computer

गुंतवणूक स्पेशल - असे टाका शेअर बाजारात पहिलं पाऊल!

आयुष्यात अडीअडचणी आल्या तर चार पैशांची  बचत हाताशी असावी असं सगळ्यांनाच वाटतं. पण ही बचत कशी करायची?  केलेली बचत कशी सुरक्षित ठेवायची ? बचतीच्या रुपाने जमा केलेली पुंजी वाढवायची कशी ? 

हे प्रश्न सगळ्यांनच छळत असतात. यांपैकी बचत कशी करायची हा प्रश्न बराचसा वैयक्तिक आहे. सुरक्षिततेचा प्रश्न मात्र दिवसेंदिवस गंभीर होतो आहे. एके काळी पैसे बँकेत जमा  केले की ते सुरक्षित असा जो समज होता, तो नुकताच बर्‍याच बँकांनी खोटा ठरव्ला आहे. खाजगीत पैसे गुंतवावे तर बुडण्याचीच शक्यता जास्त . सोन्याचांदीत बचत करावी तर त्यावर पुसेसा परतावा मिळत नाही. सरकारी बँका दर दोन चार महिन्याला व्याज कमी जास्त करतच असतात.

बचतीवर चांगला परतावा मिळवायला जावं तर म्हणजे जोखीम जास्त! त्यातल्या त्यात मध्यम मार्ग म्हणजे म्युच्युअल फंडात पैसे गुंतवावे, तर जोखीम तिथेही आहेच. पण मोजून मापून जोखीम स्विकारायची असं ठरवलं तर थेट शेअरबाजारातच गुंतवणूक करावी हे उत्तम असाही बर्‍याच जणांचा विचार असतो.

गेल्या काही वर्षांत सातत्याने १२ ते १५ टक्के परतावा या मार्गाने मिळवणारे अनेक गुंतवणूकदार आहेत. २०१९ हे वर्षं संपत असताना या शेअर बाजाराचा आढावा घेताना एक तक्ता आमच्या हाती लागला तो बघितला तर आम्ही थक्कच झालो!

या १०० समभागाच्या यादीत पहिला समभाग आहे अवंती फीड्स नावाच्या कंपनीचा! २००९ साली या कंपनीचे समभाग रु. १.६७ या किंमतीत उपलब्ध होते. समजा, तुम्ही तेव्हा १००० समभाग घेतले असते तर एकूण गुंतवणूक झाली असती रुपये १६७०! दहा वर्षे ही गुंतवणूक तशीच ठेवली असती तर आताच्या घडीस तुमच्या हातात ५,७८,७५० रुपये जमा असते . याच यादीत शेवटचा समभाग आहे मूथूट कॅपिटल या कंपनीचा! हे समभाग घेतले असते तरी मुद्दल दहापट झाले असते ! पण मग सगळ्या गुंतवणूकदारांचा असाच फायदा का होत नाही? हा प्रश्न मनात येणे साहजीकच आहे. 

तर मंडळी, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठीच आजच्या लेखाचा खटाटोप आहे.

मुंबई शेअर बाजारात आजच्या तारखेस ५००० समभाग ' लिस्टेड' आहेत. त्यापैकी २००० समभाग नियमित व्यवहारात असतात. म्हणजेच गूंतवणूकदाराला हवा तसा फायदा मिळण्याची संधी ०.०००५ इतकीच आहे. समजा १०० समभागात गुंतवणूक केली तर फायदा कमावण्याची संधी ०.०५ इतकीच आहे.  मग पुढच्या दहा वर्षांत भरपूर नफा देणारे समभाग कसे निवडायचे हा प्रश्न आहे. 

आपण आता असे गृहित धरू या की तुम्ही अत्यंत सर्वसाधारण गुंतवणूकदार आहात. शेअर बाजारात वापरले जाणारे 'फंडामेंटल अ‍ॅनालीसीस ' किंवा टेक्नीकल अ‍ॅनालीसीस' किंवा ' इनसाइड इन्फरमेशन ' अशा प्रकारचे कुठलेच ज्ञान तुमच्याकडे नाही. अशावेळी पूर्णपणे अनभिज्ञ किंवा ' अडाणी' गुंतवणूकदाराने काय करावे?

आपल्या रोजच्या व्यवहारात डोळे आणि कान उघडे ठेवले तरी अशी संधी आपण मिळवू शकतो. ती कशी हे समजण्यासाठी पुन्हा एकादा त्या शंभर समभागाच्या यादीकडे नजर टाका. या यादीत असलेल्या पहिल्या दहा नावांत तुमच्या ओळखीतल्या चार कंपन्या आहेत. या चार कंपन्या तुमच्या ओळखीच्या होत्या, त्यांची उत्पादने त्यांच्या ब्रँडनेम वरून खात्रीच्या होत्या, त्यांची उत्पादने तुम्ही वापरली होती, पण तुम्ही त्या कंपन्यांचे समभाग घेतले नव्हते. 

बजाज फायनान्स - तुम्ही तुमच्या मित्रांनी या कंपनीची 'लोन पे फोन' स्लोगन वाचूनच महागडा मोबाईल हप्त्यावर घेतला असेल, घरात फ्रीज टीव्हीसारख्या वस्तू याच कंपनीच्या इएमआय स्कीमवर घेतलेल्या असतील. पण या कंपनीचे समभाग घेअतले नव्हते. थोडी काटकसर करून तेव्हाच हे समभाग घेतले असते तर आता फ्रीज टिव्हीचे आख्खे दुकान विकत घेण्याइतके पैसे तुमच्या हातात असते. 

दुसरे उदाहरण घ्या रीलॅक्सो फूटवेअरचे. रीलॅक्सो हा ब्रँड ओळखीचा होता म्हणून तुम्ही चपला बूट याच कंपनीचे घेतले असतील. पण समभाग घेतले नसतील!

असा विचार केला तर या शंभर समभागांच्या यादीतल्या अनेक कंपन्यांचे तुम्ही ग्राहक झाले आहात. पण समभागधारक होण्याचा विचारही तुमच्या मनात आला नसेल!  थोडक्यात काय, तर जे ब्रँड चांगले आहेत याची उपभोक्ता म्हणून जर तुम्हाला विश्वास होता तर त्यांचे समभाग घेण्यास काहीच हरकत नव्हती. समजा तसे केले असते तर  कोणत्या समभागात गुंतवणूक करावी हा प्रश्न पण मनात आला नसता ! 

तर, तुमच्या सोयीसाठी या १०० पैकी सहज गुंतवणूक करण्यायोग्य जे समभाग होते त्याची यादी बनवा. तुमच्या सोयीसाठी त्या समभागावर आम्ही लाल रंगात खूणा केल्या आहेत!

शेअर बाजारात भरघोस नफा हवा असेल तर डोळे आणि कान उघडे ठेवा हा पहिला मंत्र आहे! पण हा मंत्र वापरण्यासाठी तुम्हाला चांगला ब्रोकर हाताशी असावा लागतो ,तर पुढच्या भागात वाचू या 'ब्रोकर कसा निवडावा'!!

कमेंटमधून प्रश्न अपेक्षित आहेतच, जरूर लिहा तुमचे अनुभव!

सबस्क्राईब करा

* indicates required