computer

जगातल्या श्रीमंतांच्या यादीत जाण्यासाठी तुमच्याकडे तब्बल एवढी संपत्ती असायला हवी....

श्रीमंत होण्याची इच्छा कुणाला नसते? पण, जगात खूप थोड्याच व्यक्ती श्रीमंत होतात आणि खूप लोकं आहेत तिथेच राहतात. यामागे खूप कारणे असली तरी, श्रीमंती सर्वांनाच आकर्षित करत असते. मोनॅको सारख्या छोटाश्या देशात जगातील सर्वात जास्त श्रीमंत व्यक्ती आढळतात. येथील अतिश्रीमंत व्यक्तींच्या यादीत जर यायचे असेल तर किमान ८० लाख डॉलर एवढी संपत्ती तर हवीच. पण वेगवेगळ्या देशातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सामील होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संपत्तीचे प्रमाणही वेगवेगळे आहे. यामागे काय कारणे आहेत जाणून घेऊया या लेखात.

मोनॅको सारख्या छोट्याशा देशात लक्षाधीश लोकांची संख्या जास्त आहे. इथे प्रत्येक तीन व्यक्ती मागे एक व्यक्ती लक्षाधीश आहे. इथल्या श्रीमंतीचे प्रमुख कारण म्हणजे इथले कर खूप कमी आहेत. व्यवसाय कर असो की वैयक्तिक प्राप्तीकर दोन्ही करांचा दर खूपच कमी आहे, म्हणून इथे श्रीमंत व्यक्तींची संख्या जास्त आहे. इथल्या याच वैशिष्ट्यामुळे जगभरातील अनेक श्रीमंत व्यक्ती या देशात स्थलांतरित होण्याचा प्रयत्न करतात. कारण, त्यांच्या संपत्तीवर पूर्णतः त्यांचाच अधिकार राहतो. हा छोटासा देश मुळात श्रीमंत व्यक्तींचा देश तर आहेच पण इतर देशांतील श्रीमंत व्यक्तींनाही हा देश खुणावत असतो.

मोनॅकोमधील अतिश्रीमंत व्यक्तींच्या यादीत जर तुमचे नाव हवे असे तुम्हाला वाटत असेल तर इथे किमान ८० लाख डॉलर्स एवढी संपत्ती तर हवीच. नाईट फ्रँक या संस्थेने इथे केलेल्या सर्वेक्षणात त्यांनी हे नमूद केले आहे की, इथले नागरिक क्वचितच कर भरणा करतात. सरकारनेच त्यांचे अनेक कर माफ केलेले आहेत.

त्यानंतर नंबर लागतो तो स्वित्झर्लंड आणि अमेरिकेचा. इथे अनुक्रमे ५१ लाख डॉलर आणि ४४ लाख डॉलर इतकी संपत्ती तुम्हाला श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवून देईल. तर सिंगापूरमध्ये २९ लाख डॉलर पुरेसे आहेत.

या सगळ्या देशांच्या श्रीमंती रेषेची मर्यादा पाहिल्यास एक गोष्ट लक्षात येते की, करप्रणालीचा या रेषेवर जास्त परिणाम जाणवतो. नाईट फ्रँकच्या अहवालातही त्यांना हेच आढळून आले. ज्या देशातील कर कमी तिथल्या श्रीमंत व्यक्तींचे प्रमाण आणि त्यांची संपत्ती जास्त. अमेरिकेतील बाजारभावाचा परिणामही यावर जाणवतो.

नाईट फ्रँकने केलेल्या या सर्वेक्षणामध्ये त्यांना आणखी एक गोष्ट प्रकर्षाने आढळली, ती म्हणजे जागतिक महामारीच्या या काळात जगातील श्रीमंत आणि गरीब लोकांमधील दरी आणखी रुंदावली आहे.

नाईट फ्रँक या संस्थेने एकूण तीस देशांचे सर्वेक्षण केले. यामध्ये त्यांना केनियातील श्रीमंती रेषा फारच खाली असल्याचे आढळले. मोनॅकोतील श्रीमंत रेषा ही केनियातील श्रीमंत रेषेपेक्षा ४०० पटीने मोठी आहे. जागतिक बँकेच्या अंदाजानुसार केनियातील २० लाख लोक हे दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत आहेत. अलीकडे कोव्हीड-१९मुळे तर यात अजूनच जास्त भर पडली आहे.

ब्लूमबर्ग बिलीयनर्स इंडेक्सनुसार, जगातील ५०० अतिश्रीमंत व्यक्तीच्या संपत्तीत याचवेळी (जागतिक महामारीच्या काळात) १.८ ट्रिलियन डॉलर्सची भर पडली आहे. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींचा शोध घेतल्यास यातील बहुतांश व्यक्ती या अमेरिकेत आढळतील. चीन आणि हॉंगकॉंग या आशिया खंडातील देशातही संपत्तीचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात आढळल्याचे दिसते. या आशिया-पॅसिफिक प्रदेशातील श्रीमंत व्यक्तींची संपत्ती ही जवळपास २.७ ट्रिलियनच्या घरात आहे.

ब्लूमबर्गच्या सर्व्हेक्षणानुसार त्यांच्याच २०१६ मधील आकडेवारीपेक्षा ही आकडेवारी तिपटीने जास्त आहे. येत्या काळात या प्रदेशातील संपत्तीत आणि श्रीमंत व्यक्तींच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. २०२०-२०२५ या काळात इतर देश किंवा प्रदेशांशी तुलना करता ही वाढ अतिशय वेगाने झालेली आढळून येईल असेही ब्लूमबर्गचे मत आहे.

नाईट फ्रँकच्या अहालानुसार, एशिया-पॅसिफिक प्रदेशातील संपत्तीत तर वाढ होईलच, पण येत्या काळात हा प्रदेश संपत्तीचे केंद्रस्थान म्हणून उदयास येईल आणि या प्रदेशाची ताकद वाढताना दिसून येईल.

श्रीमंत अति श्रीमंत होत आहेत आणि गरीब अति गरीब, जागतिक महामारीमुळे ही दरी आणखी गडद झाली. पण या आर्थिक सर्वेक्षणावरून एक बाब तर स्पष्ट आहे की, देशातील नागरिकांच्या संपत्तीत वाढ होईल की घट हे पूर्णतः त्या देशाची करप्रणाली कशी आहे यावरच अवलंबून आहे.

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required