या मुंबई पोलीसाने ८३ वर्षे वयाच्या आजींचा वाढदिवस साजरा केला म्हणून त्यांचे कौतुक का होत आहे?
मुंबई पोलीस कधीही आपल्या मनात त्यांच्याबद्दल असलेला आदर कमी होऊ देत नाही. प्रत्येक बाबतीत मुंबई पोलिसांचे काम हे अफलातून असते. कठीण केसेस सोडवणे असो, आपत्ती व्यवस्थापन करणे असो की मग अफलातून ट्विट्स असो... मुंबई पोलीस म्हणजे भन्नाट विषय आहे. आता मुंबई पोलिसांनी अशाच एका कृतीतून लोकांचे मन जिंकले आहे.
मार्टिना परेरा या ८३ वर्ष वयाच्या आजी आपल्या घरात पाय घसरून पडल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी त्यांचा वाढदिवस होता. वाढदिवसा दिवशी असे घडले म्हणजे वाईट म्हणावे लागेल. पण बांद्रा पोलीस स्टेशन येथील पीएसआय जयप्रकाश सूर्यवंशी यांनी या आजीबाईंकडे केक घेऊन जात त्यांचा हा वाढदिवस सफल केला.
परेरा आजी घरातील किचन ओले असल्याने पाय घसरून पडल्या. आजूबाजूला कोणी नसल्याने त्या तशाच परिस्थितीत ८ तास पडून होत्या. आजींना गेलेला डबा घ्यायला आजी आल्या नाहीत तेव्हा ही गोष्ट त्यांच्या वॉचमनच्या लक्षात आली. त्यांनी आजूबाजूच्या लोकांना ही गोष्ट सांगितली. शेजारच्यांनी पोलिसांना बोलवून घर उघडले
आजींचा पाय फ्रॅक्चर झाला होता. सुदैवाने इतर काहीही दुखापत नव्हती. यावेळी असिस्टंट इन्स्पेक्टर पल्लवी कुलकर्णी या देवदूत बनून आजींच्या मदतीला धावल्या आणि आजीला ऍडमिट करण्यात आले. त्याचवेळी पीएसआय सुर्यवंशी यांनी आजीचा बड्डे साजरा करून जगात माणुसकी शिल्लक असल्याचा पुरावा दिला.
पीएसआय सूर्यवंशी यांच्या कृतीचे चहुबाजूंनी कौतुक होत आहे.
उदय पाटील




