मुलगा चार्ल्स सोहळ्याला हजर होता. अमेरिकेचे त्यावेळचे राष्ट्रपती रिचर्ड निक्सन सुरक्षेच्या कारणास्तव येऊ शकले नाहीत. त्यांच्याऐवजी उपराष्ट्रपती उपस्थित होते.

या दोन अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तींनी पार्टीला जायचं टाळलं असलं तरी त्याची भरपाई नक्कीच केली होती. इंग्लंडच्या राणीने शाह आणि त्याच्या पत्नीला इंग्लंडमध्ये बोलावून पाहुणचार केला होता. निक्सन यांनी १९७२ इराणला भेट देऊन अनेक सवलती देऊ केल्या होत्या.

तर, या दोन व्यक्ती सोडल्या तरी पार्टीला प्रत्यक्ष आलेली मंडळी काही कमी महत्त्वाची नव्हती. डेन्मार्क, बेल्जियम, जोर्डन, नेपाळ या देशांचे राजे स्वतः हजर होते. जपान, इटली, मोरोक्को या देशाचे राजपुत्र आणि राजपुत्री सोहळ्याला उपस्थित होते. तुर्कस्तान, ब्राझील, इंडोनेशिया, इत्यादी देशांचे राष्ट्रपती उपस्थित होते. भारताकडूनही त्यावेळचे राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी सोहळ्याला स्वतः हजर होते. यातील काही पाहुण्यांच्या स्वागतासाठी तर शाह स्वतः विमानतळावर हजर होता.

जाहिरात: 

जाहिरातीवर प्रचंड पैसा खर्च करण्यात आला होता. शाह पेहलवीने वर्षभरापूर्वीच जाहिरात सुरु केली होती. सोहळ्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रत्येक देशातील इराणी वकिलातीला छोट्या मोठ्या पार्टीचं आयोजन करण्याचे आदेश देण्यात आले होते. 

सोहळ्याच्या दिवशी हा संपूर्ण कार्यक्रम लाइव्ह दाखवण्याची व्यवस्थाही केली होती. सोहळ्यावर आधारित चित्रपटासाठी अमेरिकन फिल्ममेकर्सना आमंत्रण देण्यात आलं होतं. चित्रपटाचं नाव होतं ‘Flames of Persia’. हा चित्रपट जगभर दाखवण्यात यावा अशी शाह पेहलवीची इच्छा होती. इराणवर आधारित पुस्तकंही छापण्यात आली होती. त्याचे इतर भाषांमध्ये अनुवाद करण्यात आले. याखेरीज वर्षभर पार्टीबद्दल नवीन माहिती येत होती, गॉसिप मासिकांत चर्चा रंगत होत्या. पार्टीचा मेन्यू लिक झाल्यावर तर अनेक दिवस चर्चा होत राहिली. एकूण हवा निर्माण झाली होती. 

मुख्य सोहळा:

पार्टीचं मुख्य ठिकाण असलेल्या पर्सेपोलीस ते जवळचं शहर शिराजपर्यंत एक नवीन डांबरी रस्ता तयार करण्यात आला होता. सोहळ्याला सुरुवात झाल्यानंतर या रस्त्यावर रोषणाई करण्यात आली. पाहुण्यांना शिराज विमानतळावरून पर्सेपोलीसपर्यंत आणण्यासाठी तब्बल २५० ‘मर्सिडीज-बेंझ 600 लिमोझिन’ गाड्या वापरण्यात आल्या. शिराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचं रूपही पलटण्यात आलं. संपूर्ण सोहळ्यादरम्यान इराणचं वायुदल शाहच्या अखंड सेवेत होतं.

सोहळ्यादरम्यान जगभरचा मिडीया आणि इतर शेकडो लोक तिथे हजर होते. त्यांच्या व्यवस्थेसाठी शिराज येथे कोरुश आणि देरुश नावाची दोन नवे हॉटेल्स बांधण्यात आले. प्रत्येक हॉटेलमध्ये एकूण १५० खोल्या होत्या. 

१२ ऑक्टोबर १९७१. हा उत्सवाचा पहिला दिवस होता. शाह आणि शाहबानू (शाहची पत्नी) यांनी पर्शियन साम्राज्याची स्थापना करणाऱ्या ‘सायरस’ राजाला मानवंदना दिली. पुढचे दोन दिवस पाहुण्यांचं आगमन होत राहिलं. वर सांगितल्याप्रमाणे शाह आणि शाहबानू दोघेही पाहुण्यांच्या स्वागताला स्वतः हजर होते. 

शाहच्या राजवटीत मंत्री असलेले अन्सारी यांनी दिलेल्या माहितीनुसार पाहुण्यांनी उत्सवाच्या प्रोटोकॉल प्रमुखांच्या नाकी नऊ आणले होते. पाहुण्यांच्या मागण्या विचित्र असायच्या. बसण्याच्या जागेवरूनही मतभेद झाले. नियमाप्रमाणे ठरवून दिलेल्या जागी पाहुण्यांना बसायचं नव्हतं. अशा परिस्थितीला अत्यंत काळजीपूर्वक हाताळावं लागलं. पण सगळ्यात जास्त डोके दुखी वाढवली ती पाहुण्यांनी सोबत आणलेल्या लवाजम्याने. पाहुण्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता आपल्या सोबत बिनमहत्त्वाच्या गर्दीला आणलं होतं. जागा अपुरी पडेल म्हणून उत्सवाच्या व्यवस्थापनाला घाम फुटला होता. शेवटी असं ठरलं की जर अटीतटीची परिस्थिती आलीच तर इराणच्या प्रमुख पाहुण्यांना स्वतःची जागा रिकामी करावी लागेल. 

१४ तारखेला उत्सवाचा खरा महत्त्वाचा दिवस होता. त्यावेळी उपस्थित असलेल्या जवळजवळ ६०० पाहुण्यांनी ५ तास ३० मिनिटे मेजवानी झोडली होती. या मेजवानीची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यात आली आहे. सर्वात लांब आणि सर्वात महागडी पार्टी असं या पार्टीचं वर्णन केलं जातं. जेवणासाठी वापरलेली भांडी देखील सोन्याने मढवलेली होती. मेजवानीत संपूर्ण भाजलेले मोर ठेवण्यात आले होता. नंतर समजलं की हे मोर फक्त सजावट म्हणून वापरण्यात आले होते. एकेकाळी मोर हे पर्शियन राज्याचं प्रतिक होतं. 

पाहुण्यांसाठी सर्पाकृती टेबल तयार करण्यात आला होता. या टेबलावर अंथरलेलं कापड एकसंध होतं. त्याची लांबी चक्क २२९ फूट होती. १२५ स्त्रियांनी मिळून ६ महिन्यांत या कापडावर भरतकाम केलं होतं. 

मुख्य सोहळ्याच्या दरम्यान पाहुण्यांना कंटाळा येऊ नये म्हणून एक सोशल क्लब तयार करण्यात आला होता. या सोशल क्लबमध्ये काय काय होतं ते क्रमाने जाणून घेऊ.

१. बार
२. रेस्टॉरंट
३. रिसेप्शन एरिया
४. कसिनो
५. केशभूषेसाठी १६ सलून.
४. मेकअप रूम
५. फक्त पुरुषांसाठी एक सलून

केशभूषा आणि मेकअपसाठी पॅरीसवरून खास तज्ञ बोलावण्यात आले होते. कोणताही पाहुणा ताटकळत उभा राहू नये म्हणून तज्ञांना लवकर लवकर हात चालवण्यासाठी खास ट्रेनिंग देण्यात आली होती. महिलांच्या महागड्या दागदागिन्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी खास बंकर (तळघर) तयार करण्यात आलं होतं. शेवटच्या क्षणी काहीही पडू नये म्हणून बारीकसारीक गोष्टींची पूर्ण तयारी होती. 

सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी शाहयाद टॉवरचं उद्घाटन करण्यात आलं. सोहळ्याची आठवण आणि प्रतिक म्हणून या टॉवरची स्थापना करण्यात आली होती. पुढे जाऊन याच ठिकाणी क्रांतीने वेडी झालेली जनता एकवटून हुकुमशाहीला नष्ट करेल हे त्यावेळी शाहच्या स्वप्नातही आलं नसेल. क्रांतीनंतर शाहयाद टॉवरचं नाव बदलून आझादी टॉवर ठेवण्यात आलं. आजही ही इमारत इराणमध्ये उभी आहे.

सोहळा यशस्वी झाला होता आणि शाह पेहलवी संपूर्ण कार्यक्रमाने एकंदरीत आनंदी होता. पुढे काही वर्षात इराणच्या तेलाच्या भावात वाढ झाली. पण एकूणच गोष्टी शाहने ठरवल्याप्रमाणे घडल्या नाहीत. सोहळा होऊन दशकभरातच त्याच्या हातून राज्य गेलं होतं. इराण राजेशाहीतून धर्माधारित सत्तेच्या हाती गेला. 

सोहळ्यानंतर इराण क्रांतीकडे कसा वळला आणि क्रांती कशी घडली याबद्दल आपण पुढच्या भागात वाचूया. दुसरा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा!!

सबस्क्राईब करा

* indicates required