computer

10 वर्षांच्या मुलांनी केले 10 लाख गोळा.

कोरोनाज्वर दिवसेंदिवस वाढत आहे. सुदैवाने मदत करणाऱ्यांचा ओघही तसतसा वाढत आहे. अनेकांनी आपापल्या पद्धतीने कोरोनाने होळपळून निघालेल्या लोकांना मदतीचा हात दिला आहे. त्यात नेते, अभिनेते, उद्योजक यांसारख्या लोकांचा समावेश आहे. पण आज आम्ही ज्यांच्याबद्दल सांगणार आहोत त्यांची कहाणी ऐकल्यावर तुम्हाला एकाच वेळी आश्चर्य आणि कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही.

यशवर्धन भट आणि मायरा गांधी ही मुंबईतल्या कॅथेड्रल आणि जॉन कॅनन शाळेत शिकणारी दहावीतली मुलं. यांनी आपण पण कोरोनाग्रस्तांना मदत करावी हा विचार केला. त्यांनी उभी केलेली मदत किती असेल? तर ती आहे तब्बल १० लाख!!!

हर्षवर्धन आणि मायरा एकमेकांचे मित्र आहेत. इतरांप्रमाणे तेही या लॉकडाऊनच्या काळात विडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्कात होते. यादरम्यान त्यांनी कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी काही करता येईल का यावर चर्चा करायला सुरुवात केली. बराच वेळ विचार केल्यावर त्यांना आठवले की आपण रोटी फाउंडेशनसाठी शाळेत पोळ्या गोळा करायचा उपक्रम केला होता. त्या पोळ्या ज्यांना चांगले अन्न मिळत नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येतात.

रोटी फाउंडेशनची स्थापना माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांनी केली आहे. तर हर्षवर्धन आणि मायराने याच रोटी फाउंडेशनच्या माध्यमातून काम करायचे ठरवले. त्यांनी एक विडिओ बनवला आणि आपल्या सर्व मित्र आणि नातेवाईकांना पाठवला. त्या व्हिडिओत त्यांनी लोकांना कशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे याची विस्तृत मांडणी केली आणि या सर्वांना रोटी फाउंडेशन कशी मदत करू शकते हे पण सांगितले. सोबत जिथे पैसे डोनेट करता येऊ शकतील अशी एक लिंकही जोडली.

या मुलांच्या आवाहनानंतर अनेक लोक पुढे आले आणि त्यांनी सढळहस्ते मदत केली. बघता बघता दहा लाख रुपये गोळा झाले. अजूनही मदतीचा ओघ सुरूच आहे. या पैशांतून जवळपास ३५ हजार लोकांना जेवण पुरवले जाणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required