राज्य फुलाने फुलली मुंबई. ताम्हणाची ही सुंदर फुले तुम्ही कधी पहिली आहेत का?

ताम्हण हे महाराष्ट्राचे राज्य फूल आहे. बऱ्याच जणांना हे आताच माहीत झाले असेल तरी हे ताम्हणाचे झाड बघितले तर कुणीही या फुलाच्या प्रेमात पडेल इतके हे सुंदर असते. महाराष्ट्राचे राज्य फुल शोभावे अशी सुंदरता या फुलात नक्कीच आहे. सध्या हे फुल मुंबईकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडत आहे.

मुंबई महापालिकेचे मुख्यालय आणि इतर अनेक ठिकाणी ही ताम्हण फुले येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. महापालिका मुख्यालयाबाहेर ७ वर्ष जुने आणि २० फूट उंच असलेले हे झाड बरोबर महाराष्ट्र दिनाच्या वेळी बहरात येत असते. एका अहवालानुसार मुंबईत ६,५६८ ताम्हणाची झाडे आहेत.

ताम्हणाचे फुल हे लालसर, जांभळ्या आणि गुलाबी रंगाच्या मिश्रणाने तयार झालेले दिसते. एखाद्या मुकुटाप्रमाने दिसणारे हे फुल जणू क्रेप कागदाचे बनवलेले फूल असावे असे दिसते. म्हणून या फुलाला क्रेप मर्टलची राणीही म्हटले जाते. या सुंदर फुलाला हिंदीत जरूल म्हणतात. \

मुंबईकरांना याच सुमारास ताम्हण फूल बहरेल म्हणून ओढ लागलेली असते. आजवर तरी ताम्हणाने लोकांना निराश केलेले नाही. या झाडाची विशेषता म्हणजे हे भारतीय आहे आणि अधिकांश भारतातच दिसते. इतके सुंदर फुलाचे मूळ हे भारतीय आहे याचा आनंद असायलाच हवा, 'प्राईड ऑफ इंडिया' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या फुलाची ही सार्थ ओळख आहे.

महाराष्ट्रात ताम्हणाचे झाड हे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागात आढळते. जवळपास ३० फुटांपर्यंत वाढणारे हे झाड एप्रिल आणि मे च्या दरम्यान बहरून लोकांना भर उन्हाळ्यात गारव्याचा अनुभव देत असते. ६ वर्ष वय झाल्यावर हे झाड फूल धारण करायला सुरुवात करते.

ताम्हणाची सुंदरता ओळखून मुंबईत अनेक बागा, रस्त्यांच्या दोन्ही बाजू अशा ठिकाणी ही झाडाची लावणी करण्यात आली आहे. आता या झाडाच्या सुंदरतेची चर्चा तर केली, तर आता एक नजर या झाडाच्या औषधी उपयोगांवर पण टाकूया.

हे झाड मधुमेहावर गुणकारी आहे. तसेच या झाडाच्या पानांचा चहा ताप बरा करू शकतो असे म्हटले जाते. ताम्हणाच्या बियांमध्येही औषधी गुणधर्म आहेत. झाडाची मुळे पचनासाठी फायद्याची आहेत. एका अर्थी पूर्ण झाडच उपयोगी पडते.

हे झाड भारतीय वातावरणात चांगले वाढते. तुमच्या परिसरात हे झाड नसेल, तर नक्की लावून पाहा. त्याला फुलं यायला तसा वेळ लागेल. तोवर कधी या सीझनमधे मुंबईत जाणे झाले तर या फुलांची सुंदरता नक्कीच नजरावून या...

सबस्क्राईब करा

* indicates required