व्हिडीओ ऑफ दि डे: आफ्रिकेतल्या देशात सोन्याचा डोंगर सापडल्यानंतर लोकांनी काय केलं पाहा !!

तुमच्या आसपास एखादा सोन्याचा डोंगर असल्याची बातमी तुम्हाला लागली तर काय कराल? एक तर अशी बातमी कुणी दिलीच तर काही लोकांचा त्यावर पटकन विश्वासही बसणार नाही. कारण, आपण कधी सोन्याचा डोंगर कुठे पाहिलेलाच नाही. पण आफ्रिकेतील रिपब्लिक ऑफ कांगो मधील बुकावू परिसरातील लुहिनी गावाच्या आसपास असा सोन्याचा डोंगर सापडलेला आहे. या डोंगरावरील मातीत ६०-९०% सोने आहे. हे म्हणजे अलिबाबाच्या गुहेची काल्पनिक कथा सत्यात उतरवल्यासारखेच झाले.
गेल्या आठवड्यात जेव्हा ही बातमी या परिसरातील आणि आजूबाजूच्या गावातील लोकांना कळली तेव्हा कुदळ, फावडे, खोरे, पाटी, पोती, पिशव्या घेऊन हे लोकं या डोंगराकडे धावत होते. कुणीही डोंगर खणून त्यातील माती जवळ असलेल्या पिशवीत, पाटीत भरत होते. काहीजण तर शर्टमध्ये आणि ओढणीतही बांधून घेत होते. डोंगरावरील माती घरी नेऊन त्यातील सोने स्वच्छ करून घेत होते. हळूहळू बातमी पसरत जाईल तशी दूरदूरच्या गावातून लोकं या लुहिनी गावातील डोंगरावर येऊ लागले.
गावात अचानक गर्दी वाढू लागली. शेकड्यांनी बाहेरून आलेल्या लोकांचा ताण या परीसरावर दिसू लागला. लोकांनी याठिकाणी कशी झुंबड उडवली आहे, हे दाखवणारा व्हिडीओ अहमद अल्गोबरी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या डोंगरावरील माती नेऊन ती धुतल्यानंतर त्यातून सोने कसे मिळते हे देखील त्या व्हिडीओ मध्ये दाखवण्यात आले आहे. काही जण जमीन खोदण्यासाठी हत्यारांचा वापर करत आहेत तर काही जण अधाशाप्रमाणे हातानेच जमीन उकरत आहेत. मिळेल त्या साधनातून ही माती घरी घेऊन जाण्याचा अट्टाहास बघून इथले प्रशासन देखील चिंतेत पडले आहे.
लोकांच्या वाढत्या गर्दीमुळे काही तरी अघटीत होईल की काय अशी भीती प्रशासनालाही वाटू लागली. कारण, सोन्याच्या आमिषाने लोकांना पूर्ण आंधळे बनवले आहे. त्यामुळे आता नागरिकांना या डोंगरावर जाण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे.
कांगोचे मंत्री वेनंट बुरुमे यांनी सांगितले की, ‘या छोट्याशा गावात जर अचानक बाहेरून येणाऱ्याची संख्या वाढली तर काहीही अघटीत होऊ शकते. याची कल्पना आल्याने त्या डोंगरावर खोदकाम करण्यासंबंधी आम्ही बंदीचे आदेश दिले आहेत.'
A video from the Republic of the Congo documents the biggest surprise for some villagers in this country, as an entire mountain filled with gold was discovered!
— Ahmad Algohbary (@AhmadAlgohbary) March 2, 2021
They dig the soil inside the gold deposits and take them to their homes in order to wash the dirt& extract the gold. pic.twitter.com/i4UMq94cEh
ज्यांना इथे खाणकाम सुरु करायचे असेल अशा अधिकृत खाणकामाचा परवाना असलेल्यांनी आपला परवाना दाखवून मगच तिथे खोदकाम सुरु करायचे आहे, असेही ते म्हणाले. ज्यांच्या खाणकामाचे परवाने रद्द झालेले असतील त्यांच्या परवान्यांचेही नुतनीकरण करून देण्याची सोय केलेली आहे.
या सगळ्या कामासाठी अधिकाऱ्यांची फौजच या ठिकाणी तैनात आहे. शिवाय, लोकांच्या वाढत्या संख्येमुळे काहीही अघटीत घडू नये म्हणून सेना आणि पोलीस दल दोघांनाही इथे पाचारण करण्यात आले आहे.
खरे तर या परिसरात अशा प्रकारे सोन्याची खाण सापडणे हे काही फार मोठी आश्चर्याची गोष्ट नाही. सोन्याचीच नाही तर इतरही अनेक प्रकारच्या खनिजांच्या खाणी या ठिकाणी सापडत असतात. अशा खाणींवर काम करणे हेच इथल्या लोकांच्या रोजगाराचे साधन आहे. पण, गेल्याच आठवड्यात सापडलेल्या या खाणीमुळे लोकांच्यात जास्तच आकर्षण आणि लोभ निर्माण झाला. या परिसरात अशा खाणींची संख्या खूप आहे. तरीही या देशात गरिबी आहे. कारण, या खाणीतील सोने किंवा इतर खनिजे ही सरकारी कर चुकवून नेली जातात. आफ्रिकेच्या पूर्वेकडील देशाचा यामध्ये खूप मोठा हस्तक्षेप आहे. या देशातील अनेक लोकं आफ्रिकेत मिळणाऱ्या अशा खनिजांचा चोरटा व्यापार करतात. त्यामुळे इथल्या सरकारकडे याचा कर जमा होत नाही. इथे सोन्याच्या खाणी सापडत असल्या तरी इथे सोन्याच्या दागिन्यांची निर्मिती करण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. यामुळे इथे महागाई सारख्या समस्यांची खूपच तीव्रता जाणवते. चोरट्या मार्गाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हे सोने आधीच पोहोचलेले असते. त्यामुळे सरकारला याचा जास्त नफा कमावता येत नाही.
The moment of washing the dirt and extracting the gold. #Congo pic.twitter.com/7L1V1Clm30
— Ahmad Algohbary (@AhmadAlgohbary) March 2, 2021
हेच कारण आहे ज्यामुळे आफ्रिकेत सोन्याच्या खाणी सापडत असूनही तिथले दारिद्र्य आणि गरिबी आणखीन वाढत आहे. त्यामुळे सोन्याच्या तस्करीवर रोख लावण्यासाठी सरकारने आता काही गंभीर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. सोन्याचा हाच व्यापार जर कायदेशीर मार्गाने झाला तर निश्चितच कांगो मधील जनतेची परिस्थिती बदलण्यास हातभार लागेल.
अशा चोरट्या व्यापारावर बंदी घालण्याचे, कडक निर्बंध लादण्याचे प्रयत्न सुरु आहेत मात्र कांगो सरकारला त्यात अजूनही पुरेसे यश मिळालेले नाही. सध्या तरी सरकारने लुहिनीमधीलच नाही तर इतर खाणींच्या खोदकामावरही बंदी घातली आहे. यादरम्यान खाणमालकांना त्यांची ओळख पटवून देता येईल आणि कायदेशीररीत्या योग्य पद्धतीने खाणकाम सुरु होईल. या खाण मालकांनी खाण नियामक मंडळाकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे, तरच त्यांना परवानगी देण्यात येईल, अशी मंत्री वेनंट बुरुमे यांनी दिली.
याठिकाणी कायदेशीर रित्या खाणकाम होणे अत्यावश्यक आहे. यामुळे इथल्या लोकांच्या जीविताला असलेला धोका तर टळेलच शिवाय इथल्या खाणकामातून सरकारलाही फायदा होईल.
ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये अशी आपल्याकडे एक म्हण आहे. तसेच या पार्श्वभूमीवर व्हायरल झालेला व्हिडीओ जर तुम्ही पहिला तर सोन्याचा डोंगर सापडला म्हणून तो कसाही खणू नये, असे उद्गार नक्कीच तुमच्याही तोंडून बाहेर पडतील.
लेखिका: मेघश्री श्रेष्ठी