computer

१०० वर्ष जुनं पोलीस घोडदळ पुन्हा येतंय....कधी आणि कोणत्या शहरात येणार पाहून घ्या !!

लवकरच मुंबईच्या रस्त्यांवर घोड्यांवर बसलेले पोलीस दिसले तर नवल वाटू देऊ नका. मुंबई पोलिसांच्या ताफ्यात आता घोडे सामील होणार आहेत. पूर्वीच्या काळी अस्तित्वात असलेले Mounted Police आता पुन्हा येत आहेत.

१९०० च्या काळात मुंबईमध्ये पोलीसांचं घोडदळ होतं. त्याकाळी मोटार वाहनं बाजारात नुकतीच आली होती. १९३२ सालापर्यंत या मोटारींची संख्या एवढी वाढली की घोडदळ बंद करण्यात आलं. त्यानंतर घोड्यावर स्वार पोलीस पुन्हा कधीही मुंबईत दिसले नाहीत.

सध्या चेन्नई आणि कोलकाता भागात पोलीसांच घोडदळ आहे. या घोडदळावर सहसा ट्राफिक आणि गर्दीचं नियंत्रण करण्याची जबाबदारी असते. मुंबईत नव्याने स्थापन होणाऱ्या घोडदळावर मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर गस्त घालण्याची आणि सणसमारंभांच्यावेळी गर्दीचं नियंत्रण करण्याची जबाबदारी असेल.

पुढच्या ६ महिन्यात पोलिसांची ही तुकडी ३० घोड्यांसह काम सुरु करणार आहे. या तुकडीत एक पोलिस उपनिरीक्षक, एक सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि ३२ हवालदार असतील. या ताफ्याला प्रशिक्षण देण्याचं काम रेसकोर्सचे प्रशिक्षक, रायडींग क्लब्सचे प्रशिक्षक आणि सैन्याच्या घोडदळाची तुकडी करणार आहे. याखेरीज घोड्यांना सांभाळण्यासाठी नवीन व्यवस्था उभी केली जाणार आहे. जसे की घोड्यांसाठी खास जलतरण तलाव, प्रशिक्षण केंद्र, इत्यादी.

सध्या जगात काही मोजके घोडदळ उरले आहेत. यात सर्वात प्रसिद्ध आहे लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलीस विभागाचं घोडदळ. यानंतरचा नंबर लागतो इंग्लंडच्याच साऊथ व्हेल्स भागातील 'न्यू साउथ वेल्स माउंटेड पोलिस' दलाचा. कॅनडाचे रॉयल कॅनडियन माउंटेड पोलिस, ओमानचे रॉयल ओमान पोलीस आणि अमेरिकेचे बॉर्डर पोलीस हेही प्रसिद्ध आहेत.  

मंडळी, मुंबई पाठोपाठ पुणे आणि नागपूर येथेही घोडदळ स्थापन होणार आहे. तुम्हाला काय वाटतं आजच्या वेगवान वाहनांच्या काळात घोडदळ किती फायदेशीर ठरेल? तुमचं मत नक्की द्या.

सबस्क्राईब करा

* indicates required